कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी एक आश्चर्यजनक शोध लावला आहे. त्यांनी असा एक रंग पाहिला आहे जो आजवर कोणालाही दिसलेला नव्हता. आणि हा रंग फक्त एका विशिष्ट प्रयोगाद्वारेच पाहता येतो. या नवीन रंगाला त्यांनी ‘ओलो’ (Olo) असे नाव दिलं आहे.
कसा लागला ओलो रंगाचा शोध?
या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी काही लोकांच्या डोळ्यांतील पेशींवर लेझर किरणांचा वापर केला. डोळ्याच्या पडद्यावर (retina) रंग ओळखण्यासाठी तीन प्रकारच्या शंकू पेशी असतात – L (लांब), M (मध्यम) आणि S (लहान). हे शंकू विविध प्रकारच्या प्रकाशलहरींच्या आधारावर रंगांना ओळखतात.
बर्कले येथील शास्त्रज्ञांच्या टीमने या नैसर्गिक मर्यादेला ओलांडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी एका व्यक्तीच्या डोळ्याच्या पडद्याचा लहान भाग तपासला आणि त्याच्यातील M शंकूंची नेमकी जागा शोधली. त्यानंतर त्यांनी लेझर वापरून त्या भागाची तपासणी केली. जेव्हा लेझर M शंकूच्या बरोबर रेषेत आले तेव्हा त्यांनी त्या एका पेशीला प्रकाशाचा एक छोटा आणि अचूक पल्स दिला आणि मग ते पुढच्या पेशीकडे वळले. अशा प्रकारे त्यांनी एका विशिष्ट पद्धतीने डोळ्यातील पेशींना उत्तेजित केले. आणि यामुळे एक असा रंग दिसला जो सामान्य प्रकाशात किंवा नैसर्गिक परिस्थितीत कधीच दिसू शकत नाही.
‘ओलो’ रंग नेमका कसा आहे?
हा रंग शब्दांत सांगणे फार कठीण आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले. प्रयोगात सहभागी झालेल्या पाच लोकांनी सांगितले की हा रंग काहीसा “निळसर-हिरव्या” (turquoise) रंगासारखा वाटतो. पण त्याहूनही अधिक वेगळा, तेजस्वी आणि अनोखा आहे. हा रंग पाहताना नेहमीचे रंग पाहतो त्यापेक्षा फारच वेगळा अनुभव मिळतो.
शास्त्रज्ञ रेण एनजी म्हणतात, “आम्ही जाणून होतो की हा रंग खूप वेगळा असेल, पण मेंदू त्यावर कसा प्रतिसाद देईल याची कल्पना नव्हती. तो रंग खूप गडद आणि गूढ आहे.”
‘ओलो’ हा रंग केवळ प्रयोगादरम्यानच दिसतो. तो संगणकाच्या स्क्रीनवर, छायाचित्रात किंवा रंगाच्या पट्ट्यांवर दाखवता येत नाही. शास्त्रज्ञांनी एक निळसर हिरवट रंगाचा चौकोन दाखवला आहे, जो केवळ त्याच्या जवळपास आहे. पण खरा ‘ओलो’ डोळ्यांतील पेशींना लेझरने ऊर्जा दिल्यावरच दिसतो.
या रंगाला ‘ओलो’ हे नाव का दिलं?
‘ओलो’ हे नाव बायनरी कोड ‘010’ वरून ठेवण्यात आलं आहे. याचा अर्थ असा की फक्त M शंकू पेशी सक्रिय होतात आणि इतर दोन L आणि S निष्क्रिय राहतात. त्यामुळे हा रंग M शंकूंपासूनच निर्माण होतो.
या प्रयोगाचे महत्त्व काय?
सामान्यतः माणसाच्या डोळ्यांची रचना आणि मेंदूच्या प्रक्रियेमुळे आपण ठरावीकच रंग पाहू शकतो. पण या प्रयोगामुळे हे स्पष्ट झाले की, योग्य पद्धतीने डोळ्यांना उत्तेजित केल्यास आपण अशा रंगांचाही अनुभव घेऊ शकतो. जे आपल्याला याआधी कधीच दिसले नव्हते.
ऑस्टिन रोड्डा हे शास्त्रज्ञांच्या टीममधील दृष्टी वैज्ञानिक आहेत. त्यांनी ‘द गार्डियन’ला सांगितले की, “तो रंग लेखात किंवा मॉनिटरवर दाखवणे शक्य नाही. मुद्दा हा आहे की तो रंग आपण नेहमी पाहतो तसा नाहीच आहे. आपण जो रंग पाहतो तो त्याचा एक प्रकार आहे. पण ‘ओलो’ पाहण्याचा अनुभव त्यापेक्षा खूपच वेगळा आणि तेजस्वी आहे.”