आजकाल आपण बघतोय की आपले अनेक मित्र-मैत्रिणी एकामागोमाग एक लग्न करून संसार थाटतायत, कुणाकुणाला तर बाळंही झालीत. आणि आपण? अजूनही मोबाईलमध्ये डेटिंग ॲपवर ‘स्वाइप’ करत बसलोय. कधीकधी तुमचा मनात असाही विचार येत असेल की, बापरे! सगळे लग्न करून बसलेत. आपणच एकटे लग्नाचे राहिलोय का ? आपल्या वयाच्या बहिणीचं किंवा भावाचं लग्न झालं, चुलत भावांना बाळं झाली किंवा अगदी आपल्यापेक्षा लहान मित्र-मैत्रिणीही लग्नबंधनात अडकलेत.
कधीकधी तर असं होतं की, ‘लग्न कधी करतोयस/करतेयस?’ हा प्रश्न ऐकून-ऐकून कान किटून जातात. घरात, नातेवाईकांत, मित्रमंडळींमध्ये जिथे जाल तिथे हाच विषय. समारंभात तर या चौकशा जरा जास्तच असतात. पण या सगळ्याचा अर्थ असा नाही की सगळे लग्न करत आहेत म्हणून आपणही लगेच लग्न करायलाच पाहिजे.
प्रत्येकाची टाईमलाइन वेगळी असते
तुमचे मित्र-मैत्रिणी ठराविक वयात किंवा ठराविक वेळेत लग्न करतात याचा अर्थ असा नाही की हीच लग्न करायची योग्य वेळ आहे. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं आणि प्रत्येकाचा प्रवासही वेगळा असतो. ‘त्यांच्याशी बरोबरी साधायची’ किंवा ‘मागे पडलोय’ या दबावाखाली येऊन तुम्ही अशा नात्यात अडकू शकता जे तुमच्यासाठी योग्य नसेल. आणि ही एक खूप मोठी चूक ठरू शकते.
तुम्ही तुमच्या वेगळ्या वाटेवर आहात, यामागे काहीतरी कारण नक्कीच असेल. कदाचित तुम्हाला अजून काही गोष्टी शिकायच्या असतील, स्वतःला सिद्ध करायचं असेल किंवा हे स्वातंत्र्य असताना तुम्हाला काही स्वप्नं पूर्ण करायची असतील. लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढतात, स्वातंत्र्य कमी होतं. त्यामुळे, या वेळेचा सदुपयोग करा. जेव्हा योग्य वेळ येईल, तेव्हा योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल. ‘लग्न’ म्हटलं की मोठा सोहळा, पाहुणे, मानपान आणि मग जबाबदाऱ्यांचा डोंगर. पण यात घाई करून या सगळ्यासाठी तयार नसताना पुढे जाण्यात काही अर्थ नाही.
इतरांशी तुलना करू नका
दुसऱ्यांच्या आयुष्याशी स्वतःच्या आयुष्याची तुलना करणं खूप सोपं आहे. सोशल मीडियावर त्यांचे हसरे फोटो, सुट्ट्यांचे क्षण किंवा त्यांच्या मुलांचे गोंडस व्हिडिओ बघून आपल्याला वाटतं, लग्न करून हे किती सुखी आहेत आणि आपल्या आयुष्यात तर काहीच नाहीये. पण हे सगळं फक्त त्यांच्या आयुष्यातले चांगले क्षण असतात, ते पूर्ण सत्य नसतं.
तुम्ही त्यांची भांडणं, एकमेकांशी अबोला किंवा नातं टिकवण्यासाठी त्यांना किती मेहनत करावी लागते, या गोष्टी बघत नाही. लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या, एकमेकांना समजून घेणं, छोटे-मोठे वाद, घरातली कामं, मुलांची काळजी, नोकरी आणि संसार यांचा ताळमेळ बसवताना बऱ्याचदा अनेकांची चांगलीच दमछाक होते.
त्यामुळे, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय आहे किंवा काय नाही, याचा विचार करत बसण्यापेक्षा तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुमच्या आयुष्यात सध्या काय आहे, तुम्ही काय करू शकता, कोणत्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात, यावर लक्ष द्या. तुमचा स्वतःचा प्रवास आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. स्वतःच्या आवडीनिवडी जोपासा, करिअरवर लक्ष द्या, मित्र-मैत्रिणींसोबत मजा करा. तुमचं ‘सिंगल’ असणं ही काही कमतरता नाहीये, तर हा तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्याचा पुरेपूर आनंद घ्या.
