आपण दररोज चालतोच, कधी बस पकडायला, कधी भाजी आणायला तर कधी सहज फेरफटका मारायला. बऱ्याच लोकांकडे तर आता फिटनेस ट्रॅकरसुद्धा असतो, जो दिवसभरात किती पावलं चाललात हे दाखवतो. आणि आपण ठरवून ठेवतो की दिवसातून 10,000 पावलं तरी चालायचं.पण एवढं चालून खरंच आपल्या शरीराला अपेक्षित फायदा होतो का?
सध्या जपानमधील एक नवी पद्धत जगभरात खूप चर्चेत आहे. इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग, किंवा IWT. ही वैज्ञानिक पद्धत सध्या खूप व्हायरल झाली आहे. या प्रकारे व्यायाम केल्यास आपले वय तर कमी दिसतंच, पण आरोग्यासाठीसुद्धा IWT खूप फायदेशीर असल्याचं म्हटलं जात आहे.
IWT म्हणजे नेमकं काय?
डॉ. हिरोशी नोझ नावाचे जपानी व्यायामशास्त्रज्ञ यांनी ही पद्धत तयार केली आहे. यामध्ये तुम्ही 3 मिनिटं जोरात चालायचं आणि नंतर 3 मिनिटं आरामात चालायचं. हे असं एकूण 5 वेळा करायचं. म्हणजे 30 मिनिटांचं एक सेशन होतं. हे ऐकायला अगदी सोपं वाटतं ना ? तसेच याचे फायदे देखील खूप आहेत.
फक्त चालणं पुरेसं नाही, मग हे IWT का करायचं?
बहुतेक लोक असा समज करून घेतात की, चालणं म्हणजे हलकाफुलका व्यायाम. पण ‘इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग’ मध्ये जेव्हा तुम्ही काही मिनिटं जोरात चालता, तेव्हा तुमचं हृदय वेगानं काम करतं. शरीरातली ऊर्जा जास्त प्रमाणात वापरली जाते, स्नायूंवरही ताण येतो. मग लगेच थोडा आराम मिळतो.
ही प्रक्रिया तुमचं शरीर तयार करत असते एक मजबूत आणि तंदुरुस्त जीवनशैलीसाठी. त्यामुळे IWT हे फक्त चालणं नाही, तर एक प्रकारचा वैज्ञानिक व्यायाम आहे.
हेही वाचा:जपान नामशेष होणार?
IWT चे फायदे काय आहेत?
डॉ. नोझ आणि अन्य शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, ज्यांनी दर आठवड्याला फक्त 4 वेळा आणि 3 महिने IWT केलं, त्यांच्या शरीरात खूप सकारात्मक बदल झाले. त्यांचा कोलेस्ट्रॉल कमी झाला, ब्लड प्रेशर आणि शुगर नियंत्रणात आली, स्नायूंची ताकद वाढली.
त्याचबरोबर, खालील फायदेही होतात
-हृदयाची क्षमता सुधारते
-पाय आणि शरीराच्या इतर भागांतील स्नायूंना बळकटी येते
-चेहऱ्यावर, त्वचेमध्ये तरतरी येते
-वजन कमी होण्यास मदत होते
-मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, नैराश्य येत नाही.
-वयाच्या तुलनेत तुम्ही 10 वर्षांनी तरुण वाटू लागता
सर्व वयोगटातील लोकांना सहज करता येणारी पद्धत
IWT ही पद्धत इतकी सोपी आहे की ती कोणत्याही वयोगटातील लोक करू शकतात. अगदी वयस्कर लोक, मध्यमवयीन माणसं किंवा कॉलेजमधले तरुणही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कुठलाही महागडा फिटनेस गॅझेट नको, जिमची मेंबरशिप नको. घराजवळचा रस्ता, पार्क, टेरेस किंवा अगदी घराच्या बाहेरचा कॉरिडॉरसुद्धा पुरेसा आहे.
जर चालताना थोडा बदल करायचा असेल, तर तुम्ही हातात थोडं वजन घेऊ शकता . जसं की 1 लिटर पाण्याची बाटली किंवा एखाद्या चढउताराच्या रस्त्यावर चालू शकता. यामुळे शरीराला वेगवेगळ्या दिशेनं मेहनत घ्यायला लागते आणि व्यायाम अजून चांगल्या प्रकारे होतो.
जिम, योगा, डाएटपेक्षा वेगळं काय आहे यात?
आजकाल सगळेजण जिममध्ये जाऊन भारी वर्कआउट करत आहेत. तर काही डाएटिंग करून वजन कमी करत आहेत. पण कधी वेळ नाही मिळाला तर जिम सुटतं, योगा सुटतो, डाएट मोडतं. पण IWT ही पद्धत मात्र तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनू शकते. कारण तुम्ही ती कुठेही करू शकता, केव्हाही करू शकता आणि अगदी कोणालाही ही पद्धत जमू शकते.
शास्त्रज्ञांच्या अभ्यासात असं दिसून आलं की, IWT करणाऱ्यांचं शरीर वयाच्या तुलनेत 10 वर्षांनी तरुण दिसतं. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजन घेण्याची क्षमता 20% वाढते आणि पायांमध्ये ताकद येते.
त्यामुळे, कधी तुम्हाला वाटला, “आज व्यायाम नाही जमणार,” तेव्हा फक्त लक्षात ठेवा. वयाच्या पलीकडे तरुण राहायचं असेल, मन प्रसन्न आणि शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर IWT हा एक सोपा आणि जबरदस्त उपाय आहे.