काश्मीर आणि दहशतवाद या दोन विषयावर भारत कोणत्याच देशाची मध्यस्थी ऐकणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

India - America : पाकिस्तानच्या संदर्भात दहशतवाद आणि काश्मीरच्या मुद्यावर भारताने आतापर्यंत कधीच कोणत्याच देशाची मध्यस्थी स्विकारली नाही आणि यापुढेही स्विकारणार नाही. या मुद्यावर भारतातल्या सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत आहे.
[gspeech type=button]

‘काश्मीर आणि दहशतवाद या दोन मुद्यांवर भारत कोणत्याही देशाची मध्यस्थी ऐकणार नाही’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितलं.  मंगळवार दिनांक 17 जून 2025 रोजी पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी फोनवरून संवाद साधला.

यावेळी दोन्ही राष्ट्रांच्या प्रमुखांमध्ये ऑपरेशन सिंदूर, मध्य पूर्व आणि युरोपमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण स्थितीवर चर्चा झाली. याशिवाय क्वाड फ्रेमवर्क अंतर्गत इंडो-पॅसिफिकमधील करारासंबंधित चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.  

भारत – पाकिस्तान संघर्षादरम्यान अमेरिकेने व्यापाराच्या मुद्यांवरुन मध्यस्थी केल्यामुळे युद्धबंदी झाली, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे वेळोवेळी करत आहेत. पण या संघर्षावेळी पाकिस्तानने थेट भारताशी संपर्क साधून युद्धबंदी करण्याची विनंती केली. ही विनंती भारताने मान्य केली आणि मग युद्धबंदी झाली, या तथ्यावर पंतप्रधान मोदी ठाम राहिले आहेत. 

दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या फोनवरील संभाषणामध्येही पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा चर्चेत घेतला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “भारत-पाकिस्तान संघर्षावेळी भारत – अमेरिका दरम्यान व्यापारा संबंधित किंवा पाकिस्तानच्या विरोधातलं युद्धबंदी संबंधात कोणत्याच पातळीवर चर्चा झाली नव्हती”, अशी माहिती, मिस्री यांनी माध्यमांना दिली. 

ट्रम्प यांनी फोनवरुन संवाद साधला

परराष्ट्र सचिव मिस्री यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरम्यान फोनवरुन झालेल्या संभाषणाचं निवेदन माध्यमांना दिलं. कॅनडा इथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होणार होती. मात्र, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प त्यांच्या वेळापत्रकात बदल करत कॅनडामधून लवकर बाहेर पडल्यामुळे ही भेट झाली नाही. मात्र, ट्रम्प यांच्या विनंतीमुळे दोन्ही देशांच्या प्रमुखांनी फोनवरुन साधारण 35 मिनिटे संवाद साधला. 

या संभाषणावेळी सगळ्यात पहिल्यांदा ट्रम्प यांनी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात शोक व्यक्त केला आणि दहशतवाद विरोधातल्या लढाईला पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल विस्तृत चर्चा केली. 

22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेणार असल्याचं जगासमोर स्पष्ट केलं होते. त्यानुसार, 7 मे च्या मध्यरात्री भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधल्या दहशतवादी तळांवर नेमका हल्ला केला. हा हल्ला अचूक होता. यातून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी कारवायांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जाईल हे भारताने दाखवून दिलं. 

हे ही वाचा : ऑपरेशन सिंदूर-भारताचा पीओकेवर क्षेपणास्त्र हल्ला

9 मे च्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी पंतप्रधानांशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांनी पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करु शकतो अशी शक्यता व्यक्त केली होती. जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला तर भारत आणखीन कडक भाषेत पाकिस्तानला प्रत्युत्तर देईल, असं मोदींनी त्यांना कळवलं.  त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या हल्ल्यांचा प्रतिकार म्हणून पाकिस्तानचे लष्करी हवाई तळ उद्धवस्त केले. या घटनेनंतर पाकिस्तानने हा संघर्ष थांबवण्याची विनंती भारताकडे केली. 

या संपूर्ण घटनेवेळी भारत – अमेरिका व्यापार किंवा हा संघर्ष थांबविण्यासाठी अमेरिका मध्यस्थी करेल अशा कोणत्याच विषयावर भारत आणि अमेरिका दरम्यान चर्चा झाली नव्हती, असं पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे ट्रम्प यांना सांगितलं. 

भारत-पाकिस्तान दरम्यानचा संघर्ष थांबवण्याची चर्चा ही थेट दोन्ही देशांतील लष्करी कारवायातील प्रमुखांमध्ये झाली होती. आणि यातही पाकिस्तानने हा संघर्ष थांबवण्याची विनंती केली होती. 

दरम्यान, पाकिस्तानच्या संदर्भात दहशतवाद आणि काश्मीरच्या मुद्यावर भारताने आतापर्यंत कधीच कोणत्याच देशाची मध्यस्थी स्वीकारली नाही आणि यापुढेही स्वीकारणार नाही. या मुद्यावर भारतातल्या सर्वपक्षीय नेत्यांचं एकमत आहे. 

भारताच्या दहशतवाद विरोधातल्या लढाईला पाठिंबा

ट्रम्प यांनी मोदी यांचं संपूर्ण संभाषण ऐकून घेतलं. त्यांनी भारताच्या दहशतवाद विरोधातल्या लढाईला पाठिंबा दर्शवला. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं की, दहशतवादी कारवायांना भारत आता यापुढे ‘प्रॉक्सी वॉर’ म्हणून नाही तर ‘युद्ध’ म्हणूनच ग्राह्य धरणार आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन सिंदूर’ हे  अजुनही सुरु आहे आणि असंच सुरु राहिल. 

याशिवाय दोन्ही देशांच्या प्रमुखांनी सध्या सुरु असलेल्या इराण- इस्रायल संघर्षावर आणि रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांदरम्यानही शांती प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा केली. 

इंडो-पॅसिफिक प्रदेशाबाबत, दोन्ही नेत्यांनी त्यांची मतं व्यक्त केली. या प्रदेशात क्वाडच्या भूमिकेला त्यांनी पाठिंबा दर्शवला. पंतप्रधान मोदी यांनी क्वाड संघटनेच्या आगामी  शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना भारत भेटीचं आमंत्रण दिलं. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हे आमंत्रण स्वीकारुन भारत भेटीसाठी उत्सुक असल्याचं सांगितलं.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