इटलीतील मॉन्टोन इथे नाईक यशवंत घाडगे यांच्या कांस्य पुतळ्याचे दिमाखात अनावरण!

VC Yashwant Ghadge : महाराष्ट्राचे सुपुत्र नाईक यशवंत घाडगे यांच्या शौर्याला दाद देण्यासाठी इटलीतल्या मॉन्टोन शहरात त्यांच्या स्मरणार्थ कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे.
[gspeech type=button]

भारताच्या शौर्याचा जगभरात डंका वाजत आहे. याचं शौर्याचं भाग असलेल्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या 12 गड-किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या यादीत करण्यात आला. तर दुसरीकडे महाराष्ट्राचे सुपुत्र नाईक यशवंत घाडगे यांच्या शौर्याला दाद देण्यासाठी इटलीतल्या मॉन्टोन शहरात त्यांच्या स्मरणार्थ कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे. या दोन्ही घटना भारतीय आणि महाराष्ट्रीय म्हणून खूप अभिमानाच्या आहेत. 

कोण होते पराक्रमी नाईक घाडगे

दुसऱ्या महायुद्धावेळी अनेक भारतीय सैनिक हे ब्रिटनसाठी त्यांच्या मित्रपक्षाच्या बाजूने लढले होते. नाईक यशवंत घाडगे हे भारतीय सैन्यात होते. ब्रिटीश फौजांसोबत लढण्यासाठी पाचव्या मराठा लाइट इन्फन्ट्रीला इटलीला पाठवलं होतं. या तुकडीची महत्त्वाची जबाबदारी नाईक घाडगे यांच्यावर होती. त्यांची तुकडी मित्र राष्ट्रांतर्फे इटली आणि जर्मनीविरोधात लढत होती. 

10 जुलै 1944 या दिवशी जर्मन सैन्याच्या ताब्यात असलेली छावणी ताब्यात घेण्यासाठी यशवंत घाडगे आणि त्यांची तुकडी इटलीतील टायबर नदीच्या खोऱ्यात दाखल झाली होती. मात्र या खोऱ्यात जर्मन सैन्याने त्यांच्या संपूर्ण तुकडीला नामशेष केलं. एकटे नाईक घाडगे या हल्ल्यातून वाचले होते. आपली सगळी तुकडी संपलेली आहे याची कल्पना असूनही घाडगे यांनी हार मानली नाही. ते शत्रूला शरण गेले नाहीत. तर त्यांनी शेवटपर्यंत जिद्दीने लढा दिला. जवळ असलेला दारुगोळाही संपला तरीही त्यांनी रिकाम्या बंदूकीच्या साहाय्याने शत्रूवर झेप घेतली. बंदुकीच्या दस्त्याने त्यांनी शत्रू सैनिकांशी हाणामारी केली. अशा पद्धतीने त्यांनी छावणीची गोथिक लाईन काबीज केली. पण जवळच्याच खंदकात लपलेल्या जर्मन सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. आणि नाईक घाडगे यांचा जीव गेला. 

व्हिक्टोरिया क्रॉसचा किताब

नाईक घाडगे यांच्या या शौर्यवान लढाईची त्यावेळी दखल घेतली गेली. महायुद्ध संपल्यानंतर लाल किल्यातील मैदानावर भव्य समारंभामध्ये नाईक घाडगे यांना मरणोत्तर व्हिक्टोरिया क्रॉसचा पुरस्कार दिला गेला. ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ हा ब्रिटीश सैन्यातील सर्वोच्च सन्मान मानला जातो. 

व्हाइसरॉय आणि गव्हर्नर जनरल फील्ड मार्शल लॉर्ड वेव्हेल यांच्या हस्ते घाडगे यांच्या पत्नी लक्ष्मीबाईंना हे मानाचे पदक प्रदान करण्यात आलं होतं. तर मॉन्टोन शहराने त्यांना “पर्सोनॅजियो इलस्ट्रे डी मॉन्टोन” हा विशेष मान देऊन गौरविलं. 

