संयुक्त अरब अमिराती देशामध्ये (UAE) गोल्डन व्हिसा मिळविण्यासाठी एकतर तुम्हाला त्याठिकाणी व्यवसायामध्ये मोठी गुंतवणूक करावी लागते किंवा मालमत्ता खरेदी करावी लागते. मात्र, आता या नियमामध्ये बदल केला आहे. आता काही अटींसह नामांकनाच्या आधारे युएईचा गोल्डन व्हिसा मिळणार आहे.
यापूर्वी हा गोल्डन व्हिसा मिळविण्यासाठी कमीतकमी दोन दशलक्ष दिराम म्हणजे 4.66 कोटी रुपये किंमतीची मालमत्ता खरेदी करावी लागत असे. किंवा त्या देशातल्या कोणत्याही व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागायची.
मात्र, आता “नवीन नामांकन-आधारित व्हिसा धोरण” अंतर्गत, भारतीयांना आता 1 लाख दिराम (सुमारे 23.30 लाख) रुपये भरून युएईचा गोल्डन व्हिसा मिळवता येईल. भारतीयांचं युएई मध्ये होणारं स्थलांतरण पाहता पुढच्या तीन महिन्यांत 5 हजारहून अधिक भारतीय या “नामांकन-आधारित व्हिसासाठी अर्ज करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पहिल्या टप्यात भारत आणि बांग्लादेशचा समावेश
या व्हिसाच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यासाठी भारत आणि बांग्लादेशची निवड केली आहे. भारतात नामांकन-आधारित गोल्डन व्हिसाच्या सुरुवातीच्या स्वरूपाची चाचणी घेण्यासाठी रायद ग्रुप नावाच्या कन्सल्टन्सीची निवड केली आहे. रायद ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक रायद कमाल अयुब म्हणाले की, भारतीयांसाठी युएईचा गोल्डन व्हिसा मिळविण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.
अर्जदारांची पार्श्वभूमी तपासली जाणार
या गोल्डन व्हिसासाठी अर्ज दाखल करणाऱ्या अर्जदाराची संपूर्ण पार्श्वभूमी तपासली जाणार आहे. यामध्ये मनी लाँडरिंग आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का यावर जास्त जास्त लक्ष दिलं जाईल. शिवाय सोशल मीडिया हँन्डल्सही तपासले जातील.
अर्जदार व्यक्ती संस्कृती, आर्थिक, व्यापार, विज्ञान, स्टार्ट अप, व्यावसायिक सेवा अशा कोणत्या क्षेत्राच्या माध्यमातून यूएईला फायदा होईल हेही पाहिलं जाईल. या सगळ्या गोष्टींची तपासणी पूर्ण झाल्यावर रायद ग्रुप कडून सरकारला अर्ज पाठवला जाईल. यावर अंतिम निर्णय हा सरकारकडून घेतला जाईल.
हे ही वाचा : युरोपमध्ये स्थायिक व्हायचंय? पोर्तुगालचा ‘गोल्डन व्हिसा’ सर्वोत्तम पर्याय!
नामांकन श्रेणी
नामांकन श्रेणी अंतर्गत युएई गोल्डन व्हिसा मिळवू इच्छिणाऱ्या अर्जदारांना त्यांच्या मूळ देशाकडून (भारत किंवा बांग्लादेश ज्या देशाचे ते नागरिक आहेत त्या देशाकडूनच) पूर्व-मंजुरी मिळू शकते.
भारतामध्ये ‘वन वास्को सेंटर्स’ या व्हिसा कंसीअर सेवा कंपनीच्या माध्यमातून या व्हिसासाठी अर्ज देता येतील. तर बांगलादेशमध्ये ‘आमचे नोंदणी कार्यालये’, ऑनलाईन पोर्टल आणि या व्हिसासाठी खास नेमून दिलेल्या कॉल सेंटरच्या माध्यमातून अर्ज दाखल करता येईल.
नामांकन आधारित गोल्डन व्हिसाचा फायदा
हा गोल्डन व्हिसा मिळाल्यावर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांना दुबईमध्ये घेऊन जाता येईल. त्याठिकाणी तुम्ही कोणताही व्यवसाय सुरु करु शकता. तुम्ही ड्रायव्हर आणि नोकर ही ठेवू शकता.
ज्यावेळी मालमत्ता खरेदी करुन गोल्डन व्हिसा मिळवता तेव्हा तो काही ठरावीक कालावधीनंतर संपतो. मात्र, नामांकनावर आधारीत मिळलेला गोल्डन व्हिसा हा कायमस्वरुपी असणार आहे.
भारत आणि युएईचे संबंध
नामांकनावर आधारित गोल्डन व्हिसा देणं हा युएई सरकारचा एक पायलेट प्रोजेक्ट आहे. यासाठी पहिली निवड भारताची केली आहे. यावरुन या दोन्ही देशांदरम्यानचे व्यावसायिक, सांस्कृतिक आणि भू-राजकीय संबंध दृढ असल्याचं दिसून येतं. मे 2022 पासून दोन्ही देशांमधील व्यापक आर्थिक भागीदारी करार (CEPA) नंतर हे संबंध अधिक मजबूत झाले आहेत.
गोल्डन व्हिसा नामांकन प्रक्रिया ही युएई आणि त्याच्या व्यापक आर्थिक भागीदारी करारातील देशांमधील एक करार आहे. या पायलट प्रकल्पांतर्गत पहिल्यांदा भारत आणि बांग्लादेशची निवड केली आहे. पुढच्या टप्प्यात चीन आणि इतर सीईपीए देशांचा समावेश होईल.