तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी कोणत्या वाहनाने प्रवास करता? निश्चितच गाडी, रिक्षा, कार, बस आणि मेट्रो सिटीमध्ये काम करत असाल तर मेट्रो किंवा लोकल ट्रेनचा वापर करत असाल. अगदी घराच्या परिसरातच नोकरी करणारे तर चालत किंवा सायकलीचा वापर करत असतील. पण दररोज नोकरीसाठी विमानाने प्रवास करायचा असेल तर?
काही उद्योजक हे कामासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात जलद गतीने ये – जा करण्यासाठी चार्टड प्लेनचा वापर करतात. पण हे व्यावसायिक असतात. मलेशिया मध्ये मात्र चक्क एक असिस्टंट मॅनेजर पदावर काम करणाऱ्या रेचल कौर या दररोज विमानाने ऑफिसला ये – जा करतात.
दररोज 350 किमीचा हवाई प्रवास
रेचल कौर या मलेशियामध्ये एअर आशिया या विमान कंपनीमध्ये काम करतात. त्या मलेशियामधल्या पेनांग राज्यात राहतात. आणि त्याचं ऑफिस हे मलेशियाचं राजधानी शहर कुआला लंपूर येथे आहे. या दोन्ही राज्यामध्ये तब्बल 350 किलोमीटरचं अंतर आहे. भारतातील राज्यानुसार मुंबई ते औरंगाबाद किंवा दिल्ली ते सिमला एवढं हे अंतर आहे.
रेचल कौर या सकाळी 5 वाजता घरातून बाहेर पडतात. 5.55 वाजता त्या विमानात बसतात आणि प्रवासाला सुरुवात करतात. त्यानंतर संध्याकाळी ठीक 8 वाजता त्या घरी पोहोचतात.
दररोज विमान प्रवास करण्याचा निर्णय का घेतला?
रेचल कौर या सुरुवातीला कुआला लंपूर या शहरातच राहून आपली नोकरी करत होत्या. पूर्ण आठवडा इथे राहून नोकरी केल्यावर सुट्टीच्या दिवशी त्या पेनांग इथे आपल्या घरी जात असत आणि कुटुंबासोबत वेळ घालवत असतं. त्यांना दोन मुलं आहेत. आपल्या मुलांसोबत वेळ घालवता यावा यासाठी त्यांनी घरापासून लांब राहण्याऐवजी दररोज विमान प्रवास करुन आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला.
विमान प्रवास म्हणजे ‘मी टाइम’
रेचल कौर यांचा हा प्रवास आणि दिनचर्या ही आपल्याला थकवणारी वाटत असेल. पण रेचल कौर म्हणतात उलट या प्रवासाच्या निमित्ताने त्यांना त्यांच्या स्वत:साठी वेळ मिळतो. या प्रवासात त्या विश्रांती घेतात, गाणी ऐकतात, काही गोष्टींवर विचार करतात, आजूबाजूचं नैसर्गिक सौदर्यं न्याहाळतात अशा पद्धतीने ते या वेळेचा चांगला उपयोग करुन घेतात.
आर्थिक फायदा
या प्रवासामुळे रेचल हिची आर्थिक बचत सुद्धा होते. कुआला लंपूर येथे राहणं, खाणं-पिणं यासाठी रेचलला 474 डॉलर म्हणजे 42 हजार रुपये मोजावे लागत असतं. तर पेनांग ते कुआला लंपूर विमान प्रवासासाठी रेचलला 316 डॉलर म्हणजे 28 हजार रुपये मोजावे लागतात. अशा पद्धतीने रेचलची महिन्याकाठी 14 हजार रुपयाची बचत सुद्धा होत आहे.
वर्क फ्रॉम होमचा पर्याय का नाही स्विकारला?
कोरोना काळापासून जगभरात अनेक कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला जातो. तेव्हा रेचलने सुद्धा आपल्या कंपनीकडून हा पर्याय का नाही घेतला असा प्रश्न आपल्याला पडलाच असेल.
यावर रेचल सांगते की, ऑफिसमधल्या वातावरणामध्ये एक वेगळी ऊर्जा असते. तेथे आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून काम करताना खूप गोष्टी शिकता येतात. त्यातून कार्यक्षमता वाढते. त्याऐवजी घरातून काम करताना एकलकोंडेपणा वाढतो. कार्यक्षमतेवर परिणाम होतो. सामाजिक संबंध कमी व्हायला लागतात.
त्यामुळे ऑफिसमध्ये जाऊन काम करण्याचा पर्याय रेचल यांनी स्वीकारला आणि तिची कंपनी सुद्धा तिला त्यासाठी पाठिंबा देऊन तिला सहकार्य करते. महत्वाचं म्हणजे त्या विमानकंपनीत असल्यानं रेचल यांचं कंपनीच्या विमानप्रवासावर स्वतःचं रोजचं निरीक्षण राहत असणार. म्हणजे एक प्रकारे हा त्यांच्या कामाचाच भाग असू शकतो.