झारखंडमध्ये 2024 च्या विधानसभा निवडणुका या दोन टप्प्यात होणार आहेत. झारखंड राज्यातील एकूण 81 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 13 नोव्हेंबरला 15 जिल्ह्यांमधील 43 मतदारसंघांत मतदान होईल, तर दुसऱ्या टप्प्यात 20 नोव्हेंबरला उर्वरित 38 मतदारसंघांसाठी मतदान होईल.
झारखंडमधील निवडणूक प्रचार हा सोमवारी संपला. या निवडणुकीमध्ये ‘इंडिया’ आणि ‘रालोआ’ या दोन प्रमुख आघाड्यांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. प्रचारादरम्यान भाजपने झारखंड सरकारवर अनेक आरोप केले, तर काँग्रेसनेही त्याला प्रत्युत्तर दिले.
उमेदवारांची फेरी
पहिल्या टप्प्यात 43 जागांसाठी एकूण 683 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन, आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता, राज्यसभा खासदार महुआ माझी, माजी मुख्यमंत्री मधू कोडांचे पत्नी, तसेच माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या सूनबाई पूर्णिमा दास यांसारखे मोठे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
एनडीए कडून महिलांसाठी 2100 रुपये देण्याचे आश्वासन
भाजपने महिलांसाठी दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर, सोरेन सरकार,बांगलादेशी घुसखोरी, भ्रष्टाचार, खाण घोटाळे या मुद्द्यांवर देखील हल्ला केला आहे.
इंडिया आघाडीकडून महिलांसाठी 2500 रुपये देण्याचे आश्वासन
झामुमोचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांची पत्नी कल्पना सोरेन यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडी प्रचार करत आहे. हेमंत सोरेन यांनी आदिवासींचे अस्तित्व,अस्मिता आणि संस्कृतीचे रक्षण तसेच महिलांसाठी “मैया योजना” अंतर्गत दरमहा 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिलं आहे.
या निवडणुकीत प्रत्येक मतदार संघाला महत्त्व आहे आणि दिग्गज नेते निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे काही ठराविक जागांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे.