ड्यूक युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी एक नवा शोध लावला आहे, यामुळे आता स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता पाच वर्षे आधीच लक्षात येणार आहे. या शोधामुळे डॉक्टरांना आधीच कळेल की, कोणत्या महिलांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका जास्त आहे आणि त्यावर त्वरित उपचार घेता येतील.
नवीन AI प्रणालीचे नाव “AsymMirai” आहे, हे एक साधं डीप-लर्निंग अॅल्गोरिदम आहे. या प्रणालीचा वापर करून डॉक्टर स्तनाच्या छायाचित्रांमधील फरकांचा अभ्यास करून, कर्करोग होण्याची शक्यता आहे का नाही हे सांगू शकतील.
ड्यूक युनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी “AsymMirai” प्रणालीचा वापर करून मॅमोग्राफीमधील डाव्या आणि उजव्या स्तनाच्या टिश्यूमधील फरक तपासले. यापूर्वी, कर्करोगाच्या अंदाजासाठी या घटकाचा उपयोग फारसा केला जात नव्हता. पण या नवीन पद्धतीमुळे AI प्रणालीने अधिक अचूकता प्राप्त केली आहे. यामुळे रेडियोलॉजिस्टसाठी निर्णय घेणं सोपं आणि विश्वासार्ह झालं आहे.
या संशोधनात 2 लाख 10 हजारांहून अधिक स्तनाच्या छायाचित्रांचा अभ्यास केला गेला. यातून असे लक्षात आले की, स्तनांचा आकार समान नसेल, तर कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, अमेरिकेत प्रत्येक आठव्या महिलेला म्हणजेच 13% महिलांना आयुष्यात कधीतरी स्तन कर्करोग होतो आणि त्यातल्या 3% महिलांचा या आजाराने मृत्यू होतो. नियमित मॅमोग्राफी केल्याने स्तन कर्करोगाने मृत्यू होण्याचा धोका कमी होऊ शकतो.
‘Mirai’ हा एक अत्याधुनिक डीप लर्निंग अल्गोरिदम आहे, जो स्तनाच्या कर्करोगाचा अंदाज लावण्यासाठी उपयोगी आहे, पण हा एक ब्लॅक बॉक्स आहे. याच्या निर्णय पद्धतीबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे डॉक्टर व रेडियोलॉजिस्ट यावर अवलंबून राहिले तरी काहीवेळा चुकीचे निदान होण्याची शक्यता आहे.
ड्यूक विद्यापीठातील संगणक विज्ञान विभागातील पीएचडी विद्यार्थी जॉन डॉनेली यांनी सांगितले की, “आम्ही ‘AsymMirai’ नावाची एक नवीन आणि समजण्यास सोपी AI प्रणाली तयार केली आहे, जी ‘Mirai’ पेक्षा समजण्यास सोपी आहे. यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा अंदाज 5 वर्षांआधीच लावता येईल आणि या संशोधनामुळे डॉक्टर स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता आधीच सांगू शकतील.