परदेशात जाऊन स्थायिक होण्याचं स्वप्न अनेक भारतीय तरुणांचं असतं. यामध्ये अमेरिका हा महत्त्वाचा देश आहे. अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं की तिथे कायमस्वरूपी राहण्याचा आणि काम करण्याचा अधिकार मिळतो. पण, आता मात्र अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळवणं पूर्वीसारखं सोपं राहिलेलं नाही. अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने (USCIS) नुकतेच ग्रीन कार्डच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे मोठे बदल केले आहेत.
अनेक लोक फक्त ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी खोटं लग्न करतात. यामुळे इमिग्रेशन प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास कमी होतं आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठीच USCIS ने हे नवीन नियम आणले आहेत. या नवीन नियमांमुळे नक्की काय बदल होणार आहेत आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे सविस्तर जाणून घेऊया
ग्रीन कार्डसाठी कठोर नियम
यूएस सिटिजनशिप अँड इमिग्रेशन सर्विसेस (USCIS) ने ग्रीन कार्डसाठी विवाह-आधारित अर्जांसाठी नियम कडक केले आहेत. 1 ऑगस्ट 2025 पासून, ग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्या जोडप्यांना आता त्यांच्या लग्नाचा पुरावा म्हणून अधिक मजबूत आणि ठोस पुरावे सादर करावे लागतील.
हे नवीन नियम USCIS च्या “फॅमिली बेस्ड इमिग्रेंट्स” पॉलिसी मॅन्युअलमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या बदलांनुसार, ग्रीन कार्डसाठी अर्ज करताना जोडप्यांना त्यांचे नाते खरे आहे हे सिद्ध करणे आवश्यक असेल.
काय आहेत नवीन नियम?
आता केवळ लग्नाचे प्रमाणपत्र पुरेसे नाही. ग्रीन कार्ड अर्जदारांना आता त्यांच्या नात्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी इतरही कागदपत्रं सादर करावी लागणार आहे.
संयुक्त बँक खाते: पती-पत्नीचे एकत्र बँक खाते आणि त्याचे तपशील.
एकत्रित खर्च: घरखर्च किंवा इतर बिलांचे पुरावे.
फोटो आणि व्हिडिओ: लग्नाचे किंवा इतर कार्यक्रमांमधील त्यांचे एकत्र फोटो आणि व्हिडिओ
प्रत्येक जोडप्यासाठी मुलाखत अनिवार्य
पूर्वी काही जोडप्यांना मुलाखतीशिवाय ग्रीन कार्ड मिळत असे, पण आता तसे होणार नाही. प्रत्येक जोडप्याला मुलाखत देणे बंधनकारक आहे. या मुलाखतीत अधिकारी तुमच्या वैवाहिक जीवनाबद्दल प्रश्न विचारून तुमच्या नात्याची सत्यता पडताळतील.
हेही वाचा : अमेरिकेचा भारतावर 25 टक्के अतिरिक्त (दंडात्मक) टेरिफ
जुन्या अर्जांची कसून तपासणी
जर एखाद्या व्यक्तीने यापूर्वी ग्रीन कार्डसाठी अर्ज केला असेल किंवा एकापेक्षा जास्त वेळा अर्ज केला असेल, तर त्याच्या अर्जाची अधिक चौकशी केली जाईल. USCIS अशा अर्जांकडे संशयाने पाहणार आहे, कारण अनेक लोक गैरवापर करण्यासाठी वारंवार अर्ज करतात.
संपूर्ण इमिग्रेशन इतिहासाची तपासणी
जर तुम्ही अमेरिकेत आधीपासूनच H-1B किंवा इतर व्हिसावर असाल आणि आता लग्न करून ग्रीन कार्डसाठी अर्ज करत असाल, तर तुमच्या संपूर्ण इमिग्रेशन इतिहासाची कठोरपणे तपासणी केली जाईल. तुम्ही अमेरिकेत कधी आलात आणि कोणत्या व्हिसावर आलात, याची सविस्तर माहिती तपासली जाईल.
अर्ज मंजूर झाल्यावरही धोका कायम
या नवीन नियमांनुसार, तुमचा ग्रीन कार्डसाठी अर्ज मंजूर झाला तरी तुम्हाला लगेच कायदेशीर दर्जा (legal status) मिळणार नाही. याआधी अर्ज मंजूर झाला की ग्रीन कार्ड लगेच मिळायचे, पण आता तसे होणार नाही.
तुमचा अर्ज मंजूर झाला असला, तरी जर तपासणीत तुम्ही अमेरिकेच्या इमिग्रेशन कायद्यांनुसार पात्र नसाल. तर तुम्हाला थेट देशातून बाहेर काढण्याची नोटीस (Notice to Appear – NTA) दिली जाऊ शकते.
हे नवीन नियम संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक बनवण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. जर तुम्ही खरेच पात्र असाल आणि तुमचं नातं खरं असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. फक्त अर्ज करताना अधिक काळजी घ्या आणि आवश्यक सर्व कागदपत्रे योग्य प्रकारे सादर करा.