अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे की, अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडणार आहे. यामुळे आरोग्य क्षेत्रातील अनेक लोक नाराज आहेत आणि काहींनी ट्रम्प यांच्या या निर्णयावर टीका केली आहे.
WHO काय काम करते?
WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना ही संयुक्त राष्ट्र संघाची एक संस्था आहे. जगातल्या सगळ्या लोकांना आरोग्य सेवा पुरवणं, आरोग्यविषयक अडचणीच्या काळात मदत करणं यासाठी ही संस्था काम करते.
ही संस्था संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य रोगांवर लक्ष ठेवते आणि त्यांच्याशी लढण्यास मदत करते. संसर्गजन्य रोग हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात, यासाठी जागतिक स्तरावर एकत्र काम करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण संसर्गजन्य रोग एका देशातून दुसऱ्या देशात लवकर पसरू शकतात.
WHO ने देवी (smallpox) हा रोग जगातून नष्ट करण्यात खूप मोठी मदत केली आहे. यासाठी त्यांनी जगातील सर्व देशांना एकत्र आणून काम केले. पोलिओ आणि एचआयव्ही (HIV) या रोगांवर नियंत्रण मिळवण्यातही WHO ने खूप महत्त्वाचे काम केले आहे.
ट्रम्प यांची WHO वर टीका
डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर अनेकवेळा टीका केली आहे. कोरोनाच्या जागतिक महामारीच्या वेळी, WHO ने चीनला साथ दिली, असा त्यांचा आरोप होता. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेला जागतिक आरोग्य संघटनेपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांचे उत्तराधिकारी जो बायडेन यांनी ही योजना थांबवली. अमेरिकेला असे वाटते की ते जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) जास्त पैसे देतात. चीनच्या तुलनेत अमेरिकेचा वाटा खूप जास्त आहे.
आता पुढे काय?
अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला, तरी या प्रक्रियेस एक वर्ष लागू शकते. यासाठी अमेरिकन काँग्रेसची मंजुरी देखील आवश्यक आहे. हे सगळं कसं होईल, हे अजून स्पष्ट नाही. पण असं दिसतंय की WHO ला अमेरिकेची आर्थिक मदत मिळणार नाही.
अमेरिकेचा निर्णय WHO च्या ‘पॅन्डेमिक एग्रीमेंट’ साठी देखील मोठा धक्का ठरू शकतो. कारण, 2024 मध्ये सदस्य देशांमध्ये अंतिम मसुद्याविषयी सहमती होऊ शकली नव्हती आणि यामुळे हा करार अपयशी ठरला होता.
WHO मधून अमेरिका बाहेर पडल्यास इतर शक्तिशाली सदस्य राष्ट्रांना अधिक प्रभावशाली होण्याची संधी मिळेल. पण, अमेरिका बाहेर पडल्याने WHO ला मिळणारा निधी मात्र कमी होईल.
WHO च्या कामावर टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इतर अनेक लोक देखील जागतिक आरोग्य संघटनेच्या कामावर नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की COVID-19 आणि इतर संसर्गजन्य रोगांवर WHO ने योग्यप्रकारे काम केलं नाही.
2020 मध्ये चीनमधील वुहान शहरातून ‘Mystery Pneumonia’ या संसर्गजन्य रोगाला सुरवात झाली त्यावेळी जानेवारीच्या सुरुवातीला WHO ने चीन सरकारला साथ दिली आणि सांगितलं की हा रोग एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत पसरत नाही. पण खरं तर हा रोग अनेक महिन्यांपासून पसरत होता आणि ही खूप मोठी चूक होती.
WHO ने COVID-19 ला जागतिक महामारी म्हणून जाहीर करण्यास उशीर केला. COVID हवेतून पसरत नाही असं सांगितलं, यामुळे देखील त्यांच्यावर टीका करण्यात आली. तसंच COVID च्या उत्पत्तीच्या चौकशीत WHO ने निष्पक्ष काम केलं नाही, त्यांच्या टीममध्ये काही लोकांचे हितसंबंध होते, असा आरोपही त्यांच्यावर आहे.
WHO ने दहा वर्षांपूर्वी पश्चिम आफ्रिकेत इबोलाच्या साथीच्या काळातही योग्य काम केलं नाही, अशी टीका झाली होती. त्यानंतर WHO मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या, पण त्या पुरेशा नव्हत्या, असं म्हटलं जातं.
WHO मध्ये बदलांची गरज
अमेरिकेतील मोठे आरोग्यतज्ज्ञ आशिष झा यांनी जागतिक आरोग्य संघटनेत (WHO) सुधारणा करण्याची मागणी केली आहे. झा हे ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये सार्वजनिक आरोग्याचे डीन आहेत आणि त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये कोविड काळात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या मते WHO चा नेमका उद्देश काय आहे हे स्पष्ट नाही, त्यांचे कामकाज व्यवस्थित नाही आणि बऱ्याचदा सदस्य देशांच्या राजकीय गोष्टींना जास्त महत्त्व दिले जाते. यावर त्यांनी काही उपायही सुचवले आहेत.
आशिष झा यांच्या मते, जर WHO मध्ये सुधारणा झाली नाही, तर अमेरिका बाहेर पडल्यावर इतर देशही तसेच करू शकतात. कारण त्यांच्या देशातील लोकांच्या गरजांवर जास्त खर्च करण्याचा दबाव या देशांवर येऊ शकतो. त्यामुळे, खरंतर अमेरिकेने WHO मधून बाहेर पडण्याऐवजी सदस्य राहून अशा सुधारणा घडवून आणाव्यात, असे त्यांचे म्हणणे आहे.