भारत – रशिया व्यापारी संबंधामध्ये अमेरिकेने अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करु नये यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. परिणामी अमेरिकेने भारतावर थेट 50 टक्के टेरिफ लादले. तरिही, भारताने या दबावाला न जुमानता रशियासोबत आपले व्यापारी संबंध कायम ठेवले आणि वारंवार त्याचे समर्थनही केलं. भारताच्या या भूमिकेचं रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पूतीन यांनी रशिया टुडे या माध्यमाशी बोलताना कौतुक केलं आहे.
भारत-रशिया संबंध वृद्धिंगत होत आहेत
रशियन मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे की, भारत आणि रशिया या दोन्ही देशा दरम्यानचे संबंध हे स्थिर आहेत आणि ते आत्मविश्वासाने हे संबंध घट्ट होत आहेत. त्यामुळे या दोन देशांदरम्यान कोणत्याही देशांनी वा नेत्यांने वेगवेगळ्या मार्गाने अडखळे आणण्याचा प्रयत्न केला तर ते सर्व प्रयत्न अयशस्वी होतील.
अमेरिकेची भारताविरोधी भूमिका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर एकूण 50 टक्के टेरिफ लादले आहेत. भारताने रशियाकडून तेल खरेदी करु नये अन्यथा अमेरिका भारतावर अतिरिक्त टेरिफ लादेल, भारत हा रशियाकजून तेलखरेदी करत असल्यामुळे रशिया – युक्रेन सुद्धबंदी करार यशस्वी होत नाही, भारत एकप्रकारे रशियाला युद्धात मदत करत आहे, असे नानाविध आरोप करत अमेरिकेने भारतावर अतिरिक्त 25 टक्के टेरिफ लादला. त्यामुळे भारतीय वस्तूंवर अमेरिकेकडून 50 टक्के टेरिफ आकारला जातो.
अमेरिकेची ही भूमिका अन्यायी आणि अयोग्य असल्याचं वक्तव्य भारताने केलं होतं. स्वत: अमेरिका आणि युरोपीय देश ही रशियासोबत व्यापार करतात. या युद्ध परिस्थितीत अमेरिका आणि युरोपीयन देश ही रशियाकडून तेल, वायू खरेदी करतात मग भारतावर निर्बंध का असा उलटप्रश्न ही भारताने त्यावेळी केला होता. अशाप्रकारे भारताने अमेरिकेचा दुटप्पीपण जगासमोर आणला होता.
ब्रिक्सच्या माध्यमातून दृढ संबंध
ट्रम्पच्या दबावाला न जुमानता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तियानजिनमधील एससीओ शिखर परिषदेत चीन आणि रशियाशी संबंध मजबूत केले. शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. रशियाच्या मंत्रालयाने म्हटले आहे की, भारताचा दृष्टिकोन ‘दीर्घकालीन मैत्रीची भावना आणि परंपरा’ आणि नवी दिल्लीची ‘आंतरराष्ट्रीय बाबींमध्ये धोरणात्मक स्वायत्तता’ प्रतिबिंबित करतो.भारत-रशिया भागीदारी ‘सार्वभौमत्वाचे सर्वोच्च मूल्य आणि राष्ट्रीय हितसंबंधांच्या श्रेष्ठतेला महत्त्व देते’ त्यामुळे या दोन्ही देशांदरम्यान आणि विश्वासपूर्ण असे धोरणात्मक संबंध आहेत.