तुर्कीमधील इस्तंबूल शहर पाहणं, पारंपरिक चहा पिणं, ऐतिहासिक बाजारात आणि निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर फिरणं हे अनेकांच्या ट्रॅव्हल बकेट लिस्टमधील स्वप्न असतं. मात्र, तुर्कीमध्ये गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी, खर्च आणि काहीवेळा गैरसोयींचाही सामना करावा लागतो. त्यामुळे अनेक जण त्यांच हे स्वप्न फक्त स्वप्नच राहू देतात. शिवाय सध्याच्या भारत-पाक संबंधातील तणावामुळं तुर्की आणि अझरबैझानकडे भारतीयांनी पाठ फिरवली आहे.
पण काळजी करू नका. तुर्की आणि अझरबैजानसारख्या देशांमध्ये जसं सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सौंदर्य आहे, तसंच सौंदर्य आणि अनुभव इतर काही देशांमध्येही मिळू शकतो. तेही कमी खर्चात आणि शांत वातावरणात.
आम्ही तुम्हाला अशाच 9 देशांबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्हाला तुर्कीसारखा अनुभव मिळेल.
कोसोवो
कोसोवो हा युरोपमधील एक छोटा पण निसर्गरम्य देश आहे. इथलं प्रिझरेन नावाचे शहर तर खूपच सुंदर आहे. तिथे डोंगररांगा, ऐतिहासिक मशीदी आणि शांतता अनुभवायला मिळेल. शहरातील बाजारपेठा, जुन्या गल्ल्या आणि तुर्की प्रभाव असलेली वास्तूरचना पाहून हे शहर तुमचं मन जिंकेल. इथे जाण्याचा खर्च कमी आहे आणि तिथे जास्त गर्दी पण नसते.
सर्बिया
सर्बिया हा पूर्व युरोप मधील एक कमी प्रसिद्ध पण अत्यंत सुंदर देश आहे. इथली राजधानी बेलग्रेड ही नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे. तसेच नोवी पाजार हे शहर ऐतिहासिक आहे. कारण पूर्वी इथे ऑटोमन साम्राज्याचं राज्य होतं. त्यामुळे इथे त्या काळातील इमारती, बाजार पाहायला मिळतात. कमी बजेटमध्ये मस्त फिरायला मिळणारा देश म्हणजे सर्बिया.
जॉर्डन
तुम्हाला जुन्या इमारती, वाळवंट आणि मसालेदार जेवण आवडत असेल, तर जॉर्डन देश फिरण्यासाठी एकदम योग्य आहे. तिथे पेट्रा नावाची एक खूप छान आणि ऐतिहासिक जागा आहे. तुम्ही वाडी रम नावाच्या वाळवंटात कॅम्पिंग करू शकता. इथं तंबूमध्ये राहण्याचा अनुभव तुम्हांला सुट्टीची चांगलाच आनंद मिळवून देईल. शिवाय मृत समुद्रातही तुम्ही पोहू शकता.
उझबेकिस्तान
उझबेकिस्तान मध्ये तुम्ही गेल्यास तिथे तुम्हाला एखाद्या परिकथेसारखे वाटेल. तिथली समरकंद आणि बुखारा ही शहरे खूप सुंदर आहेत. तिथे रंगीबेरंगी मनोरे, घुमट आणि जुन्या काळात व्यापाऱ्यांसाठी बनवलेल्या धर्मशाळा बघायला मिळतात. हे शहर इस्तंबूलमधील सुलतान अहमत भागासारखे आहे, पण तिथे जास्त गर्दी नसते. शांत आणि कमी पर्यटक असलेलं हे ठिकाण सांस्कृतिक पर्यटनासाठी उत्तम आहे..
नॉर्थ मॅसेडोनिया
या देशात तुम्हाला बायझंटाईन काळातील चर्च, ऑटोमनकालीन बाजार आणि ओहरिड नावाचा सुंदर तलाव पाहायला मिळतो. तलावाजवळील प्राचीन वास्तू आणि निसर्गसौंदर्य मनाला भुरळ घालतात. येथे मिळणारं अन्न बाल्कन आणि तुर्की पदार्थांचं सुंदर मिश्रण आहे.
बॉस्निया आणि हर्झेगोव्हिना
बॉस्निया आणि हर्झेगोव्हिना देशात पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील संस्कृती एकत्र बघायला मिळते. इथल्या सारायेव्हो शहराच्या अरुंद रस्त्यांवर फिरायला खूप मजा येते. तिथे ऑटोमन काळातली जुनी कॅफे आहेत, इथे तुम्हांला छान कडक कॉफी मिळेल. मोस्तार नावाच्या शहरात ‘स्तारी मोस्ट’ नावाचा एक खूप प्रसिद्ध पूलही आहे. इथले जेवण खूप चविष्ट आणि हलाल पद्धतीने बनवले जाते.
अल्बानिया
अल्बानिया देशात तुम्हाला संपूर्ण निळसर समुद्र आणि जुन्या काळातल्या इमारती बघायला मिळतील. विशेष म्हणजे, इथे जास्त पर्यटकांची गर्दी नसते. इथे समुद्रकिनारपट्टी वसलेले सारंडा नावाचे शहर आणि ग्यिरोकास्टर नावाचे एक शहर आहे. ज्याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे.
आर्मेनिया
आर्मेनिया हा देश डोंगराळ भागांमध्ये असून इथे कोरलेले प्राचीन मठ पाहायला मिळतात. इथली राजधानी येरेवान असून, इथे जुना इतिहास, लोककला आणि चविष्ट भाजलेलं मांस मिळतं. निसर्गाच्या सान्निध्यात शांत आणि अध्यात्मिक अनुभव घ्यायचा असेल, तर आर्मेनिया नक्कीच पहा.
जॉर्जिया
जॉर्जिया मध्ये तुम्हाला उंच डोंगर, जुने मठ आणि खूप चविष्ट चीज-ब्रेड खायला मिळतील. वाइनची सुरुवात याच देशातून झाली, असं मानलं जातं. त्यामुळे ज्यांना संस्कृती आणि निसर्गाची सुंदरता अनुभवायची आहे आणि जास्त पैसेही खर्च करायचे नाहीत त्यांच्यासाठी ही जागा एकदम परफेक्ट आहे.