बाल्ड ईगल हा पक्षी अमेरिकेचे ‘प्रतीक’ मानला जात असला तरी, त्याला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात जवळजवळ 250 वर्षे लागली! बाल्ड ईगलची प्रतिमा अमेरिकेत नाणी, चलनी नोटा, एम्बलम, सैन्य, चिन्हे आणि अनेक देशभक्तीच्या प्रतीकांमध्ये दिसून येते.
2024 च्या ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला या पक्ष्याला अमेरिकेचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी या ऐतिहासिक निर्णयावर सही केली आणि अमेरिकेच्या इतिहासात एक महत्त्वाचा क्षण घडला.
अडीचशे वर्षे का लागली?
1782 मध्ये काँग्रेसने अमेरिकेच्या ग्रेट सीलसाठी बाल्ड ईगलला पहिले राष्ट्रीय चिन्ह मानले होते. या चिन्हात बाल्ड ईगल एका हातात शांततेचे प्रतीक असलेली ऑलिव्ह शाखा आणि दुसऱ्या हातात युद्धाचे प्रतीक असलेला बाण धरून उभा आहे. तरीही, 2024 पर्यंत बाल्ड ईगलला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलेले नव्हते.
बाल्ड ईगल अमेरिकेसाठी योग्य चिन्ह ठरला, कारण तो केवळ अमेरिकेतच आढळतो. त्याचे रूप खूप सुंदर आहे आणि तो खूप शक्तिशाली आहे. इतिहासात, या पक्ष्याला महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे. मात्र अमेरीकन काँग्रेसने त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता दिली नाही.
बहुतेक अमेरिकन लोकांना वाटलं होतं की, बाल्ड ईगल आधीपासूनच राष्ट्रीय पक्षी होता. “अडीचशे वर्षे आपण बाल्ड ईगलला राष्ट्रीय पक्षी म्हणत होतो, पण त्याला त्याचा अधिकृत दर्जा मिळालेला नव्हता,” असे राष्ट्रीय ईगल सेंटरच्या राष्ट्रीय पक्षी उपक्रमाचे सह-अध्यक्ष जैक डेव्हिस यांनी एका मुलाखतीत सांगितले. “आता मात्र, कायदा झाला आहे आणि बाल्ड ईगलला अधिकृतपणे राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता मिळाली आहे.”
मिनेसोटा राज्यातील सिनेट मेंबर्सच्या पाठिंब्यावर, हे विधेयक काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांतून सहजपणे मंजूर झाले. मिनेसोटामध्ये बाल्ड ईगलची संख्या सर्वाधिक आहे आणि “आज आम्ही बाल्ड ईगलला अधिकृतपणे अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मान्यता देत आहोत. यासाठी खूप उशीर झाला होता,” असे विधेयकाचे एक प्रमुख प्रायोजक, प्रतिनिधी ब्रॅड फिनस्टॅड यांनी सांगितले.
बाल्ड ईगलला राष्ट्रीय प्रतीक म्हणून निवडणे सोपे नव्हते. अमेरिकेच्या स्थापनेतील एक नेते, बेंजामिन फ्रँकलिन यांनी ‘ग्रेट सील’वर बाल्ड ईगलचा समावेश करण्यास विरोध केला होता. त्यांनी 1784 मध्ये आपल्या मुलीला लिहिलेल्या पत्रात बाल्ड ईगलला ‘वाईट पक्षी’ म्हटले होते. हा पक्षी इतर पक्ष्यांकडून अन्न चोरतो, अशी टीका केली होती. तर, त्यांनी टर्कीला अधिक योग्य पक्षी मानले होते.
असो, बेंजामिन फ्रँकलिन यांना बाल्ड ईगल आवडत नसला तरी, त्याला आता अमेरिकेच्या चिन्हासाठी निवडण्यात आले आहे. बाल्ड ईगल हा मोठा आणि शक्तिशाली दिसतो, तसेच तो फक्त उत्तर अमेरिकेत आढळतो. चार्ल्स थॉमसन, काँग्रेसचे सचिव, यांनी ‘ग्रेट सील’साठी बाल्ड ईगलची शिफारस केली होती.
बाल्ड ईगल कसा टिकून राहिला?
काही काळासाठी बाल्ड ईगल नामशेष होण्याच्या मार्गावर होता. जंगले कमी होणे, शिकार आणि डीडीटी नावाच्या विषारी रसायनामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली होती. डीडीटीच्या प्रभावामुळे अंडी फार पातळ होऊ लागली होती, त्यामुळे पिल्ले बाहेर येऊ शकत नव्हती. मात्र, लोकांनी जागरूकता निर्माण केली आणि कायदे बनले. यामुळे बाल्ड ईगलच्या संरक्षणास मदत झाली.
1963 मध्ये, 48 राज्यांमध्ये एकूण 417 बाल्ड ईगलच्या घरट्यांची संख्या कमी झाली होती. 1940 मध्ये, बाल्ड ईगल संरक्षण कायदा पास झाला होता. पण तरीही 1963 मध्ये या पक्ष्यांची संख्या सर्वात कमी आढळली होती. या कायद्यामुळे बाल्ड ईगलची शिकार करणे, पकडणे किंवा विकणे बेकायदेशीर ठरवण्यात आले. 1972 मध्ये डीडीटीवर बंदी घातली गेली. त्यामुळे संरक्षण उपायांमध्ये मोठं योगदान मिळालं आणि बाल्ड ईगलची संख्या वाढली.
वन्यजीवसंरक्षकांच्या प्रयत्नांमुळे, बाल्ड ईगलची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 2007 मध्ये, या पक्ष्याला अधिवृत्त प्राण्यांच्या यादीतून काढून टाकण्यात आले. 2020 साली, US Fish and Wildlife Service च्या अंदाजानुसार, एकूण 316,700 बाल्ड ईगल्स असल्याचं सांगितलं गेले.
बाल्ड ईगल हा अमेरिकन लोकांना प्रेरित करत राहतो. खेळाच्या मैदानातून उडताना आणि न्यूयॉर्क सिटी व वॉशिंग्टन डीसीमध्ये आपले घरटे बांधताना तो लोकांना दिसतो.