मध्य पूर्वेमध्ये इराण आणि इस्रायल दरम्यान युद्धबंदी झाल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ‘ट्रुथ’ या सोशल प्लॅटफॉर्मवर अमेरिकेच्या वेळेनुसार सोमवार दिनांक, 23 जून 2025 रोजी ट्रम्प यांनी हा दावा केला आहे. मात्र, इराणचे परराष्ट्र मंत्री अराघची यांनी हा दावा साफ फेटाळून लावला आहे. जाणून घेऊयात मध्य पूर्वेतल्या या दोन देशांदरम्यान आणि अमेरिके दरम्यान नेमकं काय घडत आहे.
युद्धबंदी संदर्भात व्हाईट हाऊसचा दावा
सोमवार दिनांक 23 जून 2025 रोजी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायल दरम्यान गेल्या 12 दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध संपल्याचं घोषित केलं. पुढच्या 24 तासानंतर म्हणजे वॉशिंग्टन इथल्या वेळेनुसार तिथल्या मध्यरात्रीपासून या युद्धबंदीची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘अमेरिकेचा इराणच्या तीन आण्विक प्रकल्पावर हल्ला करण्याचा निर्णय योग्य होता. या हल्ल्यामुळेच इराण इस्रायलसोबत युद्धबंदी करण्यासाठी तयार झाला हेच यातून स्पष्ट होतं. अमेरिकेच्या या हल्ल्यांमुळेच युद्धबंदी होत आहे,’ असा दावा अमेरिका करत आहे.
‘इराण आणि इस्रायल हे दोन्ही देश पूर्ण युद्धबंदी करण्यासाठी तयार झाले आहेत’ अशी पोस्ट ट्रम्प यांनी सोशल मिडीयावर शेअर केली आहे.
या पोस्टमध्ये व्हाईट हाऊसने ट्रम्प यांचा लाल रंगाची टोपी घातलेला फोटो प्रसिद्ध केला आहे. या लाल टोपीवर “ट्रम्प प्रत्येक गोष्टीत बरोबर होते” ( “TRUMP WAS RIGHT ABOUT EVERYTHING.”) असं लिहिलेलं आहे.
मात्र, व्हाईट हाऊसच्या या दाव्यावर इस्रायलने कोणतीच सहमती दर्शवली नाही, तर इराणने हा दावा साफ फेटाळून लावला आहे.
इराणने ट्रम्पचा युद्धबंदीचा दावा फेटाळला
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी ट्रम्प यांचा इराण-इस्रायल युद्धबंदीचा दावा फेटाळला आहे. व्हाईट हाऊसमधून युद्धबंदीची घोषणा करताच लागलीच इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ‘युद्धबंदी संदर्भात कोणतीच चर्चा आणि करार न झाल्याचं’ स्पष्ट केलं.
As Iran has repeatedly made clear: Israel launched war on Iran, not the other way around.
As of now, there is NO "agreement" on any ceasefire or cessation of military operations. However, provided that the Israeli regime stops its illegal aggression against the Iranian people no…
— Seyed Abbas Araghchi (@araghchi) June 24, 2025
अब्बास अराघची यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे की, “इराणने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे की, इस्रायलने इराण विरोधात युद्ध पुकारलं आहे. इराणने या युद्धाची सुरुवात केली नाही. सध्या या दोन्ही देशांदरम्यान कोणताच युद्धबंदी विषयी करार झालेला नाही. जर इस्रायलने तेहरानच्या वेळेनुसार पहाटे 4 वाजेपर्यंत त्यांचे हल्ले थांबवले तर इराण आपल्या कारवाया थांबवेल. इस्रायलने आपले हल्ले थांबवले तर इस्रायलवर हल्ले सुरु ठेवण्याचा इराणचा उद्देश नाही.”
इराणचा अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला
अमेरिकेने रविवार दिनांक 22 जून रोजी इराणच्या तीन आण्विक प्रकल्पांवर हल्ले केले होते. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारमधल्या दोहा इथल्या अमेरिकेच्या लष्करी तळावर सोमवारी हल्ला केला.
दोहा मधल्या अल उदेइद इथे अमेरिकेचा मध्य पूर्वेतला सगळ्यात मोठा लष्करी तळ होता. या तळावरुनच मध्य पूर्वेतल्या अन्य अमेरिकेच्या तळांवर लक्ष ठेवलं जात असे. या तळावर काही वेळेस ब्रिटिश अधिकारीही उपस्थित असतात. सरकारी माहितीनुसार, कतारमध्ये जवळपास 8 हजार अमेरिकन आणि हजारो ब्रिटिश नागरिक वास्तव्य करतात.
इराणच्या या हल्ल्यानंतर तिथल्या लष्कराकडून या हल्ल्याची माहिती देण्यात आली. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “इराणच्या सार्वभौमत्वावर केल्या जाणाऱ्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर दिलं जाईल. मध्य पूर्वेतील अमेरिकेचे लष्करी तळ हे सुरक्षेच्या कारणास्तव नाहीत. तर ते असुरक्षितता निर्माण करण्यासाठी आहेत.” असं ही या पत्रकात म्हटलं आहे.
दरम्यान, इराणने या तळावर 6 क्षेपणास्त्रे डागल्याचं म्हटलं आहे. पण अमेरिकेने इराणने या तळावर 14 क्षेपणास्त्र डागली असं म्हटलं आहे.
इराणने या हल्ल्यात जीवितहानी होऊ नये म्हणून याबाबत दोहा, कतार सरकारला पूर्वसुचना दिली होती. त्यामुळे या हल्ल्यात कोणतीच जीवितहानी वा जखमी झाले नाहीत.
इराणने हल्ल्याची पूर्वसुचना दिल्याबद्दल ट्रम्प यांनी इराणचे आभार मानले आहेत. त्याचवेळी या हल्ल्यात कोणत्याच अमेरिकन नागरिकांचा मृत्यू वा जखमी झालेला नाही. तसंच लष्करी तळाचंही कमी नुकसान झालं आहे. हा एक कमजोर हल्ला होता. या हल्ल्यानंतर आता शांततेला वाव आहे. अशी प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली होती.