येत्या वर्षात 1 जानेवारी 2025 पासून ते 2039 या काळात जन्माला येणाऱ्या नवीन जनरेशनला बिटा (Gen Beta) बोलले जाणार आहे. तर त्यांचे पालक जनरेशन वाय (Y) आणि जनरेशन झेड (Z) पिढीतील असतील. ग्रीक अल्फाबेटमध्ये ‘अल्फा‘ नंतर ‘बीटा‘ येतो, म्हणून त्यांना बीटा हे नाव दिले आहे.
जनरेशन म्हणजे काय?
जनरेशन म्हणजे एकाच काळात जन्म झालेल्या लोकांचा गट. प्रत्येक पिढीचे अनुभव, विचार, आणि जीवनशैली त्या काळातील परिस्थितीवर आधारित असतात. 1928 मध्ये सामाजिक शास्त्रज्ञ कार्ल मॅनहाइम यांनी यावर विचार मांडले होते की, प्रत्येक पिढीचा अनुभव त्या काळाच्या ऐतिहासिक आणि सामाजिक घटकांवर अवलंबून असतो.
जनरेशन बीटा का नाव ठरलं?
जनरेशन बीटा हे नाव जनरेशन अल्फा नंतर येणाऱ्या पिढीस सूचित करण्यासाठी ठेवण्यात आले आहे. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रोबोटिक्स आणि तंत्रज्ञानाच्या नवीन बदलांचा मोठा प्रभाव असणार आहे. ही पिढी तंत्रज्ञानाच्या अत्याधुनिक युगात वाढेल आणि या पिढीला स्मार्टफोन, इंटरनेट आणि इतर डिजिटल साधनांचा वापर अगदी लहान वयापासून करण्याची संधी मिळेल. तसेच या पिढीला भविष्यातील अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल, जसे की ग्लोबल वॉर्मिंग, प्रदूषण, संसाधनांची कमतरता आणि पर्यावरणीय संकट.
वेगवेगळ्या पिढ्यांची ओळख
द ग्रेटेस्ट जनरेशन (GI जनरेशन): 1901-1927
दुसरे महायुद्ध आणि महामंदीच्या काळात जन्म झालेल्या पिढीला कठीण परिस्थितींना सामोरे जावं लागलं. या काळात जन्म झालेल्यांना महायुद्धाच्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं.
द सायलेंट जनरेशन: 1928-1945
1928 ते 1945 दरम्यान जन्म झालेल्या पिढीला सायलेंट जनरेशन (Silent Generation) म्हणतात. ही पिढी खूप मेहनती मानली जात होती आणि स्वावलंबीही होती.
बेबी बूमर जनरेशन: 1946-1964
दुसऱ्या महायुद्धानंतर लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढ झाली आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या पिढीला अधिक आरामदायक जीवनशैली अनुभवता आली.
जनरेशन एक्स ( X ): 1965-1980
जनरेशन X साठी तंत्रज्ञान नवीन होते. इंटरनेट आणि व्हिडीओ गेम्सची सुरुवात याच काळात झाली आणि या पिढीतील पालकांनी आपल्या मुलांना सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे.
मिलेनियल्स ( जनरेशन Y): 1981-1996
या पिढीने तंत्रज्ञानाशी जुळवून घेतले आणि स्वतःला अपडेट केले. तसेच डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा वापर वाढला.
जनरेशन ( Z ): 1997-2009
1997-2009 दरम्यान जन्मलेल्या पिढीला इंटरनेटसह सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्म मिळाले. डिजिटल युगात अनेक मोठे बदल पाहिले. ही पिढी स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाही.
जनरेशन अल्फा : 2010-2024
जन्मापूर्वीच सोशल मीडिया आणि इंटरनेट प्लॅटफॉर्म असणारी ही पहिली पिढी आहे. ही सर्वात तरुण नवीन पिढी आहे. या पिढीतील मुलांच्या पालकांना इंटरनेट, मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचा वापर करणे चांगल्या प्रकारे माहीत आहे
‘जनरेशन बीटा’ ही एक स्मार्ट, तंत्रज्ञानावर आधारित, आणि सामाजिक बदलांना सामोरे जाणारी पिढी असेल.