बुधवार दिनांक 30 जुलै रोजी पहाटे रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपा झाला. या भूकंपानंतर अमेरिकेतील हवाई राज्य, रशियातील कुरिल बेटे आणि जपानमधील होक्काइडो बेटावर त्सुनामी आली. जपान आणि अमेरिकेसह पॅसिफिक महासागरातील अनेक देशांना त्सुनामीचा इशारा जारी केला. पॅसिफिक महासागरातल्या त्सुनामीनंतर रशियामध्ये सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक झाला.
यूरेशिया मध्ये ज्वालामुखीचा स्फोट
रशियातील कामचटका प्रायद्वीपमध्ये बुधवारी सकाळी 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप आला. यानंतर थोड्याच वेळात यूरेशियातील सगळयात मोठी सक्रिय असलेल्या क्ल्युचेवस्कॉय ज्वालामुखीचा स्फोट झाला. ही ज्वालामुखी पेत्रोपावलोव्स्क-कामचात्स्कीपासून उत्तरेकडे 450 किलोमीटर अंतरावर आहे. या ज्वालामुखीची उंची 4,750 मीटर आहे. ज्वालामुखीचा स्फोट झाल्यावर त्यांच्या पश्चिमेकडील बाजूने लाव्हा इतरत्र पसरू लागल्याची माहिती रशिया विज्ञान अकादमीच्या युनायटेड जियोफिजिकल सर्विसने दिली.
पर्यटन दौरे रद्द केले नाहीत
भूकंप, भूकंपानंतर त्सुनामीच्या लाटा आणि सक्रिय ज्वालामुखीचा उद्रेक या तिन्ही भयानक नैसर्गिक आपत्ती एकाच दिवशी रशियामध्ये घडल्या. ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्यावेळी स्फोटांचा खूप जोरात आवाज झाला, सर्वत्र ज्वालांचा उजेड पसरला आणि लाव्हा सगळीकडे पसरू लागला. ही भयानक घटना सुरू असताना यूरेशिया इथे येणाऱ्या पर्यटकांच्या दौरे मात्र रद्द केले नाहीत. त्यामुळे अनेक पर्यटकांना ही घटना पाहता आली. अनेक पर्यटकांनी या घटनेचे व्हिडीओ घेऊन ते सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
हे ही वाचा : रशियामध्ये भूकंप तर रशिया, अमेरिका आणि जपानला त्सुनामीचा ही तडाखा
त्सुनामीची भिती निवळली
रशियातील या भूकंपानंतर हवाई ते जपानपर्यंत त्सुनामीच्या लाटा आल्या होत्या. यामुळे पॅसिफिक महासागरालगत असलेल्या अनेक देशांमधील किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यामुळे किनारपट्टीतील नागरिकांना सुरक्षित जागेवर हलवलं होतं. अनेक देशांनी बंदर आणि जलवाहतूक बंद केली होती. मात्र, आता त्सुनामीची शक्यता निवळल्यामुळे नागरिकांना त्यांच्या घरी परतण्याची सूचना दिली आहे. तसेच अन्य व्यवहारही हळूहळू सुरू केले आहेत.
भूकंपानंतर 125 हून जास्त आफ्टरशॉक्स
अमेरिका जियोलॉजिकल सर्वेनुसार, 8.8 रिश्टर स्केल भूकंपानंतर 125 हून जास्त आफ्टरशॉक्स झाले. यामधल्या तीन आफ्टरशॉक्सचे धक्के हे खूप मोठे होते. भूकंपानंतर 45 मिनीटांनी आलेला 6.5 आफ्टरशॉकची तीव्रता खूप जास्त होती.
1952 साली रशियामध्ये 9.0 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतरचा हा सगळ्यात मोठा भूकंप आहे.