मोबाईलवर दिवसातून निदान एकदा तरी आपण कोणत्या तरी नवीन साईटवर भेट देतो. त्या साईटवर प्रवेश करण्यासाठी सहजपणे आपला ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक आणि नाव, लिंग अशी माहिती देतो. त्या वेबसाईटवरचं काम झालं की बाहेर पडतो. पुन्हा कधी आपण त्या वेबसाईटला भेट नाहीत. पण आपली ही माहिती तिकडे ‘सेव्ह’ राहिलेली असते.
काही वेळेला आपण कोणत्या तरी शॉपिंग साईटला भेट देतो तिथे पण आपण आपली आवश्यक ती माहिती देतो. कालांतराने त्या शॉपिंग साईटवरुन खरेदी करुन झाली आणि आता गरज नाही असं वाटलं की, ते ॲप डिलिट करुन टाकतो. पण ते ॲप डिलिट करताना तिकडे दिलेली आपली वैयक्तिक माहिती मात्र आपण डिलिट करत नाही. हे असं अनेकदा अनेक वेबसाईट आणि ॲपच्या बाबतीत घडतं. यामुळे आपण स्वत:हूनच आपला डेटा, वैयक्तिक माहिती या डेटा सेंटर्सना देत असल्याचं आपल्या लक्षातही येत नाही.
पण ही माहिती दिल्याशिवाय आपल्याला या वेबसाईट्स किंवा ॲप्स वापरताही येऊ शकत नाहीत हेही तथ्य आहे. पण यामध्ये एक मार्ग आहे तो म्हणजे ती वेबसाईट किंवा ते ॲप वापरून झाल्यावर तिथली आपली माहिती डिलिट करुन मग त्या वेबसाईटवरुन बाहेर पडायचं. किंवा ते ॲप अनइन्स्टॉल करायचं. पण ते कसं हे समजून घेऊयात.
आपण माहिती दिलेल्या वेबसाईट्स किंवा ॲपची यादी तयार करा
आपल्याला इंटरनेटवरुन आपली माहिती डिलिट करायची असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण जे ॲप आणि वेबसाईट सध्या वापरत नाहीत त्याची यादी करायची. ही यादी करताना तुम्हाला त्या सगळ्या वेबसाईट्स आणि ॲप आठवणं थोडं अशक्यच आहे. पण यावरही उपाय आहे. तुमच्या मेल बॉक्समध्ये जायचं. तिथे सर्च या पर्यायामध्ये ‘वेलकम’, ‘कन्फर्म यूवर ईमेल’ आणि ‘थँक्स फॉर साईनिंग अप’ हे कीवर्ड टाकून जे जे मेल समोर येतील ते उघडायचे. या मेलमधून तुम्हाला तुम्ही आतापर्यंत कोणत्या वेबसाईटवर ॲपवर लॉग – इन केलेलं याची माहिती मिळेल.
यामध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हॉट्सॲप, काही शॉपिंग वेबसाईट्स आणि ॲपची नावं तुम्हाला मिळतील. ती सगळं नावं लिहून ठेवायची आणि मग एक एक करुन जे ॲप आणि वेबसाईट वापरत नाहीत त्यावर जाऊन आपली माहिती डिलिट करायची आहे.
डिलिट किंवा डिॲक्टिव्ह अकाऊंट
आता तुम्ही न वापरत असलेल्या वेबसाईट्स आणि ॲपची यादी तुमच्यासमोर असणार. त्यावरुन तुम्हाला तुमच्या अकाऊंटसह माहिती डिलिट करण्यासाठी पहिलं त्याच्या लॉग इन मध्ये जायचं आहे. मग तिथला गो टू सेटिंग्ज हा पर्याय निवडायचा आहे. या पर्यायामध्ये ‘डिलिट अकाऊंट’ किंवा ‘क्लोज अकाऊंट’ किंवा ‘डिअक्टिवेट’ अशा तीन पर्यायापैकी जो पर्याय उपलब्ध असेल तो निवडायचा आहे. म्हणजे त्या – त्या वेबसाईट्स किंवा ॲपवरुन तुमचं अकाऊंट डिलिट होऊन जाईल.
पण हे इतकं सोपं नाही. काही वेबसाईट्स किंवा ॲपवर हे पर्याय लपवून म्हणजे हाइड करुन ठेवले जातात. त्यामुळे मग अशा वेबसाईट्स आणि ॲपवरुन अकाऊंट डिलिट करण्यासाठी तुम्हाला गुगलची मदत घ्यावी लागते.
यासाठी गूगलवर जाऊन सर्च पर्यायामध्ये “हाऊ टू डिलिट (वेबसाईटचं नाव) अकाऊंट” असा प्रश्न विचारायचा. तिथे गूगल तुम्हाला मदत करुन संबंधित वेबसाईटवरुन अकाऊंट डिलिट करण्यासाठी मार्ग सांगतो.
डेटा ब्रोकर्समधून माहिती कशी नष्ट करायची?
