सोशल मीडियावरील लहान मुलांची सुरक्षितता लक्षात घेता मेटा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. मेटाच्या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर आता लहान मुलांसाठी अधिक सुरक्षित बनवले जाणार आहेत. त्यासाठी मेटा कंपनीने एआय तंत्रज्ञान अधिक प्रभावीपणे वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
जर एखादं 18 वर्षांखालील मूल चुकीची जन्मतारीख टाकून इंस्टाग्राम वापरत असेल, तर आता मेटाचं एआय तंत्रज्ञान त्याच खरं वय ओळखू शकेल. कंपनीने ही प्रणाली याआधीपासून वापरत असल्याचं सांगितलं आहे. मात्र आता ती अधिक अचूक आणि काळजीपूर्वक वापरली जाणार आहे.
मेटा कंपनीने का उचलले हे पाऊल?
गेल्या काही वर्षांपासून मेटा कंपनीवर अनेक वेळा टीका झाली होती. कारण लहान मुलांची माहिती सुरक्षित ठेवण्यात काही त्रुटी आढळल्या होत्या. त्यांच्या प्रायव्हसीचे उल्लंघन आणि मानसिक आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम याबद्दल चिंता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर मेटाने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
गेल्या वर्षी, इंस्टाग्रामने लहान मुलांसाठी खास अकाउंट्स सुरू केले होते. कारण इंस्टाग्राम वापरण्याचा लहान मुलांच्या मनावर आणि आयुष्यावर काय परिणाम होतो, याबद्दल बरीच चर्चा झाली होती. आता याच महिन्याच्या सुरुवातीला, हे लहान मुलांसाठीचे खास अकाउंट्स फेसबुक आणि मेसेंजर या मेटाच्या इतर ॲप्सवर सुद्धा सुरू करण्यात आले आहेत. याचा अर्थ, आता फेसबुक आणि मेसेंजरवर सुद्धा लहान मुलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
एआय कशा प्रकारे मदत करेल?
जेव्हा एआयला लक्षात येईल की एखादा वापरकर्ता त्याचे खरे वय लपवत आहे. तेव्हा त्याचे अकाउंट आपोआप ‘टीन अकाउंट’ मध्ये बदलले जाईल. या टीन अकाउंटवर मोठ्या लोकांच्या अकाउंट्सच्या तुलनेत अधिक निर्बंध असतील. लहान मुलांची सुरक्षितता आणि गोपनीयता जपण्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
टीन अकाउंट हे बाय डिफॉल्ट प्रायव्हेट असतात. त्यामुळे 18 वर्षांखालील मुलांना अनोळखी लोकांशी संपर्क साधता येणार नाही. त्यांना फक्त त्यांच्या फॉलोअर्सचे किंवा जे त्यांच्याशी पूर्वीपासून जोडलेले आहेत, त्यांचेच मेसेज वाचता येतील आणि त्यांना रिप्लाय देता येईल.
याव्यतिरिक्त, मेटा कंपनीने असं सांगितलं आहे की इंस्टाग्रामवरील ‘सेन्सिटिव्ह्ह कंटेंट’ जसे की मारामारीचे व्हिडिओ किंवा सौंदर्य प्रसाधनांना प्रोत्साहन देणारे व्हिडिओ हे लहान मुलांना कमी प्रमाणात दिसतील.
यासोबतच, लहान मुलांच्या स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवण्यासाठी लहान मुले इंस्टाग्रामवर 60 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवत असतील, तर त्यांना सूचना मिळतील. रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत ‘स्लीप मोड’ सुरू केला जाईल. यामुळे नोटिफिकेशन्स बंद होतील आणि डायरेक्ट मेसेजला ऑटो-रिप्लाय जाईल.
मेटा कंपनीने हे देखील सांगितले आहे की त्यांनी एआय मॉडेलला लहान मुलांच्या अकाउंटची काही वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी तयार केले आहे. उदाहरणार्थ, एखादे अकाउंट कशा प्रकारचे पोस्ट्स पाहतो, प्रोफाइलमधील माहिती आणि अकाउंट कधी तयार करण्यात आले यावरून एआयला अंदाज येईल की वापरकर्ता लहान आहे की मोठा.
हे ही वाचा :‘कॅप्चा’ : इंटरनेटवरील धोक्यांपासून वाचवणारा ‘सुरक्षा कवच’!
लाईव्ह स्ट्रीमिंगवर निर्बंध आणि पालकांची परवानगी
नवीन नियमांनुसार, 16 वर्षांखालील लहान मुलांना आता त्यांच्या अकाउंटवरून लाईव्ह स्ट्रीमिंग करता येणार नाही. जोपर्यंत त्यांच्या पालकांची परवानगी मिळत नाही. तसेच, सेन्सिटिव्ह्ह कंटेंट ब्लर करण्याचे फीचर बंद करण्यासाठी सुद्धा त्यांना त्यांच्या पालकांची परवानगी घ्यावी लागेल.
मेटाचे हे नवीन प्रयत्न लहान मुलांना ऑनलाइन जगात सुरक्षित ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नवीन नियमांमुळे इंस्टाग्राम आता लहान मुलांसाठी अधिक सुरक्षित प्लॅटफॉर्म बनेल.