वर्ष 2025 सुरू होऊन 7 दिवस उलटले. संपूर्ण जगात नवीन वर्षाच्या आगमनाचं वातावरण आहे. मात्र, रशियामध्ये 7 जानेवारीला सर्व लोक एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. 7 जानेवारीला सर्व रशियन लोक चाळीस दिवसाचा उपवास सोडून ख्रिसमसचा आनंद साजरा करत आहेत. बरं फक्त रशियातलेच नाही तर जगभरातले 12 टक्के ख्रिश्चन लोक 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा करत आहेत.
रशियामध्ये ज्यूलीयस कॅलेंडरनुसार ख्रिसमसचा उत्सव
ख्रिस्तपूर्व 46 मध्ये रोमन राजे ज्यूलीयस कॅलेंडरचा वापर केला जायचा. हे कॅलेंडर सौरकलेवर आधारित होतं. त्यामुळे जगभरामध्ये वेळेच्या गणितात मोठ्या प्रमाणावर तफावत होती. सन 1582 मध्ये, ग्रेगोरियन कॅलेंडर उदयास आलं. ख्रिश्चन बहुल देशांमध्ये हे कॅलेंडर वापरण्यास सुरुवात झाली. ब्रिटनमध्ये 1752 पासून ग्रेगोरियन कॅलेंडर वापरू लागले. हळूहळू आशिया खंडामध्येही हेच कॅलेंडर प्रामुख्याने वापरु लागले.
मात्र, ख्रिश्चन धर्मातील ऑर्थोडॉक्स पंथांतील ख्रिस्ती बांधव आजही ज्यूलीयस कॅलेंडरच पाळतात. या कॅलेंडरनुसारच ते आपले धार्मिक सण-उत्सव साजरे करतात. सन 1923 पासून ज्यूलीयस कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये 13 दिवसाचा फरक पडला आहे. त्यामुळे जगभरात अन्य ख्रिस्ती भाविक हे ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा करतात. तर रशिया आणि पूर्वेकडील ऑर्थोडॉक्स पंथांतील ख्रिस्ती बांधव हे 7 जानेवारीला बाळ येशुच्या जन्माचा उत्सव साजरा करतात.
ख्रिसमसच्या सणापूर्वी 40 दिवसाचा उपवास?
ख्रिसमस सणाच्या तारखेप्रमाणे हा सण साजरा करण्याच्या पद्धतीतही फरक दिसून येतो. रोमन ख्रिश्चन पंथातील ख्रिस्ती बांधव हे इस्टर सणापूर्वी 40 दिवसाचा उपवास पाळतात. मात्र, ऑर्थोडॉक्स पंथांतील बांधव हे ख्रिसमस सणापूर्वी 40 दिवसाचा उपवास ठेवतात. 6 जानेवारीला संध्याकाळी मिस्साबलिदानाची प्रार्थना केली जाते. त्यानंतर, उपवास सोडून ख्रिसमसच्या सोहळ्याला सुरुवात होते.
प्रभू येशु ख्रिस्ताच्या 12 शिष्यांच्या संदर्भाने या सोहळ्यासाठी एकूण 12 पारंपारिक पदार्थांचा समावेश असतो. या पदार्थांमध्ये कोबीचे सूप, शिजवलेले सफरचंद, वेगवेगळ्या पालेभाज्या असलेली भाजी आणि पाव असे विविध पदार्थ असतात.
सर्व चर्चमध्ये कॅरोल गायले जातात. गव्हाच्या पिकांनी घरं सजवली जातात. सर्बियनमधल्या काही चर्चेसमध्ये ओक वृक्षांची फांदी किंवा छोटं झाड जाळलं जातं.
युक्रेनमध्ये ख्रिसमस सणांच्या तारखेत केला बदल
युक्रेनमध्ये बहुसंख्येने ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स पंथिय बांधव आहेत. सन 2023, पर्यंत युक्रेनमध्ये 7 जानेवारीला ख्रिसमस साजरा केला जायचा. पण रशिया-युक्रेन युद्धामुळे 2023 साली युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलंस्की यांनी 25 डिसेंबर ला ख्रिसमस साजरा करण्याचा कायदा पास केला.
युक्रेनमधल्या जनतेला त्यांचं आयुष्य हे त्यांच्या इच्छेनुसार, परंपरेनुसार जगायचं आहे असं वक्तव्य करत यापुढे युक्रेनमध्ये 25 डिसेंबरला ख्रिसमस साजरा केला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
धार्मिक संस्थावर युद्धाचा परिणाम
युक्रेनमध्ये ऑर्थोडॉक्स चर्च ऑफ युक्रेन आणि युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्च (यूओसी) असे दोन चर्चेस आहेत. त्यापैकी युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्चवर रशियाचा जास्त प्रभाव आहे. ही चर्चेस मॉस्कोशी जोडलेली आहेत.
रशिया-युक्रेन युद्धाला सुरुवात झाल्यावर 20 ऑगस्ट 2024 मध्ये, रशियाशी जोडलेल्या ऑर्थोडॉक्स चर्च वर बंदी घालण्याचा कायदा केला गेला. युक्रेनवरील हल्ल्यामध्ये या चर्चचा सहभाग असल्याचा आरोप युक्रेन सरकारने केला आहे.
या आरोपाखाली युक्रेनियन ऑर्थोडॉक्स चर्चमधल्या अनेक प्रतिनिधी आणि धर्मगुरूवर देशद्रोहाचे आरोप दाखल करत कारवाई सुरू केली आहे.
रशियामध्येही ख्रिसमसची तारिख बदलण्याची शक्यता
दरम्यान, युक्रेनमध्ये राजकीय पार्श्वभूमीमुळे ख्रिसमसची तारिख बदलली. त्यानुसार, रशियामध्ये सुद्धा 2100 मध्ये ख्रिसमसची तारिख बदलावी लागणार आहे. कारण, ज्यूलियस आणि ग्रेगोरियन या दोन्ही कॅलेंडरमध्ये असलेल्या तफावत ही काळाच्या ओघात वाढत जाणार आहे. या वाढत्या तफावतीमुळे 75 वर्षानंतर रशिया आणि जगातल्या अन्य देशातील ऑर्थोडॉक्स पंथीय बांधवांना 8 जानेवारीला ख्रिसमस साजरा करावा लागणार आहे.