आपले आवडते कलाकार, नेते जेव्हा लोकांसमोर नसतात तेव्हा ते काय करत असतील असा विचार आपल्यापैकी अनेक जण करत असतील. पण ही माहिती तुम्हाला त्यांच्या बॉडीगार्डच्या फिटनेस ॲपवर मिळू शकते. होय. हे असं घडत आहे. आणि त्यामुळे जगभरातील नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अलीकडेच, स्वीडिश पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांचा बॉडीगार्ड त्यांचे धावण्याचे आणि सायकलिंगचे मार्ग हे स्ट्रावा या फिटनेस ॲपवर अपलोड करायचे. ही संवेदनशील माहिती या ॲपवर अपलोड करुन त्यांची सुरक्षा धोक्यात घातली असा आरोप या बॉडीगार्डवर केला होता.
अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी एका फ्रेंच वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, अध्यक्षीय उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या सुरक्षा पथकांनी वापरलेल्या फिटनेस ॲप्सवरुन त्यांच्या दैनंदिन हालचालीवर लक्ष ठेवलं गेलं होतं.
नेमकं काय घडलं?
स्ट्रावा या फिटनेस ॲपवर धावपटू आणि सायकलस्वार त्यांच्या वर्कआउट्सची नोंद करुन ही माहिती ते इतरांसोबत शेअर करत असतात.
सामान्य लोकांनी किंवा कलाकार मंडळींनी आपल्या चाहत्यांसाठी मिनीट टू मिनीट अपडेट्स देत राहणं तितकं जोखमीचं नसतं. उलट वर्कआऊट, प्रवास, खरेदी, वर्कशॉप्स असे वेगवेगळे अपडेट देत राहत सोशल मीडियावर अपडेटेड राहण्याची कलाकारांची ही एक पद्धत आहे.
मात्र, राजकीय नेते वा व्यावसायिकांनी सातत्याने त्यांची माहिती सोशल मीडियावरुन शेअर करणं थोडं जोखमीचं असतं. मात्र, स्वीडिश पंतप्रधानांच्या बॉडीगार्डनी अनावधनाने त्यांच्या धावण्याच्या आणि बाईक राईड्सची माहिती स्ट्रावा या फिटनेस ॲपवर अपलोड केली. अनेकदा ते कुठे आहेत, कुठे जात आहेत असा दैनंदिन तपशील साधारण 35 वेळा त्या ॲपवरुन शेअर केला.
या माहितीमध्ये क्रिस्टरसनचे वैयक्तिक धावण्याचे मार्ग आणि प्रवासाची माहिती उघड केली आहे. यामध्ये ऑक्टोबर 2024 मध्ये या राजघराण्याने अलांड येथे केलेल्या कौटुंबिक सहलीचीही माहिती दिलेली होती. राजघराण्यातील व्यक्तींची इतकी खासगी माहिती ही नकळतपणे या ॲपच्या माध्यमातून लोकांना मिळत होती.
या फ्रेंच वृत्तपत्रामध्ये, गेल्या वर्षभरात वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या सात बॉडीगार्डनी 1,400 पोस्टच्या माध्यमातून वर्षभरात व्यायामाच्या माध्यमातून या अधिकाऱ्यांच्या लोकेशनची माहिती जाहीर केली होती. यामध्ये पोलंडमधील युक्रेनच्या सीमेजवळ, तेल अवीवमधला समुद्रकिनारा, आल्प्समधील स्की रिसॉर्ट्स, न्युयॉर्कचं सेंट्रल पार्क, मालीमधलं लष्करी तळ आणि सेशेल्समधलं एक बेट असे वेगवेगळे लोकेशन यामुळे कळून आले.
या माहितीवरून, स्टॉकहोममधल्या सरकारी इमारती आणि सोडरमनलँडमधील पंतप्रधानांचे ग्रामीण भागातील निवासस्थान हार्पसंड यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी बॉडीगार्ड कशा पद्धतीने कार्यरत असतात याचीही माहिती उघड झाली आहे.
