सध्या अनेक महिला गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्या घेतात. मात्र, या गोळ्यांचे नियमित सेवन केल्याने शरीरातील हार्मोन्सच्या पातळीवर परिणाम होतो. आणि यामुळे काही महिलांना आरोग्याच्या समस्या देखील जाणवतात.
आता मात्र गर्भनिरोधक गोळ्यांचा नियमित वापर करण्याऐवजी महिलांसाठी एक नवीन पर्याय समोर येत आहे. अमेरिकेतील एमआयटी (MIT) आणि Mass General Brigham येथील शास्त्रज्ञांनी एक नवे DIY गर्भनिरोधक इंजेक्शन विकसित केले आहे. हे इंजेक्शन एकदा घेतल्यास दीर्घकालीन गर्भनिरोधक संरक्षण मिळू शकते, असा संशोधकांचा दावा आहे.
नवीन DIY गर्भनिरोधक इंजेक्शन
शास्त्रज्ञांच्या मते, हे इंजेक्शन महिलांना दीर्घकालीन गर्भनिरोधक संरक्षण देऊ शकते. सध्या उपलब्ध गर्भनिरोधक इंजेक्शनचा प्रभाव जास्तीत जास्त तीन महिन्यांपर्यंत असतो. पण या नवीन इंजेक्शनचा प्रभाव याहून अधिक काळ टिकू शकते. यामुळे महिलांना दररोज गर्भनिरोधक गोळ्या घेण्याची गरज भासणार नाही.
हे इंजेक्शन महिलांना स्वतःच घेता येणार असल्याने ग्रामीण भागातील महिलांसाठीही हे खूप फायदेशीर ठरू शकते. कारण अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध नसतात. या संशोधनाची माहिती ‘नेचर केमिकल इंजिनिअरिंग’ या प्रसिद्ध मासिकात प्रकाशित करण्यात आली आहे.
याबाबत अजून अधिक संशोधन सुरू आहे. हे इंजेक्शन किती प्रभावी असेल, ते किती दिवस टिकेल आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम असतील का, याची सविस्तर माहिती मिळणे बाकी आहे. मात्र, जर हे इंजेक्शन प्रभावी ठरले, तर ते महिलांसाठी मोठा दिलासा ठरेल.
DIY गर्भनिरोधक इंजेक्शन म्हणजे काय?
हे इंजेक्शन त्वचेखाली सूक्ष्म क्रिस्टल्स म्हणजेच बारीक कण सोडते. हे कण एकत्र येऊन एक रचना तयार करतात. जी हळूहळू हार्मोन्स सोडते. हे हार्मोन्स महिलांना गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली अंडी तयार होण्यापासून थांबवतात. आणि यामुळे गर्भधारणा टाळली जाते.
शास्त्रज्ञांना असे वाटते की, हे इंजेक्शन पोटावर घेतल्यास ते काही महिने किंवा वर्षे गर्भधारणेपासून संरक्षण देऊ शकते. पण हे संरक्षण किती काळ टिकेल, हे इंजेक्शनमध्ये वापरलेल्या घटकांवर अवलंबून आहे.
स्टॅनफोर्ड विद्यापीठातील सहलेखिका आणि सहाय्यक प्राध्यापक विवियन फेग म्हणतात, “आमच्या संशोधनाचा उद्देश म्हणजे महिलांसाठी सोपे आणि वेगवेगळ्या कालावधीसाठी उपयुक्त गर्भनिरोधक पर्याय निर्माण करणे आहे.”
सध्या या इंजेक्शनची माणसांवर चाचणी झालेली नाही, पण वैज्ञानिकांना त्याच्या प्रभावाबद्दल आशा आहे. विशेषतः जिथे रोज गोळ्या घेणे किंवा डॉक्टरांकडून गर्भनिरोधक उपचार घेणे कठीण असते, अशा ठिकाणी हे इंजेक्शन फायदेशीर ठरू शकते,.
शास्त्रज्ञ ट्रॅव्हर्सो सांगतात की, “महिलांना घरी हे इंजेक्शन सहज घेता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.”
गर्भनिरोधकाव्यतिरिक्त, शास्त्रज्ञ अशाप्रकारच्या DIY इंजेक्शनची पद्धत HIV, क्षयरोग, स्किझोफ्रेनिया रोगांसारख्या इतर दीर्घकाळ चालणाऱ्या उपचारांसाठी वापरता येईल का? याचाही शोध घेत आहेत. “ही एक अतिशय सोपी प्रणाली आहे, ज्यात विद्रावक, औषध आणि थोडेसे बायोरेसोर्बेबल पॉलिमर असते. आता, आम्ही कोणत्या गोष्टींसाठी याचा वापर करावा याचा विचार करत आहोत.”असे ट्रॅव्हर्सो यांनी स्पष्ट केले.
सुरुवातीच्या प्रयोगांमध्ये चांगले परिणाम मिळाल्यामुळे आता हे इंजेक्शन माणसांवर चाचणीसाठी तयार केले जात आहे. त्याचे प्रमाण, परिणामकारकता आणि इतर संभाव्य उपयोग तपासण्यासाठी आणखी संशोधन सुरू आहे.