अनेकदा माध्यमांमध्ये साधी राहणीमान असलेल्या जागतिक नेत्यांची विशेष चर्चा होते. त्यांच्या राहणीमानाचे किस्से वारंवार सांगितले जातात. इन्स्टाग्रामवर हल्ली ऊरुग्वेच्या माजी राष्ट्राध्यक्षांची पोस्ट फिरतेय. जगातले सगळ्यात गरीब राष्ट्राध्यक्ष, अब्जपतीपेक्षांही आनंदात जगणारे राष्ट्राध्यक्ष जोस मुजिका अशी ही पोस्ट आहे. पुढे त्याचं राहणीमान आणि त्यांच्या विचारांबद्दल सांगितलं आहे.
जोस मुजिका हे व्यक्तिमत्व हे खरंच भारावून टाकणारं आहे. पण त्यांना ‘सगळ्यात गरीब राष्ट्राध्यक्ष किंवा नेता’ म्हणणं हे पटणारं नाही. का ते जाणून घेऊयात.
जोस मुजिका : शेतकरी, क्रांतिकारी ते राजकारणी
जोस मुजिका यांना ‘पेपे’ म्हणून ही ओळखलं जातं. शेतकरी, क्रांतिकारी आणि राजकारणी अशी त्यांची विशेष ओळख. 2010 ते 2015 पर्यंत त्यांनी ऊरुग्वेच्या राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. या कार्यकाळात त्यांनी स्वीकारलेलं साधं राहणीमान हा चर्चेचा विषय आहे. देशाचे प्रमुखपद हे जबाबदारीचं आणि सेवेसाठी असतं हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आहे. 2015 ते 2020 पर्यंत अध्यक्षपदानंतर मुजिका यांनी सिनेटर म्हणून काम सुरू ठेवले. 20 ऑक्टोबर 2020 रोजी, मुजिका यांनी वयाच्या कारणास्तव राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेत सिनेटरपदाचा राजीनामा दिला.
मुजिका यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. बेरोजगारीचा दर अर्ध्यावर आणला, गर्भपाताला गुन्हेगारीमुक्त केलं, गांजा सेवनाला औषध म्हणून कायदेशीर मान्यता दिली, समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता दिली, कामगार संघटनांना बळकटी देत किमान वेतनात लक्षणीय वाढ केली.
राष्ट्रध्यक्ष असूनही शासकीय घराऐवजी शेतावरील साध्या घरात
जोस मुजिका यांनी अध्यक्षपदाच्या काळातही राष्ट्राध्यक्षांकरता असणाऱ्या शासकीय भव्य घरात न राहता त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या शेतावरील साध्या घरात राहणं पसंत केलं. त्यांनी राष्ट्राध्यक्षांना दिला जाणारा लवाजामाही टाळला. दिमतीला नोकर, गाडी असं काहीच न घेता ते त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या तीन पायाच्या कुत्र्यासह शेतातल्या साध्या घरातच राहत होते. वाहतुकीचे साधन म्हणून 1987 ची फोक्सवॅगन बीटल आणि त्यांची 60 वर्षे जुनी सायकलच वापरली.
जनसामान्यांचे जीवन जगणारे राष्ट्राध्यक्ष
राष्ट्राध्यक्ष पदावर असतानाही उदरनिर्वाहासाठी ते शेती करत असत. मुजिका यांना अध्यक्ष म्हणून मिळणाऱ्या पगारापैकी 90 टक्के पगार ते जनतेसाठी दान करायचे. पदावर असूनही कोणत्याही वैद्यकीय चाचणीसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ते सामान्य लोकांसारखेच रांगेत उभे राहून उपचार करुन घ्यायचे. सिनेटर म्हणून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सिनेटर पदाची पेन्शन घेण्यास नकार दिला. त्याऐवजी हे पैसे गरजूंना देण्याची विनंती केली.
त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून 10 लाख 50 हजार 156 रुपये पगार दिला जायचा. त्यापैकी 90 टक्के पैसे ते स्वयंसेवी संस्थांना दान करायचे.
त्यांना देण्यात आलेल्या प्रायवेट जेटचं रुपांतर त्यांनी रेस्क्यू हेलिकॉप्टरमध्ये केलं. जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी हे हेलिकॉप्टर वापरण्यास दिलं.
मुजिका म्हणायचे की, मला सगळ्यात गरिब राष्ट्राध्यक्ष म्हणून संबोधतात, पण ऐषोआरामाच्या जीवनशैलीत जे जगतात ते लोक गरिब आहेत. कारण ती जीवनशैली मिळवण्यासाठी ते सतत पळत असतात. आणि कधीच समाधानी नसतात. ’
मुजिका यांची गरिब या संकल्पनेची व्याख्या अशी होती. त्यामुळे ते सगळ्यात गरिब राष्ट्राध्यक्ष नव्हते तर ते नम्र, उदार आणि जनतेसाठी जगणारे राष्ट्राध्यक्ष, नेते होते.