स्वीडिश पंतप्रधानांसह राजघराणातल्या अन्य व्यक्ती, सोशल डेमोक्रॅट नेत्या व माजी पंतप्रधान मॅग्डालेना अँडरसन आणि स्वीडन डेमोक्रॅट नेते जिमी अकेसन यांच्याशी संबंधित तपशील ही या ॲपवर होता. या संपूर्ण प्रकरणांनंतर या स्ट्रावा ॲपवरुन बॉडीगार्ड म्हणून कार्यरत असणाऱ्यांच्या प्रोफाईल बंद करण्यात आल्या आहेत.
या सगळ्या घटनेची दखल स्वीडिश सुरक्षा सेवेने घेतली आणि आवश्यक ती कारवाई सुरु केली आहे. सुरक्षेसंबंधित अंतर्गत आढावा ते घेत आहेत. “यापुढे सर्व प्रोटोकॉलचं पालन करु. अनावधनानेही अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती काळजी घेऊ,” अशी माहिती स्वीडनच्या सुरक्षा सेवा (सापो) च्या सुरक्षा विभागाच्या प्रमुख कॅरोलिना ब्योर्नस्डॉटर पासिकिवी यांनी दिली.
स्ट्रावा ॲपकडून घटनेची पुनरावृत्ती
फिटनेस अॅपवरील सार्वजनिक प्रोफाइल जगभरातील सैन्यासाठी सुरक्षेचा मुद्दा बनला आहे. 2023 मध्ये, एका माजी रशियन पाणबुडी कमांडरला त्याच्या स्ट्रावा ॲपवरच्या तपशीलांचा वापर करून ट्रॅक करून मारल्याची घटना घडली आहे.
2017 मध्ये, जगभरातील लष्करी तळ आणि गुप्तचर चौक्यांचे स्थान आणि कर्मचारी भरतीची माहिती उघड केल्याबद्दल स्ट्रावाला टीकेचा सामना करावा लागला. या ॲपने जगभरात स्ट्रावाचे किती वापरकर्ते आहेत आणि त्यांच्या हालचालींची माहिती दर्शवणारा नकाशा प्रसिद्ध केला होता. ज्यामुळे वापरकर्त्यांशी संबंधित खूप जास्त माहिती उघड झाली होती.
दरम्यान, फ्रेंच वृत्तपत्र ले मोंडेने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या अहवालामुळे, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वापरलेल्या फिटनेस ॲप्समुळे जागतिक नेत्यांच्या हालचाली ऑनलाइन फॉलो करणे कसं सोपं झालं आहे हे उघड झालं होतं.
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दोन हल्ल्यांच्या प्रयत्नांनंतरच्या आठवड्यातही, युएस सीक्रेट सर्व्हिस एजंट्सकडे स्ट्रावा अकाउंट सक्रिय असल्याची बातमी वृत्तपत्रात आली होती.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे सुरक्षा पथकही हे ॲप वापरत असल्याचं आढळलं आहे.
एका प्रकरणात, ले मोंडेने स्ट्रावावरील मॅक्रॉनच्या बॉडीगार्डच्या हालचालींचा मागोवा घेतला. यातून असं दिसून आलं की, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी 2021 मध्ये नॉर्मंडीमधील होनफ्लूर इथे खासगी दौरा केला होता, ज्याची कुठेच माहिती वा उल्लेख नव्हता.
जगातील प्रमुख नेत्यांचे बॉडीगार्ड हे त्यांच्या व्यायामाच्या अपडेटसाठी हे ॲप वापरत असतात. त्याठिकाणी वारंवार अपडेट्स देत राहिल्याने ते ज्या नेत्यांसाठी काम करत आहेत त्याचीही माहिती अशा पद्धतीने उघड होत असते. त्यामुळे या नेत्यांच्या सुरक्षततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होतो.