अनेकदा अनेक वेबसाईटवर आपलं नाव, जन्मतारिख, वय, पत्ता, लिंग, आवडी-निवडी अशा स्वरुपाची माहिती गोळा केली जाते. बहुतांशी वेळा शॉपिंग साईट्स किंवा हेल्थ, फिटनेस ॲपवर अशी माहिती गोळा केली जाते. या माहितीचा उपयोग आपली परवानगी न घेता मार्केटिंगसाठी केला जातो. त्यामुळे वेळीच ही माहिती डिलिट करणं गरजेचं असतं. तर ही माहिती डिलिट करण्यासाठी विशेष वेबसाईट्स आहेत. त्यावर जाऊन त्यांना माहिती देऊन ही आपली वैयक्तिक माहिती इंटरनेटवरुन नष्ट केलं जाते.
यामध्ये वेबसाईट्स पुढीलप्रमाणे :
डिलिट मी – या वेबसाईटवर ब्रोकरकडून माहिती डिलिट करुन घेण्यासाठी पैसे भरावे लागतात.
ओपटेरी – या वेबसाईटवर मोफतपणे किंवा पैसे भरुनही आपण आपली माहिती डिलिट करु शकतो.
कनारी – ही वेबसाईटही इंटरनेट ब्रोकर जवळची आपली माहिती डिलिट करण्यासाठी चांगला पर्याय आहे.
या वेबसाईट्सवरुन कोणत्याही वेबसाईट्सवरची आपली वैयक्तिक माहिती आपण डिलिट करु शकतो.
मोबाईल आणि अन्य गॅझेटमधलं गूगल ट्रॅकर बंद करणे
तुम्हाला तुमच्याबद्दलही माहिती नसेल इतकं गूगलला तुमच्याबद्दल माहिती आहे. मात्र, गूगलपासूनही तुम्ही काही गोष्टी लपवू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा इतर गॅझेटमध्ये काही महत्त्वपूर्ण सेंटिग्ज करणं गरजेचं आहे.
यासाठी सगळ्यात पहिल्यांदा माय ॲक्टिव्हिटी डॉट गूगल डॉट कॉम (muactivity.google.com) वर जायचं आहे. तिथे डिलिट ॲक्टिव्हिटी बाय या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यामध्ये ऑल टाइम हा पर्याय निवडायचा आहे. आणि मग ॲक्टिव्हिटी कंट्रोल्स हा पर्याय बंद (OFF) करायचा आहे.
हा टप्पा पूर्ण झाल्यावर पुढे गूगल टेक ऑऊटमध्ये जाऊन तुमच्या माहितीची कॉपी डाऊनलोड करुन घ्यायची आहे. आणि मग जर तुम्हाला तुमचं गुगल अकाऊंटवरुन डिलिट करायचं असेल तर करु शकता.
खोट्या माहितीचा वापरा करा
जर तुम्ही कोणत्या तरी क्षुल्लक वेबसाईटवर किंवा ॲपवर तात्पुरता लॉग इन करणार असाल तर त्यासाठी तुम्ही तुमचा मुख्य ईमेल आयडी न देता अन्य ईमेल आयडी देऊ शकता. प्रोटोन मेल किंवा तूतानोता यासारख्या साईट्सवर तुम्ही निनावी मेल आयडी म्हणजे तुमचं नाव, पत्ता, वय, लिंग अशी चुकीची माहिती देऊन निनावी मेल आयडी तयार करु शकता. तसेच अशा साईट्सवर लॉग इन करताना व्हर्च्यूअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) चा वापर करता येईल. यावरुन गुगलला तुमचं खरं लोकेशन ट्रेस करता येणार नाही. तसंच सर्च इंजिनसाठी ब्रेव्ह किंवा टोर अशा ब्राउझर्सचा वापर करता येऊ शकतो.
स्वत:ला गुगलवर शोधा
हे सगळे टप्पे पूर्ण केल्यावर एकदा खात्री करुन घेण्यासाठी गुगलवर स्वत:चं नाव, यूजर नेम आणि ईमेल आयटी टाकून सर्च करा. त्यावेळी कोण कोणती माहिती समोर येते हे तुम्हाला तपासता येईल. यावेळी जर तुमच्याबद्दल काही चुकीची माहिती आढळली तर त्या साइटवर मेल करुन ती माहिती डिलिट करण्याचे सूचना तुम्ही देऊ शकता.
जुन्या पोस्ट आणि कंमेट्स डिलिट करा
अलीकडे जेव्हा तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये मुलाखतीसाठी जाता तेव्हा तिथल्या एचआरकडून तुमचा सोशल मीडियावरचा वावर तपासला जातो. काही वेळेला कॉलेजमध्ये असताना वगैरे आपण चुकीच्या पोस्ट वा कंमेट्स केलेल्या असतात. अशा गोष्टी आपल्या सोशल मीडिया अकाऊंड्सवरुन डिलिट करण्यासाठीही मार्ग आहे.
यासाठी तुम्हाला पुढील टूल्स मदत करतील –
ट्विट डिलिट – यामध्ये तुमचे जुने ट्विट्स डिलिट होतील.
जम्बो अप रिमुव्हस – यामध्ये फेसबुक आणि ट्विटरवरील तुमच्या जुन्या पोस्ट डिलिट होतील.
रिडेक्ट डॉ. डेव – यावरुन रेडिट, डीसकॉर्ड आणि अन्य साईटवरील तुमच्या जुन्या पोस्ट डिलिट होतील.