कांस्य पुतळ्याचं अनावरण

मॉन्टोन शहरात भारताच्या इटलीतील राजदूत वाणी राव आणि मॉन्टोनचे महापौर मिर्को रिनाल्डी यांनी संयुक्तपणे या स्मारकाचे उद्घाटन केले. या समारंभात भारत आणि इटलीच्या राष्ट्रगीतांचे सादरीकरण इटालियन लष्करी बँडने केले. पेरुजिया प्रांताचे अध्यक्ष मासिमिलियानो प्रेसियुटी, वरिष्ठ लष्करी आणि पोलिस अधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इटालियन शिल्पकार इमॅन्युएल व्हेंटानी यांनी डिझाइन केलेला हा कांस्य पुतळा भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या सहकार्याने उभारण्यात आला. या समारंभाने नाईक घाडगे यांच्या बलिदानाची आठवण ताजी करत भारत-इटलीमधील मैत्रीपूर्ण संबंधांना बळकटी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नाईक घाटगे यांचं स्मारक

मॉन्टोनच्या नागरिकांच्या हृदयात, 80 वर्षांनंतरही, नाईक यशवंत घाडगे यांचे स्थान कायम आहे. आणि याचं हे दुसरं उदाहरण आहे. कांस्य पुतळ्याआधी मॉन्टोनोमध्ये ‘व्हीसी यशवंत घाडगे यांचं सुंडियल स्मारक’ ही उभारलेलं आहे. या स्मारकामध्ये एकतेचं प्रतिक असलेलं सूर्यघड्याळ आहे. या घड्याळाखाली ‘ओमिनेस सब इओडेम सोल’ असं ब्रीदवाक्य लिहिलेलं आहे. याचा अर्थ ‘आपण सगळेजण एकाच सूर्याखाली राहतो.’ त्यानंतर अन्य तीन फ्रेममध्ये त्यांचा गौरव आणि त्यांच्या कार्याची माहिती दिली आहे. 

यशवंत घाडगे ते व्हीसी यशवंत घाडगे यांचा प्रवास

16 नोव्हेंबर 1921 रोजी रायगडच्या माणगाव तालुक्यातील पळसगाव-आंब्रेची वाडी इथे शेतकरी कुटुंबात यशवंत बाळाजी घाडगे यांचा जन्म झाला. आई-वडिल, मोठा भाऊ आणि चार बहिणी असं मोठं कुटुंब होतं. मोठा भाऊ वामन हा सैन्यात होता. आर्थिक परिस्थिती बेताची होती म्हणून यशवंत यांनी इयत्ता चौथीपर्यंतच शिक्षण घेतल्यावर शेतमजूरी करु लागले. पुढे सहा वर्षांनंतर थोरले भाऊ वामन सैन्यातून निवृत्त होऊन गावी आले. तेव्हा भावाप्रमाणे सैन्यात जावे असे यशवंत यांनाही वाटू लागले. 

त्यांना लाठी, बोथाटी, दांडपट्टा फिरवणे आणि कसरत करण्याची आवड होती. पण लष्करात जाण्यासाठी त्यांची आई त्यांना परवानगी देत नव्हती. पण यशवंत आणि त्यांच्या मोठ्या भावांनी खूप आग्रह धरला. त्यानंतर त्यांच्या आईने लग्न केलंस तरचं सैन्यात भर्ती होऊ शकतो अशी अट घातली. आईची अट मान्य करत यशवंत यांनी वयाच्या 18 व्या वर्षी लग्न केलं. त्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी म्हणजे सन 1938 साली पाचव्या मराठा लाईट इन्फ्रन्ट्रीमध्ये ते शिपाई म्हणून रुजू झाले. त्यांची सैन्यातली कामगिरी पाहून त्यांना लवकरच नाईक पदावर बढती मिळाली. यातून त्यांची उत्तरोत्तर प्रगती होत त्यांनी आपल्या शौर्याची जादू साऱ्या जगाला दाखवून दिली. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50 टक्के आयात शुल्कामुळे भारतीय निर्यातदारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पण, पंतप्रधान मोदींनी अमेरिकन
पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 13 ऑगस्ट 2025
Gaza Famine : एकात्मिक अन्न सुरक्षा टप्प्याचे वर्गीकरण (IPC) या संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संस्थेने गाझा शहरामध्ये अखेर दुष्काळ जाहीर केला

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