रोमेनियातील एका स्टार्टअप कंपनीने दृष्टीहीन व्यक्तींना इतर कोणत्याही मदतीशिवाय एकट्याने न अडता चालता येण्यासाठी एक नवीन एआय-आधारित चष्मा तयार केला आहे. या चष्म्यामुळे दृष्टीहीन व्यक्तींना चालण्यासाठी काठी किंवा ‘गाईड डॉग’च्या मदतीशिवाय ते सुरक्षितपणे चालू शकणार आहेत. या चष्म्यांमध्ये हॅप्टिक (तंत्रज्ञानाद्वारे स्पर्शाची ओळख) आणि आवाजाच्या साहाय्याने आजूबाजूचा 3D नकाशा तयार केला जाईल. त्यामुळे रस्ते,पायऱ्या तसेच चालताना येणारे अडथळे या गोष्टी ओळखता येतात आणि व्यक्तीला सुरक्षितपणे त्यांना ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे पोहोचता येणार आहे.
जगभरात 30 लाखाहून अधिक दृष्टीहीन व्यक्ती आहेत. दरवर्षी फक्त 2 हजार कुत्र्यांनाच विशेष प्रशिक्षण देता येऊ शकते. कारण त्यासाठी मोठा खर्च होतो. याच समस्येचा विचार करून “lumen” या चष्म्यावर काम सुरू होतं. यामुळे अंध लोकांसाठी एक नवा मार्ग खुला झाला आहे.
मार्गदर्शक प्रशिक्षित कुत्र्यांची मर्यादा आणि नवीन तंत्रज्ञानाची आवश्यकता
अनेक दृष्टीहीन व्यक्ती बाहेर प्रवास करताना मार्गदर्शक कुत्र्यांचा वापर करतात. मात्र, त्यांच्या संख्या अत्यंत मर्यादित आहे. सर्व दृष्टीहीन व्यक्तिंना मार्गदर्शक कुत्रे पाळणे शक्य होत नाही. तसेच, मार्गदर्शक कुत्र्यांचे प्रशिक्षण अत्यंत खर्चिक आहे आणि त्यांची देखभालही खूप कठीण आहे. त्यामुळे दृष्टीहीन व्यक्तींना स्वतंत्रपणे फिरण्यासाठी अधिक प्रभावी तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.
अंधत्वाचा परिणाम व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर होऊ शकतो. लहान मुलांना दृष्टी दोष असल्यास, त्यांच्या शारीरिक, भाषिक, भावनिक, सामाजिक आणि मानसिक विकास मंदावू शकतो. यामुळे त्यांचे शालेय जीवन, शिक्षण आणि शैक्षणिक यशावर मोठा परिणाम होऊ शकतो.
वृद्ध व्यक्तींना दृष्टी दोषांमुळे चालताना अडचणी येणं,पडण्याचा धोका आणि इतर समस्यांचा सामना करावा लागतो आणि त्यांच्या मानसिक स्तिथीवर देखील परिणाम होऊ शकतो.
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही दृष्टीहीन व्यक्ती प्रवास करताना चालण्याची काठी आणि मार्गदर्शक कुत्र्याचा वापर करतात. ही दोन्ही साधने अत्यंत जुनी आहेत. चालण्याची काठी फक्त एका मर्यादेपर्यंतच दृष्टीहीन व्यक्तीला मदत करते.यामुळे अंध व्यक्तींना पूर्ण माहिती मिळत नाही .
मार्गदर्शक कुत्रे रस्त्यातील अडथळे ओळखून रस्त्यावरून मदत करतात. परंतु त्यांचा सांभाळ करण्यासाठी जास्त खर्च होतो. मार्गदर्शक कुत्र्यांचे प्रशिक्षण खूप महाग आहे. या प्रशिक्षणाकरता साधारणपणे 35 ते 40 लाख रुपये खर्च येतो आणि त्यांची देखभालही खूप कठीण आहे.
lumen चष्म्यांची चाचणी 200 हून अधिक दृष्टीहीन व्यक्तींवर केली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रिया या सकारात्मक आहेत. यामुळे,lumen चष्मे दृष्टीहीन व्यक्तींसाठी एक स्वयंचलित, किफायतशीर आणि प्रभावी उपाय ठरू शकतात.
नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग लक्षात घेता, दृष्टीहीन व्यक्तींसाठी lumen चष्म्यांमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान स्वयंचलित ड्रायव्हिंग आणि रोबोटिक्सच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. परंतु lumen च्या चष्म्यांमध्ये हे तंत्रज्ञान एका सोप्या आणि वापरण्यास सहज प्रणालीमध्ये रूपांतरित केले आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे अंध व्यक्तींना स्वतंत्रपणे फिरता येईल.