1192 साली पॅसिफिक महासागरामध्ये आलेल्या वादळामुळे एक अनोखी घटना घडली. एका जहाजातून 28,800 पिवळी रबर बदकं आणि इतर बाथ खेळणी समुद्रात पडली आणि गेल्या 33 वर्षांपासून ही खेळणी जगभर फिरत आहेत.
कशी घडली ही घटना?
चीनमधून अमेरिकेला निघालेले एक मालवाहू जहाज वादळात सापडलं आणि “Uh-Oh Zone” मध्ये अडकले. जहाजावरील अनेक कंटेनर समुद्रात पडले. त्यापैकी एका कंटेनरमध्ये 28,800 खेळणी होती. ‘द फर्स्ट इयर्स’ कंपनीने बनवलेली ही खेळणी प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली होती आणि प्रत्येक कार्डबोर्डवर एक पिवळा बदक, लाल बीव्हर, हिरवा बेडूक आणि निळा कासव होता. जहाजावरील कंटेनर एकमेकांना धडकल्यामुळे किंवा इतर कोणत्यातरी कारणामुळे, कंटेनरचे दरवाजे आपोआप उघडले गेले आणि ही खेळणी समुद्रामध्ये पडली. लाटांमुळे ही खेळणी पॅकेजिंगमधून मोकळी झाली आणि खेळण्यांमध्ये कोणतेही छिद्र नसल्यामुळे ती पाण्यावरच तरंगत राहिली.
समुद्राच्या प्रवाहांचा अभ्यास
या खेळण्यांनी समुद्राच्या लाटा आणि प्रवाहाच्या मदतीने जगभर प्रवास केला. काही खेळणी अमेरिकेच्या किनाऱ्यावर पोहोचली, तर काही आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यांवर पोहोचली. समुद्रशास्त्रज्ञ कर्टिस एब्समेयर यांनी या खेळण्यांच्या हालचालीचा अभ्यास करण्यासाठी एक अनोखा मार्ग शोधला. त्यांनी या अनोख्या प्रयोगाला ‘फ्लोटिंग सायन्स एक्सपेरिमेंट’ असं नाव दिलं.
या खेळण्यांमुळे शास्त्रज्ञांना समुद्राच्या प्रवाहांचा अभ्यास करणं सोपं झालं, तसंच या अपघाती घटनेमुळे शास्त्रज्ञांना समुद्रातील कचरा कसा फिरतो, याची माहिती मिळाली. प्लास्टिकच्या प्रदूषणाचा दीर्घकाळ टिकणारा प्रभाव किती असतो, हे देखील यातून दिसून आलं. त्याचबरोबर पर्यावरणाच्या समस्यांवरही प्रकाश टाकण्यात मदत झाली.
‘फ्रेंडली फ्लोटीज’ आणि समुद्राचा अभ्यास
वैज्ञानिक समुद्रामध्ये हजारो प्लास्टिक खेळणी टाकू शकत नाहीत, कारण ते नैतिकतेला धरून नाही. पण एका अपघातामुळे हजारो खेळणी समुद्रात पडली आणि वैज्ञानिकांना समुद्राच्या प्रवाहाचा अभ्यास करण्याची अनोखी संधी मिळाली.
कर्टिस एब्समेयर यांनी किनाऱ्यावर खेळणी शोधणाऱ्या लोकांची मदत घेतली. खरंतर याआधी समुद्रातील प्रवाह समजून घेण्यासाठी 1,000 बाटल्या समुद्रात टाकल्या जात असत, पण त्या परत मिळायच्या नाहीत.
एब्समेयर यांनी या खेळण्यांना ‘फ्रेंडली फ्लोटीज’ असं नाव दिलं. 1992 च्या शेवटी ही खेळणी अलास्काच्या किनाऱ्यावर सापडली. ती त्यांच्या मूळ ठिकाणाहून सुमारे 3,200 किलोमीटर दूर होती. एक वर्षानंतर, आणखी 400 खेळणी अलास्काच्या आखाती समुद्राच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर सापडली.
समुद्रात हरवलेले कंटेनर
खराब हवामान आणि जहाजांवर माल व्यवस्थित न ठेवल्यामुळे, दरवर्षी शेकडो जहाजी कंटेनर समुद्रात पडतात. काहीवेळा ही संख्या 10,000 पर्यंतही जाते. हे कंटेनर समुद्रात हरवतात आणि त्यांचं काय होतं, याची नेमकी माहिती नसते. हरवलेल्या कंटेनरची माहिती देण्यासाठी कोणतेही जागतिक नियम नसले तरी, यातून झालेल्या नुकसानीमुळे संशोधकांना समुद्राच्या प्रवाहांचा अभ्यास करण्यास मदत झाली आहे.
एब्समेयर आणि त्यांच्या सहकार्यांनी ‘ओशन सरफेस करंट्स सिम्युलेशन’ (OSCAR) नावाचे कॉम्प्युटर मॉडेल तयार केले. या मॉडेलमध्ये समुद्रातील प्रवाहांचा अभ्यास करण्यासाठी विविध डेटा वापरला जातो. या मॉडेलच्या मदतीने, संशोधकांनी काही खेळण्यांचा प्रवास ट्रॅक केला.
हे OSCAR मॉडेल हवेचा दाब, हवामान प्रणालीचा वेग आणि दिशा यांचा डेटा वापरून समुद्रातील प्रवाहाचा मार्ग ठरवते. ‘फ्रेंडली फ्लोटीज’ कोणत्या दिशेने जातील याचा अंदाज OSCAR मॉडेलने लावला होता. आणि काही वर्षांनी ही खेळणी वॉशिंग्टन राज्यात सापडली.
यामधील काही खेळणी जपानकडे गेली, नंतर अलास्काला परत आली, तर काही बेरिंग सामुद्रधुनीमध्ये बर्फात गोठून गेली. एब्समेयरचा अंदाज होता की ‘फ्रेंडली फ्लोटीज’ला उत्तर ध्रुवापर्यंत पोहोचायला अनेक वर्षे लागतील.
या खेळण्यांच्या अशा प्रकारच्या प्रवासांमुळे समुद्रशास्त्रज्ञांना समुद्राच्या एकमेकांशी असलेल्या संबंधाबद्दल खूप काही शिकायला मिळालं. एब्समेयर यांनी या प्लास्टिकच्या खेळण्यांसाठी ‘फ्लॉट्सॅमेट्रिक्स’ हा शब्द वापरला, कारण ते समुद्रातील कचरा कसा फिरतो हे समजून घेण्याचं एक साधन होते.
आजकाल, समुद्र विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. या खेळण्यांच्या ऐवजी आता जीपीएस ट्रॅकिंग डिव्हाईस असलेल्या तरंगत्या बोयांचा ( buoys) वापर केला जातो, यामुळे संशोधकांना प्लास्टिक कचरा नक्की कुठे जाईल याचा अभ्यास करता येतो.
या घटनेमुळे हे सिद्ध होते की, कोणतीही गोष्ट वाया जात नाही, किंबहुना तिचा उपयोग काहीतरी महत्त्वाचे ज्ञान मिळवण्यासाठी होऊ शकतो.