सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण सर्वच जण स्मार्टफोनला चिकटून असतो. हा आपला रोजचा अनुभव आहे, नाही का? पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की हे केवळ ‘जास्त वेळ फोन वापरणं’ एवढ्यापूरताच मर्यादित नाही, तर हे एक गंभीर व्यसन आहे. याला वैद्यकीय भाषेत ‘नोमोफोबिया’ (Nomophobia) असं म्हणतात.
तुम्ही म्हणाल, “मी कुठे व्यसनी आहे? मला गरजेपुरताच फोन लागतो!” पण जरा थांबा. याआधी तुम्हालाही यातील काही गोष्टी जाणवतात का ते बघा.
– ऑफिसमध्ये तुम्ही मोकळे बसलेले असाल किंवा जेवणाच्या टेबलावर असाल तेव्हा तुम्ही नकळत फोन हातात घेता का?
– तुम्ही ठरवता, ‘आता फक्त 5 मिनिटं रील पाहतो’, पण कधी त्याचा एक तास होतो ते कळतच नाही.
– तुम्ही कंटाळलात, तणावात आहात किंवा एकटेपणा जाणवतोय, तर लगेच फोनमध्ये डोकं खुपसता का?
जर या गोष्टी तुमच्यासोबतही होत असतील, तर तुम्ही नकळत मोबाईलच्या विळख्यात अडकत चालला आहात. मोबाईलचे व्यसन म्हणजे फक्त सोशल मीडियावर वेळ घालवणे नाही. तर ती अशी स्थिती आहे, जिथे तुम्हाला मोबाइलची इतकी सक्तीने गरज वाटते की तुम्ही तुमच्या इतर कामांकडे दुर्लक्ष करता.
हे व्यसन कसं लागतं?
हे व्यसन काही एका रात्रीत लागत नाही, तर हळूहळू तुमच्या मेंदूवर याचा परिणाम होतो.
1. डोपामिनचा खेळ : सोशल मीडियावर तुम्हाला तुमच्या एखाद्या पोस्टवर लाईक मिळतो किंवा तुम्ही एखादा मेसेज वाचता , छोटा व्हिडिओ पाहता तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामिन नावाचं एक रसायन तयार होतं. या रसायनामुळे तुम्हाला आनंदी आणि उत्साहित वाटते. आणि हा छोटासा आनंद परत मिळवण्यासाठी तुमचा मेंदू तुम्हाला वारंवार फोन वापरायला सांगतो. हाच डोपामिन लूप तुम्हाला फोनच्या जाळ्यात अडकवतो.
2. झटपट समाधान : आजकालच्या जगात प्रत्येक गोष्ट लगेच मिळते. एक बटन दाबलं की व्हिडिओ सुरू होतो, स्वाईप केलं की नवीन रील समोर येते. या झटपट समाधानाची सवय लागल्यामुळे आपली सहनशीलता आणि संयम कमी होतो. आपल्याला वाटतं की प्रत्येक गोष्टीचे उत्तर लगेच मिळावे.
3. दुःख आणि कंटाळा टाळणे : जेव्हा आपल्याला कंटाळा येतो किंवा एखादं काम करायचं नसतं, तेव्हा आपण फोन वापरतो. यामुळे आपण आपल्या मनातील अस्वस्थता, दुःख किंवा कंटाळा टाळतो. पण हे तात्पुरतं समाधान आहे. या सवयीमुळे आपण आपल्या भावनांवर योग्यप्रकारे काम करायला विसरतो.
मोबाईलच्या व्यसनाचे जीवनावर होणारे परिणाम
मानसिक आरोग्य : मोबाईलच्या सतत वापरामुळे आपल्या मेंदूला शांतता मिळत नाही. यामुळे चिंता (anxiety), बेचैनी आणि सतत विचार करण्याची सवय लागते. शांतपणे एका जागी बसणंही अवघड होऊन जातं.
एकाग्रता कमी होणे : तुमचे लक्ष एका गोष्टीवर जास्त वेळ टिकत नाही. अभ्यास करताना किंवा काम करताना लक्ष लागत नाही. यामुळे तुमची अभ्यास करण्याची क्षमता आणि कामातील कार्यक्षमता दोन्ही कमी होतात.
नात्यांमधील दुरावा : तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत असतानाही फोनमध्येच रमलेले असता. त्यामुळे त्यांच्याशी बोलणं कमी होतं आणि नात्यांमध्ये आपलेपणा कमी होऊन माणसं एकमेकांपासून दुरावतात.
शारीरिक त्रास : सतत फोनच्या वापराने मान आणि पाठ दुखते, डोळ्यांवर ताण येतो आणि झोपेच्या वेळा बिघडतात.
या व्यसनातून बाहेर कसं पडायचं?
1. तुमच्या वापराचे झोन ओळखा
रेड झोन : जेव्हा तुम्ही विनाकारण सोशल मीडियावर वेळ घालवता.
यलो झोन : जेव्हा तुम्ही गरजेसाठी फोन वापरता, पण जास्त वेळ वापरता.
ग्रीन झोन : जेव्हा तुम्ही विचारपूर्वक आणि उद्देशाने फोन वापरता.
ब्लू झोन : जेव्हा तुम्ही फोनला स्पर्शही करत नाही आणि पूर्णपणे तुमच्या कामात व्यस्त असता.
या झोनप्रमाणे तुम्ही हळूहळू रेड आणि यलो झोनचा वापर कमी करून ग्रीन आणि ब्लू झोनमध्ये जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा.
2. छोटे बदल करा
तुमच्या फोनमधील व्यसनी ॲप्स जसे की, सोशल मीडिया, गेमिंग ॲप डिलीट करा किंवा त्यांचे नोटिफिकेशन बंद करा.
जेवण करताना किंवा अभ्यास करताना फोन दुसऱ्या खोलीत ठेवा.
तुमच्या फोनचा रंग ग्रेस्केल करा. यामुळे तुम्हाला रंगीत गोष्टींचा आनंद मिळणार नाही आणि तुम्ही कमी फोन वापराल.
फोनऐवजी दुसरे छंद जोपासा. जसे की, पुस्तक वाचणे, मित्र-मैत्रिणींना भेटणे, एखादा खेळ खेळणे किंवा नवीन काहीतरी शिकणे.
3. 1 आठवड्याचा ‘रिसेट’ प्रयोग
हा एक सोपा प्रयोग आहे, जो तुम्हाला तुमच्या सवयी बदलण्यासाठी मदत करेल.
दिवस 1-2 : तुमच्या फोनचा ‘स्क्रीन टाइम’ किती आहे, ते रोज तपासा.
दिवस 3-4 : रोज 2 तास ‘नो-फोन’ वेळ ठरवा. त्या वेळेत फोनला स्पर्शही करू नका.
दिवस 5-6 : 24 तास सोशल मीडिया वापरू नका.
दिवस 7 : सकाळी उठल्यापासून दुपारपर्यंत फोनला हात लावू नका.
हा प्रयोग तुम्हाला तुमच्या मेंदूवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करेल.