तुम्हाला माहीत आहे का, आज आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञान वापरतो, त्याची सुरुवात अमेरिका, चीन या देशात किंवा एनव्हीडिया (Nvidia) सारख्या कंपन्यांनीही केली नाहीये. तर, यामागे एक डच कंपनी आहे. ही कंपनी पृथ्वीवरील प्रत्येक AI चिप बनवणाऱ्या मशीन्सवर नियंत्रण ठेवते. त्यांनी अशी मक्तेदारी कशी तयार केली, जी कुणीही मोडू शकत नाही. या कंपनीने हे नेमकं कसं साध्य केलं चला समजून घेऊया.
ASML नावाची ही डच कंपनी, सेमिकंडक्टर बनवण्यासाठी लागणाऱ्या अल्ट्राव्हायोलेट लिथोग्राफी मशीन बनवते. या मशीन्स इतक्या प्रगत आहेत की, त्यांच्याशिवाय जगात कोणतीही अत्याधुनिक AI चिप बनू शकत नाही. या कंपनीने अनेक वर्षांच्या संशोधनानंतर आणि मोठ्या गुंतवणुकीनंतर हे अतिशय उत्कृष्ट तंत्रज्ञान विकसित केलं आहे. त्यांच्याकडे असे पेटंट्स आणि ज्ञान आहे, जे इतर कोणत्याही कंपनीकडे नाही. यामुळेच या कंपनीला ग्लोबल मार्केटमध्ये कुणीच स्पर्धक नाही.
ASML कंपनी ज्या मशीन्स बनवते, त्या नुसत्या साध्या मशीन नाहीत. तर, माणसाने आजपर्यंत तयार केलेली सर्वात अवघड आणि किचकट उपकरणं आहेत. एका मशीनची किंमत जवळपास 1600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. या मशीनचे वजन 180 टन आहे आणि ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी 3 बोईंग 747 विमानं लागतात. या मशीनमुळेच चिप बनवणाऱ्या उद्योगात ASML अत्यंत महत्त्वाचा भाग बनली आहे.
Nvidia, Apple, Intel, TSMC , Samsung अशा मोठ्या कंपन्यांच्या सगळ्या AI चिप्स ‘सिलिकॉन वेफर्स’वर तयार केल्या जातात. बोटाच्या नखापेक्षाही लहान जागेत अब्जावधी छोटे-छोटे ट्रान्झिस्टर बसवण्यासाठी अतिशय अचूकता लागते. आणि ही अचूकता फक्त एकच कंपनी देऊ शकते ती म्हणजे ASML. म्हणूनच, AI चिप्स बनवण्यासाठी सध्या ASML कंपनीशिवाय दुसरा पर्याय नाही.
ASML कंपनीच्या या खास मशीनला EUV ( Extreme Ultraviolet Lithography) म्हणतात. ही मशीन नेमका आणि खास प्रकाश वापरते. त्यामुळे ती व्हायरसपेक्षाही लहान पॅटर्न तयार करू शकते. हे काम एखादं रॉकेट अवकाशात सोडण्याइतकं अवघड आहे. पण ASML कंपनीला हे काम दर काही महिन्यांनी करावं लागतं. विशेष म्हणजे, या EUV मशीन्स फक्त ASML च बनवते.
या EUV मशीनची किंमत जवळपास 1200 कोटी रुपये आहे. दुसरी कोणतीही कंपनी या मशीन्स बनवत नाही. Nvidia, Intel, TSMC सारख्या चिप बनवणाऱ्या कंपन्या पूर्णपणे ASML वर अवलंबून आहेत. ASML शिवाय AI क्रांती शक्यच नाही.
यामुळे अनेक देशांची सरकारंही चिंतेत आहे. कारण, ज्या देशाकडे ASML चं नियंत्रण आहे, तोच AI च्या भविष्यावर राज्य करतो, असं मानलं जातं. 2019 मध्ये, अमेरिकेने डच सरकारवर दबाव आणला होता की त्यांनी चीनला ASML च्या मशीन्स विकू नयेत. यानंतर चीनने स्वतःच्या अशा मशीन्स बनवायचा प्रयत्न केला. पण अनेक वर्षांनंतरही चीन ASML कंपनीच्या जवळपासही पोहोचू शकला नाही. याचं कारण म्हणजे, ASML ची ही टेक्नॉलॉजी कोणालाही नक्कल करता येत नाही इतकी ती अवघड आणि खास आहे.
ASML च्या मशीनमध्ये 1 लाखाहून जास्त भाग असतात आणि हे भाग जगातल्या 5 हजारांहून अधिक वेगवेगळ्या कंपन्यांकडून येतात.
1984 मध्ये, फिलिप्स आणि ASM इंटरनॅशनलने सेमीकंडक्टर उद्योगासाठी लिथोग्राफी सिस्टीम विकसित करण्यासाठी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ‘ASM लिथोग्राफी’ नावाची एक नवीन कंपनी सुरू केली, जी नंतर ‘ASML’ म्हणून ओळखली जाऊ लागली. 1995 मध्ये, ASML ही पूर्णपणे स्वतंत्र कंपनी बनली.
ज्यावेळी इतर कंपन्या प्रसिद्धीच्या मागे धावत होत्या, त्यावेळी ASML ने वेगळा विचार केला. येणाऱ्या काळात तंत्रज्ञानामुळे या चिप्स आकाराने अजून लहान, वेगवान आणि जास्त किचकट होत जातील, असा भविष्याचा अंदाज ASML ने बांधला. येणाऱ्या बदलांसाठी त्यांनी तयारी सुरू केली. आणि यात त्यांना चांगलंच यश मिळालं.
आज ASML कंपनीची किंमत सुमारे 32 लाख कोटी रुपये आहे. ते वर्षाला 50 EUV मशीन्स पाठवतात. यासाठी त्यांनी कधी कोणती जाहिरात केली नाही केली ना प्रसिद्धी मिळवली. तरीही जगातील प्रत्येक AI लॅब त्यांच्याकडून मशीन्स घेण्यासाठी प्रतिक्षेत आहेत.
हेही वाचा : एआयच्या ( AI ) जास्त वापरामुळे तरुणाईच्या विचारशक्तीवर परिणाम!
जगातले लोक AGI (आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स), GPT-5 आणि GPU च्या कमतरतेबद्दल वाद घालत असताना, ASML कंपनी शांतपणे सर्वात वरच्या स्थानी बसली आहे. कोणीही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही अशा टेक्नॉलॉजीची निर्मिती केल्यामुळे, AI च्या भविष्यात लागणाऱ्या हार्डवेअरवर ASML नियंत्रण ठेवत आहेत.