जपानच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी त्यांच्या पदाचा आणि पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. केवळ काही महिन्यांपूर्वीच त्यांनी जपानचे पंतप्रधान म्हणून सूत्रे स्वीकारली होती. पण, त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या जपानमध्ये यामुळे राजकीय अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोण आहेत शिगेरू इशिबा?
शिगेरू इशिबा हे जपानच्या राजकारणातले एक अनुभवी नेते आहेत. त्यांचे वय 68 वर्षे आहे. शिगेरू इशिबा हे तोत्तोरी येथील एका राजकीय घराण्यात जन्मले. त्यांचे वडीलही राजकारणात सक्रिय होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी टोकियोच्या कीओ विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मित्सुई बँकेत काम केले. मात्र, 1983 मध्ये ते राजकारणात सक्रिय झाले. आणि 1986 मध्ये ते तोत्तोरी प्रांताच्या प्रतिनिधी सभेवर निवडून आले. त्यावेळचे ते सर्वात कमी वयाचे खासदार होते.
शिगेरू इशिबा यांनी माजी संरक्षणमंत्री म्हणून काम केले आहे. तसंच, जपानच्या राष्ट्रीय सुरक्षेवर त्यांचा गाढा अभ्यास आहे. ते नेहमी म्हणायचे की जपानने संरक्षणासाठी फक्त अमेरिकेवर अवलंबून राहू नये, तर स्वतःला अधिक सक्षम बनवावे. त्यांनी कृषी, वाणिज्य आणि मत्स्यपालन यासारख्या महत्त्वाच्या विभागांमध्येही काम केले आहे.
त्यांचा राजकीय प्रवास अस्थिर राहिला आहे. 1993 मध्ये त्यांनी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी सोडून ‘जपान रिन्यूअल पार्टी’मध्ये प्रवेश केला. पण तीन वर्षांनंतर 1996 मध्ये ते पुन्हा लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी मध्ये परत आले. शिगेरू इशिबा यांना पंतप्रधान बनण्यासाठी खूप वाट पाहावी लागली. त्यांनी तब्बल पाच वेळा पंतप्रधानपदासाठी प्रयत्न केले आणि अखेरीस सप्टेंबर 2024 मध्ये ते जपानचे 102 वे पंतप्रधान बनले.
राजीनाम्यामागची नेमकी कारणे काय?
शिगेरू इशिबा यांच्या राजीनाम्यामागे एकच मोठं कारण होतं ते म्हणजे, पक्षाचा सतत होणारा पराभव. पंतप्रधान बनल्यानंतर, त्यांच्या नेतृत्वाखालील लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (LDP) ला तीन मोठ्या निवडणुकांमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला.
2024 मध्ये ऑक्टोबरमध्ये झालेल्या एका पोटनिवडणुकीत त्यांचा पक्ष हरला होता, ती त्यांची पहिली हार होती. त्यानंतर, जूनमध्ये टोकियो शहराची स्थानिक निवडणूकही LDP ने गमावली. तिसरी आणि सर्वात मोठी हार ही, जुलै महिन्यात झालेल्या संसदेच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला.
या तीन सलग पराभवांमुळे शिगेरू इशिबा यांच्यावर त्यांच्याच पक्षात प्रचंड टीका सुरू झाली. पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जवळपास महिनाभर ते या राजकीय दबावाला तोंड देत होते. अखेरीस, त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा आणि पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजीनामा देताना त्यांनी सांगितले की, “अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावरच्या चर्चा आता पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे मला वाटतं की आता नव्या पिढीला संधी देण्यासाठी ही योग्य वेळ आहे.” त्यांच्या या निर्णयामुळे, सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षात आता नवीन नेतृत्वासाठी संघर्ष सुरू झाला आहे.
पंतप्रधान म्हणून त्यांचा कार्यकाळ आणि आव्हाने
शिगेरू इशिबा यांचा पंतप्रधान म्हणून कार्यकाल खूपच कमी होता, फक्त काही महिन्यांचा. या काळात त्यांच्यासमोर अनेक मोठी आव्हाने आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्यापार करारावर चर्चा करणे हे त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान होते. जपानच्या अर्थव्यवस्थेसाठी हे करार अत्यंत महत्त्वाचे होते.
जपानमध्ये वाढती महागाई, लोकांचे पगार स्थिर राहणे आणि घरांचे वाढते खर्च यासारख्या समस्यांमुळे सामान्य जनतेमध्ये सरकारबद्दल नाराजी वाढत होती.
इशिबा यांना त्यांच्याच पक्षात ‘लोन वुल्फ’ म्हणून ओळखले जाते. कारण ते नेहमी इतर नेत्यांपेक्षा वेगळे मत मांडत असत. त्यांचे हे स्वतंत्र विचार काही वेळा पक्षाच्या धोरणांशी जुळत नसत, यामुळे त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत विरोधाभास होता.
याच कारणांमुळे त्यांच्या सरकारला लोकांचा पाठिंबा कमी होत गेला. त्यांच्या पक्षाने त्यांना नेता म्हणून निवडले असले तरी, त्यांच्या कामगिरीमुळे पक्षातही त्यांच्याबद्दल नाराजी होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर जपानमध्ये आता कोण पंतप्रधान बनणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.