बाहेरील आवाजांमुळे एखादं संगीत किंवा मुलाखत ऐकताना हेडफोन्स घालूनही त्या कलाकृतीचा आनंद घेता येत नाही. आपण काम करतोय, ऑनलाईन मिटिंग चालू आहे पण आपल्या आजूबाजूला खूप गोंधळ, मोठे आवाज आहेत. यामुळे कामामध्ये व्यत्यय येत राहतो. बाहेरील त्रासदायक आवाज कमी करणारे हेडफोन्स बाजारात आले आहेत तरी, ते फारसे परिणामकारक नाहीत. कारण हे हेडफोन्स सगळेच आवाज कमी करतात. त्यामुळे हवा तो आवाजही दबला जातो. तर आता या सगळ्या त्रासातून आपली सुटका होणार आहे. आता हेडफोन्समध्येही एआय (AI) बुद्धिमत्तेचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे हे हेडफोन अधिक स्मार्ट आणि प्रभावी बनले आहेत. नवीन तंत्रज्ञानामुळे हेडफोनद्वारे जास्त आवाज असलेल्या परिस्थितीतही वापरकर्त्यांना स्पष्ट संवाद साधणे सोपे होणार आहे.
विशिष्ट आवाज ओळखण्यासाठी प्रोग्राम
साधारणतः आवाज कमी करणारे हेडफोन सर्व आवाज कमी करतात. परंतु नवीन तंत्रज्ञानामुळे यात सुधारणा झाली आहे. हे हेडफोन विशिष्ट आवाज ओळखून त्यावर AI टेक्नोलॉजीचा वापर करून इतर आवाज कमी करतात. यामुळे वापरकर्त्याला फक्त तो विशिष्ट आवाजच ऐकता येईल. त्यासाठी हे AI हेडफोन डिझाइन केले आहेत.
हे तंत्रज्ञान वॉशिंग्टन विद्यापीठ, मायक्रोसॉफ्ट आणि असेंब्ली एआय यांसारख्या मोठ्या संस्थांकडून विकसित करण्यात आले आहे. हेडफोनमधील मायक्रोफोन विविध आवाजांचे विश्लेषण करतात आणि त्यासाठी न्यूरल नेटवर्कचा वापर केला जातो. या नेटवर्कच्या साहाय्याने आवाज स्रोताचे अंतर मोजले जाते, त्यामुळे एका ठराविक क्षेत्रातील आवाज अधिक स्पष्ट ऐकता येतो.
साउंड फिल्टरींग
साधारणतः ह्या क्षेत्राची मर्यादा 1 ते 2 मीटर असते. यामुळे बाहेरील आवाजांपासून संरक्षण मिळवून वापरकर्त्याला अधिक स्पष्ट संवाद साधता येतो. हे तंत्रज्ञान वेगवेगळ्या आवाजांच्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकते आणि अधिक प्रभावी साउंड फिल्टरिंग करण्यात सक्षम आहे. त्यामुळे जास्त आवाज असलेल्या ठिकाणीही तुम्हाला संवाद साधता येईल.
श्रवणयंत्रामध्ये AI तंत्रज्ञानामुळे खूप मोठा फायदा
हे तंत्रज्ञान नॉईस कॅन्सलिंग हेडफोन, श्रवण यंत्रे आणि इतर अनेक श्रवण उपकरणांमध्ये वापरले जाऊ शकते. यामुळे आवाजाचे प्रभावी फिल्टरिंग होईल आणि जास्त स्पष्ट संवाद साधता येईल.
हे तंत्रज्ञान जास्त गोंधळ असलेल्या वातावरणात संवाद साधताना मोठा फायदा होईल. विशेषतः व्यवसायिक लोक, विद्यार्थी आणि इतर लोक जे जास्त आवाज असलेल्या ठिकाणी काम करतात, त्यांना हे हेडफोन अधिक उपयोगी पडू शकतात