स्थलांतर! एका गावातून दुसऱ्या गावात, एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आणि एका देशातून दुसऱ्या देशात अशा सर्वच प्रादेशिक पातळीवर दररोज कित्येक लोक स्थलांतर करीत असतात. रोजगार, शिक्षण, चांगले राहणीमान वा जीवनशैली यासारख्या अनेक कारणांबरोबरच युद्ध, संघर्ष, उपासमारी, पर्यावरणीय समस्यांमुळे जगात असंख्य लोक स्थलांतर करीत असतात.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीनुसार, 281 अब्ज लोकांनी म्हणजे जागतिक लोकसंख्येच्या 3.6 टक्के लोकांनी स्थलांतर केलं आहे. अशा असंख्य स्थलांतरितांच्या समस्या ध्यानात घेऊन त्यांनाही नव्या राज्यात, राष्ट्रात स्थिरस्थावर होऊन सन्मानानं जगता यावं, त्यांच्या समस्या जाणून त्यानुसार धोरण तयार करणे, त्याबाबत जनजागृती करणे यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडून ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन’ साजरा केला जातो.
आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिनाची थीम
स्थलांतरितांच्या योगदानाचा सन्मान करून त्यांच्या न्याय्य हक्कांचा आदर करणे ही यंदाच्या ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिना’ची थीम ठरवण्यात आली आहे. स्थलांतरितांमुळे एखाद्या राज्याच्या आर्थिक-सामाजिक क्षेत्रातले योगदान, त्यांना येणारी आव्हाने, समस्या आणि त्यांची सुरक्षितता अशा सगळ्या विषयावर संयुक्त राष्ट्राने भर दिला आहे.
जगातील अनेक देशांत स्थलांतर झालेल्या समाजाने देशात उद्योग-धंदे, व्यवसाय, पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण केलं आहे. युरोपमधील अनेक देशांमध्ये लोकसंख्या कमी असल्याने शेजारील राष्ट्रांतून मनुष्यबळाची मागणी केली जाते. अशावेळी त्या-त्या देशात मोठ्या प्रमाणात अन्य देशातील लोक स्थलांतर करून येतात. अनेक वर्ष लोटल्यानंतर बाहेरून आलेल्यांची संख्या वाढू लागल्यावर मात्र, स्थानिक आणि स्थलांतरितांमध्ये संघर्ष पेटू लागतो. यामध्ये अनेकदा स्थलांतरितांवर अन्याय होतो. नोकरी-धंद्यासाठी आलेल्या स्थलांतरितांच्या एक-दोन पिढ्या जरी त्याच देशात वास्तव्य करीत असल्या तरिही, त्यांची ओळख आजन्म स्थलांतरित म्हणूनच राहते. तसेच त्यांच्या आयुष्यात भविष्याबद्दल आणि सुरक्षिततेबद्दल मोठी अनिश्चितता असते.
जागतिक पटलावर विविध देशांमध्ये सलोख्याचे संबंध असूनही सन 2023 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या माहितीनुसार साधारण 8,500 स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची नोंद आढळते. न नोंदवलेल्या मृतांची माहिती उपलब्ध नाही. यामध्ये स्थलांतर करताना सीमा ओलांडताना झालेल्या मृत व्यक्ती आणि एखाद्या देशात स्थानिक-स्थलांतरीत अशा संघर्षामध्ये झालेल्या मृत व्यक्ती, अशा दोन्ही प्रकारच्या स्थलांतरितांचा समावेश आहे.
दोन दिवसांपूर्वीच म्हणजे 16 डिसेंबर 2024 रोजी, जॉर्जियातील गुदौरी या हॉटेलमध्ये 11 भारतीय कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे सर्व पंजाब राज्यातील रहिवासी आहेत. त्यांचा मृत्यू हा कार्बन मोनोक्साइड या विषारी वायूमुळे झाल्याची माहिती जॉर्जियाच्या परराष्ट्र खात्याकडून देण्यात आली आहे. तेव्हा हा घातपात होता की अपघात, यासंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अनेकदा अनेक देशांमध्ये विविध देशातील स्थलांतरितांसोबत भेदभाव आणि अन्यायाच्या घटना घडत असतात. पण त्या घटनांची नोंद कुठे घेतली जात नाही.
