ऑक्सफोर्डशायरमधील डेव्हर्स फार्म क्वारीमध्ये डायनोसॉरच्या शेकडो पावलांचे ठसे सापडले आहेत. शास्त्रज्ञांनी एक मोठा “डायनोसॉरचा महामार्ग” शोधल्याचा दावा केला आहे. ऑक्सफोर्ड आणि बर्मिंगहॅम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या ठशांचा शोध घेतला.
1997 मध्ये डेव्हर्स फार्म क्वारीमध्ये 60 पेक्षा जास्त डायनोसॉरच्या पायाचे ठसे सापडले होते. त्यानंतर आता 4 जानेवारी , 2025 मध्ये या ठिकाणी 200 हून अधिक पावलांचे ठसे मिळाले आहेत. हे ठसे मध्य ज्युरासिक कालखंडातील आहेत.
शाकाहारी आणि मांसाहारी डायनोसॉरचे ठसे
ठशांमध्ये दोन प्रकारच्या प्राण्यांचे पुरावे मिळाले आहेत. शाकाहारी सॉरोपॉड (Sauropod) प्राण्यांचे ठसे मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. हे लांब मानेचे सेटीओसॉरस (Cetiosaurus) प्राणी होते. मांसाहारी डायनासोरच्या मेगॅलोसॉरस (Megalosaurus) या प्रजातीचे ठसेही येथे सापडले आहेत.
शास्त्रज्ञांच्या मते, या ठिकाणी शाकाहारी आणि मांसाहारी डायनोसॉर एकत्र चालत असत. लहान आणि मोठ्या डायनोसॉरच्या ठशांवरून त्यांची गती, चालण्याची पद्धत, तसेच जीवनशैलीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
डायनोसॉरचा ट्रॅकवे
या ठिकाणी 5 मोठे ट्रॅकवे (चालण्याचे मार्ग) सापडले आहेत. यातील सर्वांत लांब ट्रॅक 150 मीटरहून मोठा आहे. हे सॉरोपॉड डायनोसॉरच्या चालण्याचे पुरावे आहेत.
संशोधनाचा नवा टप्पा
बर्मिंगहॅम विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ प्रा. कर्स्टी एडीगार यांच्या मते, डायनोसॉरच्या ठशांवरून त्यांची चालण्याची पद्धत, ते एकमेकांशी कसे संवाद साधत होते, तसचं त्यांचा आकार समजतो. 3D मॉडेल आणि 20 हजारहून अधिक फोटोद्वारे या साइटचे संशोधन झाले आहे. ज्यामुळे डायनोसॉरच्या जीवनशैलीवर अधिक सखोल माहिती मिळत आहे.
महत्त्वाचे ऐतिहासिक कनेक्शन
मेगॅलोसॉरस या डायनोसॉरच्या पायांच्या ठशाची विशेषता म्हणजे 2024 मध्ये या प्राण्याच्या अभ्यासाला 100 वर्षे पूर्ण झाली .1824 मध्ये या प्रजातीचा जीवाश्म ब्रिटनमध्ये सापडला होता. यामुळे डायनोसॉरच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली होती
डायनोसॉरच्या या पावलांच्या ठशांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या साइटचा आकार. ब्रिटनमधील इतर डायनोसॉर ट्रॅक साइट्स लहान असतात. पण डेव्हर्स फार्म क्वारी ही ब्रिटनमधील सर्वात मोठी आणि जगातील मोठी डायनोसॉर ट्रॅक साइट आहे.