रशियाने युक्रेनसोबत युद्धाला सुरूवात केल्यापासून पाश्चात्य देशांनी रशियाकडून तेलखरेदी करणं बंद केलं आहे. युरोपीय देशांच्या या निर्णयामुळे निर्यात कमी होईल म्हणून रशियाने तेलखरेदीवर मोठी सवलत द्यायला सुरूवात केली. या सवलतीमुळे 2022 पासून भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत आहे. या धोरणामुळे भारताला अमेरिका आणि युरोपीयन युनियनच्या टीकेचाही सामना करावा लागत आहे. त्यातच आता ‘भारताने जर ही तेल खरेदी थांबवली नाही तर अमेरिकेकडून 100 टक्के टेरिफ लादला जाईल’, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे.
मात्र, ‘अमेरिकेची ही धमकी, हा दबाव अन्यायी आणि अवास्तव आहे’ या शब्दात भारताने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
भारत आपल्या हिताचं रक्षण करणार
अमेरिकेने, भारत – रशिया संबंधावर यापूर्वीही अनेकदा टीका केलेली आहे. पण, भारत हा प्रत्येक देशाची गुणवत्ता, स्थिरता आणि भारताचे हित पाहून परराष्ट्र संबंध प्रस्थापित करतो हे वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. याही वेळेला जर भारताला रशियाकडून सवलतीच्या दरात तेल मिळत असेल, त्यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किंमती स्थिर राहतात, कोणा एका देशाची मक्तेदारी निर्माण होत नाही, आणि महत्वाचं म्हणजे भारतीय ग्राहकाला वाजवी दरात इंधन उपलब्ध करुन देता येत असेल तर भारताने रशियाकडून तेल खरेदी का करु नये? असा प्रतिप्रश्न करत भारताने रशियाकडून खरेदी करत असलेल्या तेलाचं ठामपणे समर्थन केलं.
हे ही वाचा : भारत-रशिया संबंधावर तिसऱ्या देशाचा प्रभाव पडू शकत नाही!
या वादावर परराष्ट्र मंत्रायल का म्हणाले?
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं की, “भारत तेल खरेदीचं धोरण आखताना राष्ट्रीय हित आणि जागतिक बाजारपेठेतली किंमतीच्या परिस्थितीनुसार निर्णय घेते. त्यामुळे, रशियाकडून खरेदी करत असलेल्या कच्च्या तेलावरुन भारताला लक्ष्य करणे अन्याय्य आणि अवास्तव आहे. कोणत्याही मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणे, भारत आपले राष्ट्रीय हित आणि आर्थिक सुरक्षितता जपण्यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करेल.”
“युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर रशियाकडून तेल आयात न करण्याचा निर्णय अमेरिका व युरोपीय देशांनी घेतला होता. मात्र, भारताने रशियाकडून तेलखरेदी सुरूच ठेवली. यामुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनने भारतावर टीका केली. जेव्हा रशिया – युक्रेन संघर्ष सुरू झाला तेव्हा युरोपकडून तेलखरेदी केली जाऊ लागली. मात्र, भारताने रशियाकडूनच तेल आयात केलं. भारताच्या या निर्णयामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मक्तेदारी निर्माण न होता, स्थिरता राहिली. यासाठी त्यावेळी अमेरिकेनेच भारताच्या निर्णयाचं कौतुक करुन पाठिंबा दिला होता.” असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
भारत-रशिया तेल व्यापार
युक्रेन युद्धामुळे भारत रशियाच्या तेल खरेदीदार देशांपैकी एक प्रमुख भागीदार बनला आहे. भारत ही रशियासाठी तेल निर्यातीसाठी एक चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली. भारताच्या या निर्णयामुळे रशियाचा व्यापार तर झालाच पण भारतालाही तेल खरेदीवरील सवलतीमुळे अब्जावधी डॉलर्सचा फायदा झाला.
हे ही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’ आणि ‘MAGA’ भारत-अमेरिका संबंधांवर काय परिणाम होणार?
रशियाचा युरोपियन युनियन आणि अमेरिकासोबतचा व्यापार
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये युरोपियन युनियनचा रशियासोबत 67.5 अब्ज युरो वस्तू आणि 17.2 अब्ज युरो सेवांचा द्विपक्षीय व्यापार होता. भारत आणि रशियाच्या व्यापार किंमतीपेक्षा हा व्यापार खूप जास्त होता. 2024 मध्ये युरोपियन युनियनने रशियाकडून 16.5 दशलक्ष टनहून जास्त नैसर्गिक वायू आयात केला. तर अमेरिका रशियाकडून त्यांच्या अणु उद्योगासाठी युरेनियम हेक्साफ्लोराइड, इलेक्ट्रिक वाहन उद्योगासाठी पॅलेडियम, खते आणि रसायने आयात करते.
युरोपियन युनियन आणि अमेरिका स्वत: रशियासोबत अब्जावधीचा व्यापार करते. मग भारतावर व्यापार थांबवण्यासाठी का दबाव आणत आहे हा सवाल परराष्ट्र खात्याने उपस्थित केला आहे.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ प्लॅटफॉर्मवर भारतावर टीका करताना म्हटलं आहे की, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करते. आणि जास्त नफा कमवण्यासाठी ते पुन्हा विकते. भारताच्या या नितीमुळे युक्रेन – रशिया युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नात अडथळे येत आहेत.
मात्र, भारताने स्पष्ट केलं की, पाश्चात्य देशांना ऊर्जा तुटवड्याची भिती नसतानाही ते रशियाकडून नैसर्गिक वायू आणि अन्य इंधनाची खरेदी करतात. याशिवाय इतरही व्यापार सुरू ठेवले आहेत. मग भारताने स्व हित जपलं तर अडचण का? असा रोख सवाल केला आहे.
भारत – रशिया संबंधावर परिणाम होईल का?
अमेरिकेच्या टेरिफ वाढवण्याच्या धमकीनंतर भारताने रशियासोबत सुरू असलेल्या व्यापाराचं ठामपणे समर्थन केलं आहे. तरी, सावध भूमिका घेत तेल खरेदी काही प्रमाणात कमी केली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वाढत्या टेरिफच्या धमक्या आणि दबावामुळे भारत-रशिया संबंधावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. उलट हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज (मंगळवारी, 5 ऑगस्ट रोजी) रशिया दौऱ्यावर गेले आहेत.
अजित डोभाल यांच्या दौऱ्यांनंतर परराष्ट्रमंत्री एस जयशंकर ही ऑगस्टमध्येच रशिया दौऱ्यावर जाणार असल्याची बातमी इकॉनोमिक टाइम्सने दिली आहे.