भारत स्थलांतरणामध्ये अव्वल!
आत्तापर्यंत चीन नंतर सर्वात जास्त स्थलांतरण हे भारतातून होत असल्याची नोंद आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन 2022’ च्या माहितीनुसार भारतातून सर्वात जास्त स्थलांतरण होत आहे. सन 2020 मध्ये सुमारे 18 अब्ज भारतीयांनी स्थलांतरण केलं. भारतानंतर मॅक्सिकोमधून 11 अब्ज तर चीनमधून 10 अब्ज नागरिकांनी स्थलांतरण केलं आहे.
स्थलांतरितांचं डेस्टिनेशन अमेरिका
‘इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन 2022’ च्या माहितीनुसार, सन 2020 मध्ये सगळ्यात जास्त 51 अब्ज लोक अमेरिकेत स्थलांतरण होऊन आले आहेत. जगातील कानाकोपऱ्यातील लोक हे अमेरिकेमध्ये नोकरी, शिक्षणाच्या कारणास्तव स्थलांतरण करुन येत आहेत. गेल्या 50 वर्षापासून अमेरिकेमध्ये स्थलांतर होऊन येण्याचं प्रमाण सर्वाधिक राहिलं आहे. त्यानंतर जर्मनी 16 अब्ज, सौदी अरेबिया 13 अब्ज तर रशियामध्ये 12 अब्ज आणि युनायटेड किंगडममध्ये हे प्रमाण 9 अब्ज आहे.
भारतातून होणाऱ्या स्थलांतरणाची कारणं
भारतातून मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण घडत आहे. याचे कारण म्हणजे लोकसंख्या आणि भारतात गरजेहून अधिक कुशल मनुष्यबळ असल्यानेही नोकरी मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे अनेक भारतीय परदेशात वास्तव्य करीत आहे. यासोबतच शिक्षण हेही मुख्य कारण आहे.
ऑगस्ट 2024 च्या माहितीनुसार, यावर्षी देशभरातून सुमारे 13 लाख 35 हजार 878 भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशी गेले. सन 2023 साली 13 लाख 18 हजार 955 विद्यार्थी तर सन 2022 साली 9 लाख 07 हजार 404 विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी गेले. यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थी हे कॅनडा आणि अमेरिका देशांना प्राधान्य देतात. हे विद्यार्थी पुढे उच्च शिक्षण पूर्ण करुन त्यानंतर त्याच देशात स्थायिक होण्याचा निर्णय घेत असतात.
जुलै 2023 मध्ये संसदीय अधिवेशनामध्ये परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022 मध्ये एकूण 2 लाख 25 हजार 260 भारतीयांनी ‘भारतीय नागरिकत्वा’चा त्याग केला. सन 2020 मध्ये हे प्रमाण 85 हजार 256 होतं. 2011 – 2022 या अकरा वर्षात एकूण 16 लाख 63 हजार 440 भारतीयांनी त्यांचं नागरिकत्व सोडलं होतं.
2023 सालच्या पहिल्या सहा महिन्यांत हा आकडा 87 हजार 026 वर होता. ‘गेल्या दोन दशकांमध्ये काम करण्यासाठी देशाबाहेर जाणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. त्यापैकी अनेकांनी वैयक्तिक सोयीसाठी परदेशी नागरिकत्व स्वीकारलं आहे.’ असं एस. जयशंकर पुढे म्हणाले.
भारतातल्या श्रीमंत व्यक्तिचंही स्थलांतरण
या स्थलांतरितांमध्ये केवळ विद्यार्थी आणि नोकरी करण्यासाठी जाणाऱ्या लोकांचाच समावेश नाही तर, अनेक श्रीमंत उद्योगपतींचे कुटुंब, श्रीमंत खेळाडू, सिनेकलाकारसुद्धा उत्तम सोयी-सुविधा आणि राहणीमानासाठी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून विकसीत देशांचं नागरिकत्व घेण्यावर भर देत आहेत.