अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने एका भारतीय विद्यार्थींनीसह चार विद्यार्थ्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करुन त्यांना अमेरिकेतून परत जाण्याविषयीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात चारही विद्यार्थ्यांनी कोर्टाकडून मदत मागत ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल केला आहे.
ट्रम्प प्रशासनाने शून्य अनधिकृत स्थलांतरित धोरणाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत आता ट्रम्प प्रशासन विविध विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत तपासून त्यांना व्हिसा संपताच अमेरिका सोडून जाण्यासाठी ईमेल द्वारे कायदेशीर नोटीस पाठवत आहे. याशिवाय अमेरिकन नियमांचं उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्वरित देशातून बाहेर पाठवलं जात आहे.
नेमका खटला काय आहे?
भारतीय विद्यार्थींनी चिन्मय देवरे सह चीनमधले दोन विद्यार्थी आणि नेपाळमधल्या एका विद्यार्थ्यांनी हा खटला दाखल केला आहे. चिन्मय हा व्हेन स्टेट विद्यापिठामध्ये शिकत आहे.
या खटल्यामध्ये या चारही विद्यार्थ्यांनी ट्रम्प प्रशासनाने ‘स्टुडंट अँड एक्सचेंज विजिटर इन्फॉरमेशन सिस्टीम (SEVIS) मधून या विद्यार्थ्यांचा बेकायदेशीर दर्जा संपल्याचं दाखवून त्याचं नाव वगळण्यात आलं आहे. SEVIS हा एक डेटाबेस आहे जिथे अमेरिकेतील गैर-स्थलांतरित विद्यार्थ्यांची माहिती संग्रहित केली जाते.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे या चारही विद्यार्थ्यांचा अमेरिकेत राहण्याचा कायदेशीर अधिकार न राहिल्यामुळे त्यांना स्वत:हून त्यांच्या मूळ देशात जावं लागणार आहे. जर हे चारही विद्यार्थी स्वत:हून बाहेर गेले नाहीत तर त्यांच्यावर कोणत्याही क्षणी कायदेशीर कारवाई होऊ शकते.
ट्रम्प प्रशासनाविरुद्धचा हा खटला अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियन (एसीएलयू) ने विद्यार्थ्यांच्या वतीने मिशिगन पूर्व जिल्ह्यातल्या न्यायालयात दाखल केला आहे.
हेही वाचा – नव्या टेरिफला ट्रम्प यांची 90 दिवसांची स्थगिती!
विद्यार्थ्यांच्या मागण्या
या विद्यार्थ्यांनी खटल्याच्या माध्यमातून SEVIS मध्ये त्यांचा कायदेशीर दर्जा नमूद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी आतापर्यंत कधीही कोणत्याच अमेरिकन कायद्याचं उल्लंघन केलं नाहीये. तसंच कोणत्या गुन्ह्यांमध्येही त्यांचा सहभाग नव्हता म्हणून त्यांना त्यांचा विद्यार्थी असल्याचा दर्जा परत देण्याची मागणी केली आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या अशा कृत्यांमुळे देश विदेशातून अमेरिकेत शिकण्यासाठी आलेल्या मुलांमध्ये भिती आणि अराजकतेचं वातावरण निर्माण होत असल्याचं मत सिव्हिल लिबर्टीज युनियनचे संचालक लॉरेन खोगाली यांनी व्यक्त केलं आहे.
खोगाली यांनी पुढे म्हटलं आहे की, परदेशातून अमेरिकेत शिकण्यासाठी येणारे विद्यार्थी हे गांभीर्यांने आपलं शिक्षण पूर्ण करतात. त्यांच्यामुळे अमेरिकेच्या शिक्षण क्षेत्रातल्या अर्थव्यवस्थेत आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडते. तरिही, ट्रम्प सरकार अशा योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देत आहे.
दरम्यान, यापूर्वी ट्रम्प प्रशासनाने क्रिश लाल इस्सेरदासानी या पदवीधर विद्यार्थ्यांला भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. क्रिश याचं पदवीचं शिक्षण मे महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे कोर्टाने क्रिश यांच्याविरोधात सरकारने घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. या घटनेनंतर सरकारने बेकायदेशीररित्या या चार मुलांना स्वदेशी जाण्याची नोटीस बजावल्याची घटना घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचं वातावरण आहे.