हेही वाचा: शुभमंगलम सावधान!
लग्न झालेल्या मित्रांना दूर करू नका
मित्र-मैत्रिणींची लग्न झाली, त्यांचे संसार सुरू झाले की कधीकधी आपल्याला थोडं एकटं वाटतं. त्यांच्या आयुष्यात जे बदल झाले आहेत, ते आपल्या आयुष्यात नाहीत, याची जाणीव करून देणाऱ्या गोष्टी आपण टाळतो. उदाहरणार्थ, लग्न झालेल्या मित्र-मैत्रिणींच्या गेट-टुगेदरला जाणं टाळणं, त्यांच्या मुलांच्या वाढदिवसाला न जाणं किंवा त्यांच्यासोबत जास्त वेळ न घालवणं. हे असं वागणं स्वाभाविक असलं तरी, तुमच्या लग्न झालेल्या मित्रांना स्वतःपासून दूर करू नका.
विचार करा, हेच मित्र-मैत्रिणी तुमच्या प्रत्येक सुख-दुःखात तुमच्यासोबत होते. तुमच्या वाईट काळात त्यांनी तुम्हाला साथ दिली, चांगल्या काळात तुमच्यासोबत आनंद साजरा केला. मग आता त्याचं लग्न झालं म्हणून त्यांच्यापासून दूर का जायचं? खरंतर याच मैत्रीतून तुम्हाला आयुष्यात पुढे काय येऊ शकतं आणि ते कसं हाताळायचं, असं खूप काही शिकायला मिळतं. ते त्यांचे अनुभव तुमच्यासोबत शेअर करतात. लग्नानंतरच्या जबाबदाऱ्या, छोटे-मोठे वाद, एकमेकांना समजून घेणं, घरातले प्रश्न या सगळ्याबद्दल ते तुम्हाला सांगू शकतात. लग्नानंतर घरात होणारे बदल, नातेसंबंधांतील गुंतागुंत किंवा अगदी कौटुंबिक जबाबदाऱ्या कशा सांभाळायच्या, हे तुम्ही त्यांच्याकडून शिकू शकता. यामुळे तुम्हाला भविष्यासाठी तयारी करता येते. त्यामुळे, मित्र- मैत्रिणीच लग्न झालं असले तरी त्यांच्याशी असलेले नातेसंबंध टिकवून ठेवा. त्यांची साथ तुमच्यासाठी नेहमीच महत्त्वाची असेल.
तुमच्यासारख्या मित्रांना शोधा
वरील गोष्टी तर महत्वाच्या आहेतच पण, तुमच्यासारखे अजूनही सिंगल असणाऱ्यांना, डेटिंग करणारे किंवा लग्नाचा विचार करत आहेत असे मित्र-मैत्रिणी असणं पण गरजेचं आहे. जे डेटिंगचे चढ-उतार समजून घेतात, जे प्रेम शोधत आहेत आणि जे तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही या प्रवासात एकटे नाही आहात. त्यामुळे, तुमच्या मित्रमंडळींचा एक ‘मिक्स’ ग्रुप बनवा. त्यात लग्न झालेले मित्रही असावेत आणि तुमच्यासारखे सिंगल मित्रही असावेत. तुमचा स्वतःचा मार्ग आणि तुमच्या स्वतःच्या अपेक्षांवर लक्ष केंद्रित करा. योग्य वेळी, योग्य माणूस तुमच्या आयुष्यात नक्की येईल.
सिंगल असणं म्हणजे काही ‘प्रॉब्लेम’ नाही
सिंगल असणं हा काही प्रोब्लेम नाहीये की, त्यावर उपाय करायचा आहे. हा फक्त आयुष्याचा एक टप्पा आहे, असा टप्पा जिथे तुम्ही तुम्हाला हवं ते करू शकता. तुमच्या आवडी-निवडी जोपासू शकता, तुमच्या करिअरवर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकता. तुमचा प्रवास तुम्हाला कुठेही घेऊन जावो, मित्र-मैत्रिणींचे लग्न झालेले असताना तुम्ही सिंगल असणे म्हणजे तुम्ही आयुष्यात हरलात असं नाही. प्रवासाचा आनंद घ्या.