आजकाल फोन आणि लॅपटॉपमुळे, कामाच्या ठिकाणाहून दूर असतानाही कामापासून सुट्टी घेणं कठीण असतं. एम्प्लॉईने रोजच्या कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करावं, अशी कंपन्यांची अपेक्षा असते. कामाची वेळ संपल्यावर बाहेर असताना, कुटुंबासोबत-मित्रपरिवारासोबत असतानाही कंपनीच्या कॉन्टॅक्टमध्ये राहण्याची अपेक्षा काही वरीष्ठ करतात. या प्रकाराला “डिजिटल उपस्थिती” म्हणतात आणि यामुळेच अनेकांना तणाव, चिंता आणि थकवा जाणवतो.
सुट्टी घेणे आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. परंतु, कामाच्या ठिकाणापासून दूर असलो तरीही, आपली मनःस्थिती कामाशी जोडलेली राहते. सुट्टीत असतानाही आपण कामाच्या गोष्टींवर विचार करत राहतो. भारतात तर या गोष्टी अगदी सर्रास केल्या जातात. आठवड्याच्या सुट्टीलाही काही वरिष्ठ कामाची अपेक्षा करतात. वर्क फ्रॉर होम या संकल्पनेत तर बऱ्याचदा 12-15 तास कामावर ऑन राहावं लागतं. नोकरी जायच्या भीतीने एम्प्लॉयी याची तक्रारही करत नाहीत.
ऑस्ट्रेलियात एक नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. यामुळे कामगारांना कामापासून पूर्णपणे सुट्टी घेण्याचा अधिकार मिळाला आहे. भारतात कामगार कायदे मजबूत असले तरी त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. कारण इथं लोकसंख्या जास्त आणि नोकऱ्या कमी. त्यामुळं आपली नोकरी वाचवण्यासाठी लोकं कंपनी आणि वरिष्ठांच्या मनमानीला बळी पडतात. बरं, यात काही महाभाग असेही आहेत, जे ऑफिसच्या कामकाजाच्या वेळेत टाईमपास करतात आणि मग ऑफिसमध्ये लेट नाईट थांबून काम करतात किंवा घरी येऊन कामं करतात. अशांना इतर सहकारी आणि घरच्यांना दाखवायचं असतं की ते किती सतत काम करतात.. तर हा लेख अशा जेन्युइन लोकांसाठी आहे, ज्यांच्यावर कामाच्या तासात कामं पूर्ण करूनही घरी किंवा सुट्टीवर ऑफिससोबत डिजीटली कनेक्ट राहायचा दबाव असतो.
सुट्टीचे फायदे
सुट्टी घेणं फक्त विश्रांतीसाठीच नाही, तर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी देखील महत्त्वाचं आहे. अनेक अभ्यासांनी हे सिद्ध केलं आहे की, सुट्टी घेतल्याने तणाव कमी होतो. शरीराला अधिक ऊर्जा मिळते आणि मन शांत होतं. आणि मग जास्त ऊर्जेने पुन्हा काम करता येते. विशेषत: पुरुषांनी, कामातून ब्रेक घेतला तर ते अधिक काळ जगू शकता.
सुट्टी घेतल्यानंतर आपले शरीर अधिक चांगलं काम करू लागते. एका अभ्यासात सांगितलं आहे की, ज्यांनी नियमितपणे ठराविक कालावधीनंतर सुट्टी घेतली आहे, त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलसारख्या आजारांचा धोका कमी झाला आहे.
मोठी सुट्टी घेण्याची गरज नाही
आपल्याला जास्त आराम मिळावा म्हणून मोठी सुट्टी घेणं आवश्यक नाही. 1-2 दिवसांची सुट्टीदेखील आपल्याला मानसिक आणि शारीरिक विश्रांती देऊ शकते. काही अभ्यासांनुसार, 4 ते 5 दिवसांचा छोटा ब्रेक घेऊन जे घरीच विश्रांती घेतात त्यांना तितका फायदा होत नाही. त्यापेक्षा सुट्टीमध्ये कॅम्पिंग किंवा हायकिंगसारख्या काही ॲक्टिव्हिटी केल्या तर घेतलेली सुट्टी अधिक फायदेशीर ठरते.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपली सुट्टी आपल्या आवडीनुसार आणि बजेटनुसार असायला हवी. त्यामुळे, ‘परिपूर्ण सुट्टी’ असं काही नाही. तुमच्या मनाला आणि शरीराला आरामदायक वाटेल असाच पर्याय निवडावा.
सुट्टी घेताना लक्षात ठेवा
-सुट्टी घेताना आपले रोजचे रूटीन बदलण्याचा प्रयत्न करा.
-कामाशी संबंधित गोष्टी जसं की, खरेदीला जाणे, घर स्वच्छ करणे, कम्प्युटरवर काम करणे या गोष्टी शक्यतो टाळा.
-सुट्टीच्या वेळी काहीतरी वेगळा, नवीन अनुभव घ्या, नवीन ठिकाणी प्रवास करा.
– तणावपूर्ण परिस्थितीत जाण्यापासून टाळा.
-सुट्टी घेण्याचा विचार करत असताना, संपूर्ण वर्षभरात एकच मोठा ब्रेक घेण्याऐवजी, छोट्या-छोट्या
रजा घेण्याचा विचार करा.
सुट्टी घेणं आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. अनेक अभ्यासांनी हे स्पष्ट केलं आहे की, सुट्टी घेणं आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. असे ठराविक काळाने ब्रेक्स घेतल्याने तणाव कमी होतो, एनर्जी मिळते आणि काम करण्याची क्षमताही सुधारते.