जागतिक पातळीवर व्यापार क्षेत्रामध्ये मोठ्या उलथापालथ होत आहेत. एकीकडे भारत – रशिया व्यापारी संबंधात तेलखरेदी थांबवण्यासाठी अमेरिकेने 6 ऑगस्ट रोजी अतिरिक्त 25 टक्के टेरिफ लादला आहे. तर दुसरीकडे, भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल भारत रशिया दरम्यान संरक्षण आणि अन्य औद्योगिक कराराच्या चर्चेसाठी रशिया दौऱ्यावर गेले आहेत. जाणून घेऊयात या दौऱ्याचं नेमकं काय प्रयोजन आहे?
रशियासोबत संरक्षण करारावर चर्चा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या टेरिफ धमक्यांच्या पार्श्वभूमीवर संरक्षणाव्यतिरिक्त, भारत आणि रशिया औद्योगिक संबंध मजबूत करण्यासाठी अजित डोभाल हे सध्या रशिया दौऱ्यावर आहेत.
डोभाल यांच्या भेटीत अतिरिक्त S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करणं आणि Su-57 लढाऊ विमानांसंबंधित चर्चा केली जाणार आहे.
द इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार, या दोन्ही देशांदरम्यान अतिरिक्त एस- 400 क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या शक्यतेवर चर्चा करतील. तसेच भारतात एस – 400 एमआरओसाठी आवश्यक त्या सुविधा उभ्या करण्याच्या विषयावरही चर्चा केली जाईल.
हे ही वाचा : भारत-रशिया संबंधावर तिसऱ्या देशाचा प्रभाव पडू शकत नाही!
दौऱ्यावर भू-राजकीय परिस्थितीचा प्रभाव
ऑपरेशन सिंदूरमध्ये रशियन बनावटीच्या एस – 400 प्रणालींनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातील दहशतवादी तळांना अचूक लक्ष्य करता आलं होतं. या एस – 400 प्रणालींने संपूर्ण ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या हल्ल्यानंतर भारत – पाकिस्तान दरम्यान पुढचे चार दिवस तणावपूर्ण स्थिती राहिली.
या भारत – पाकिस्तान संघर्षामध्ये भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनीही दमदार कामगिरी केली. ब्रह्मोस क्षेपमास्त्रांच्या क्षमतेने पाकिस्तानी सैन्याला हादरवून टाकले. त्यामुळे भारत – रशिया दरम्यानचे संरक्षण करारवाढीसाठी आता या दौऱ्याचं आयोजन केलं आहे. डोभाल यांच्या भेटीपूर्वी, रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी रशियाचे उपसंरक्षण मंत्री, कर्नल-जनरल अलेक्झांडर फोमिन यांची भेट घेतली आहे.
या दौऱ्यात संरक्षण आणि औद्यागिक बाबींसह तेल पुरवठा विषयावरही चर्चा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली आहे.
ट्रम्पचे विशेष दूतही रशिया दौऱ्यावर
अजित डोभाल हे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ही भेट अशा वेळी होत आहे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्हन विटकॉफ हे देखील मॉस्को दौऱ्यावर आहेत. जानेवारी 2025 पासून विटकॉफ यांचा हा पाचवा रशिया दौरा आहे.