शांघाय शहराच्या व्यापारी भागात आता ऑफिस कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी एक स्पेशल लॉन उभारण्यात आला आहे. तणावग्रस्त कर्मचाऱ्यांसाठी शांतता आणि आराम देणारे ‘वर्कर्स सॅंक्स्च्युअरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणाला सर्वांची पसंती मिळत आहे. हा लॉन 30 मीटर लांब असून त्याचे डिझाइन एका आरामखुर्चीसारखे करण्यात आलं आहे. तणाव कमी करण्यासाठी आणि शांततेत वेळ घालवण्यासाठी हे लॉन बनवण्यात आलं आहे .
अमेरिकेतील प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनी सासाकी यांनी या लॉनचे डिझाइन केलं आहे. या लॉनमध्ये 135 अंशांचे छोटे छोटे उतार आहेत. यामुळे ही जागा खूपच आरामदायक बनली आहे. आजूबाजूच्या शहरी वातावरणापेक्षा पूर्णतः वेगळी असलेली ही जागा आहे. गवताने व्यापलेल्या या लॉनचे सौंदर्य शांघायच्या शहरी धकाधकीत ऑफिस वर्कर्ससाठी आकर्षण ठरले आहे.
विशेष डिझाईन
आरामखुर्चीसारखा उतार आणि डिझाईन असलेला हा लॉन तणावग्रस्त आणि थकलेल्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांसाठी एक अनपेक्षित आश्रयस्थान बनला आहे. लोकं या ठिकाणी दुपारच्या वेळी झोप घेतात, गप्पा मारतात तर काही जण निसर्गाचा आनंद घेतात. शांघायमधील युंजिन रोड मेट्रो स्टेशनजवळ 2012 मध्ये सुरू झालेल्या रनवे पार्क पुनर्विकास प्रकल्पाचा हा लॉन एक भाग आहे.
ऑफिस कर्मचाऱ्यांची आवडती जागा
शांघायमधील अनेक ऑफिस कर्मचारी त्यांच्या दैनंदिन ताणतणावातून सुटका मिळवण्यासाठी या ठिकाणी येतात. स्थानिक आयटी कर्मचारी जेनी लियांग सांगतात, “आम्ही लंच ब्रेकच्या वेळी नियमितपणे इथे येतो. इथलं गवत खूप मऊ आणि आरामदायक आहे.”
चिनी सोशल मीडियावर लोकप्रियता
चिनी सोशल मीडियावर “20-मिनिट पार्क इफेक्ट” ( #20-Minute Park Effect ) हा हॅशटॅग खूप लोकप्रिय झाला आहे. लोक या ठिकाणाला “टांग पिंग” (tang ping) म्हणजेच कामाच्या ताणापासून सुटका मिळवून अधिक आरामदायी जीवन जगणे या संकल्पनेशी जोडतात. अनेक लोकांसाठी हा लॉन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचे एक उत्तम ठिकाण बनलं आहे.
पण, जरी हा लॉन कर्मचाऱ्यांसाठी आरामदायक असला तरी काही लोकांना हे कितपत टिकेल यावर
चिंता व्यक्त केली आहे. “जर गवत खराब झाले किंवा सुकले, तर हे ठिकाण तेवढं लोकप्रिय राहणार नाही,” असेही जेनी लियांग यांनी सांगितले.
निसर्गाच्या जवळ जाण्याचा एक प्रयत्न
शांघायच्या मध्यभागी असलेल्या या लॉनमुळे निसर्गाशी जवळीक साधण्याचा आणि शहरी जीवनातील ताण-तणाव कमी करण्याचा एक मार्ग मिळाला आहे.