आजकाल अनेक लोक त्यांच्या कामाकडे वेगळ्या दृष्टीने पाहू लागले आहेत. काही लोक कामात रस घेत नाहीत, काही फक्त वेळ भागवतात, तर काही नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत. यातूनच सध्या एक नवीन संकल्पना समोर आली आहे ती म्हणजे ‘क्वाएट क्विटिंग’.
क्वाएट क्विटिंग म्हणजे नोकरी सोडणं नाही, पण हळूहळू काम कमी करणं.फक्त ठरवलेलं तेवढंच काम करणं आणि त्याहून जास्त जबाबदारी न घेणं. आपल्या हे ऐकायला जरी साधं वाटतं असलं तरी यामागे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत.
कामाचा ताण की कामच कंटाळवाणं?
स्वतःला एक प्रश्न विचारून बघा, सकाळी उठल्यावर कामाला जायचं मनापासून वाटतं का? की उठणं, ऑफिसला जाणं, आणि सगळी दिनचर्या नुसतं ओझं वाटतं?
आज बऱ्याच लोकांना त्यांच्या नोकरीबद्दल अनेक वेगवेगळ्या भावना असतात. काही जणांना कामात रस वाटतो, तर काही जण काम फक्त पगारासाठी करत असतात. काम करण्याचा उत्साह नसणं, सतत थकवा जाणवणं, कामावर जाताना मनावर दडपण असणं ही सगळी क्वाएट क्विटिंगची लक्षणं असू शकतात.
कोरोनानंतर बदललेला प्राधान्यक्रम
कोरोना काळानंतर अनेक लोकांना आपल्या आयुष्याकडे नव्यानं पाहता आलं. त्यांना कामाच्या आणि आपल्या जीवनाच्या वेळेबद्दल जास्त विचार करायला वेळ मिळाला. घरात बसून काम करताना अनेकांना लक्षात आलं की, केवळ काम हेच आयुष्य नाही.
त्यामुळे आता लोक त्यांच्या मानसिक आरोग्याला, कुटुंबाला आणि स्वतःच्या वेळेला जास्त महत्त्व देऊ लागले आहेत. हे बदल कामाच्या ठिकाणी देखील स्पष्टपणे जाणवत आहेत.
कामाचं ओझं आणि बदलण्याची गरज
समजा एका विद्यार्थ्याला दररोज खूप अभ्यास करायला लावला आणि विरंगुळ्याकरता वेळ नाही दिला, तर तो नक्कीच कंटाळेल. त्याला अभ्यासाची भीती वाटेल. तसंच कामाचंही आहे. जर कोणत्याही कर्मचाऱ्याला कामातून विश्रांती नाही मिळाली, वेळेवर काम संपत नसेल, कामावर सतत दबाव असेल तर त्या व्यक्तीचा कामातला रस कमी होणारच.
आणि हे फक्त त्या कर्मचाऱ्याचं अपयश नाही, तर कामाच्या व्यवस्थेत बदल करण्याची गरज आहे. कामाचं प्रमाण, कामाची पद्धत आणि कामाचं वातावरण हे सगळं संतुलित असणं खूप गरजेचं आहे.
कामाच्या ठिकाणी मोकळीक आणि संवाद गरजेचा
कामाचा अनुभव चांगला होण्यासाठी कामाच्या ठिकाणचं वातावरण खूप महत्त्वाचं असतं. ऑफिसमध्ये जर चांगले सहकारी असतील, वरिष्ठांशी खुलेपणाने संवाद साधता येत असेल आणि काम करण्याचं स्वातंत्र्य असेल, तर कोणालाही कामात रस वाटेल.
पण जर प्रत्येक गोष्टीसाठी वरिष्ठांचा परवानगी घ्यावी लागली, निर्णय घेता आले नाहीत, किंवा चूक झाल्यामुळे शिक्षा झाली तर नक्कीच कामाचा उत्साह हा कमी होतो. कामात मोकळीक असली तरी जबाबदारीने वागण्याची संधी असली पाहिजे.
‘हायब्रिड वर्किंग’चा प्रभाव
सध्या अनेक कंपन्यांमध्ये हायब्रिड वर्किंग सुरु आहे. आठवड्यातले काही दिवस ऑफिसमध्ये आणि काही दिवस घरून काम. त्यामुळे वेळेचं आणि कामाचं व्यवस्थापन अधिक महत्त्वाचं झालं आहे. पण यामध्येही अडचणी आहेतच. घरून काम करताना बरेच वेळा कामाचे ठराविक तास नसतात. सुट्टीच्याही दिवशी काम करावं लागतं. त्यामुळे कामाचा आणि खासगी वेळाचा समतोल बिघडतो. यामुळे याचा थेट परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर आणि वैयक्तिक आयुष्यावर होतो. त्यामुळे कोणतीही नोकरी असो, तिचे ठरलेले कामाचे तास असणं आवश्यक आहे.
असुरक्षित नोकऱ्यांचं वाढतं प्रमाण
आजकाल काही ठिकाणी झिरो अवर कॉन्ट्रॅक्ट्स दिले जातात. म्हणजे कामाचे तास ठरलेले नसतात. यामुळे तुम्हाला कधीही कामासाठी बोलावलं जाऊ शकतं, आणि या कामाचे पैसेही तितकेच मिळतात. या कामाच्या असुरक्षिततेमुळे अनेक कर्मचारी हे सतत चिंतेत असतात. त्यांना स्वतःच्या भविष्यासाठी पुढील योजना करणं कठीण जातं. यामुळे कामाचा ताण आणखी वाढतो.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोकरी सुरक्षित असणं, पगार वेळेवर मिळणं आणि भविष्याची खात्री असणं या गोष्टी कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी मुलभूत गरजा आहेत.
अनेक वेळा क्वाएट क्विटिंग पाहून कर्मचारी आळशी, निष्काळजी वाटतात. पण ते फक्त वरवरचं चित्र असतं. खरी अडचण असते ती कामाच्या व्यवस्थेत. म्हणूनच कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या भावना समजून घेणं, त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देणं, आणि योग्य प्रशिक्षण, विश्रांती, आणि वेळेचं नियोजन यामध्ये सुधारणा करणे हे जास्त गरजेचं आहे.
आपल्याला आपलं काम आनंदाने करता आलं पाहिजे. सकाळी उत्साहाने, फ्रेश मूडमध्ये ऑफिसला जावं असे वाटलं पाहिजे.