‘द अकॅडमी म्युझियम’ नुसार भारताचे 12 सर्वोत्तम सिनेमे

'द अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स' ही लॉसएंजेलिस स्थित संस्था जगभरातील सिनेमाचा इतिहास आणि सिनेमामुळे समाज मनावर होणारा परिणाम यावर अभ्यास करत असते. 2021 मध्ये सुरू झालेल्या संस्थेने भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजवर निर्मिती झालेल्या 12 सिनेमांची यादी नुकतीच प्रकाशित केली आणि त्यांचं प्रदर्शन 'द अकॅडमी' मध्ये आयोजित केलं होतं. कोणते आहेत हे 12 भारतीय चित्रपट ? आणि त्यांची काय वैशिष्ट्य आहेत ? जाणून घेऊयात.
[gspeech type=button]

भारतीय सिनेमाने मागच्या शतकात केलेल्या तांत्रिक आणि व्यवसायिक प्रगतीचं सर्वांनाच कौतुक आहे. ‘राजा हरिश्चंद्र’, ‘आलम आरा’ पासून सुरू झालेला हा प्रवास ‘छावा’ पर्यंत येऊन पोहोचला आणि त्या दरम्यान आपल्या लाडक्या सिनेमाने बरेच मैलाचे दगड पार केले. मागच्या शंभर वर्षांत कधी जागतिक मंदी सारखं संकट आलं तर कधी कोरोना सारखी वैश्विक महामारी आली. सिनेमा पुढे सुरू राहील की नाही अशा शंका निर्माण झाल्या. पण, या शंकांना पुरून उरून ‘मनोरंजन’ उद्योगाने आपलं अस्तित्व निर्माण केलं आणि  टिकवून ठेवलं. भारतीय सिनेमाची ही झेप इतकी उतुंग होती की, जगप्रसिद्ध हॉलीवूड इंडस्ट्रीने, तिथल्या निर्मात्यांनी, चित्रपट अभ्यासकांना भारतीय सिनेमातील अवीट कलाकृतींची दखल घ्यावी लागली. 

‘द अकॅडमी म्युझियम ऑफ मोशन पिक्चर्स’ ही लॉसएंजेलिस स्थित संस्था जगभरातील सिनेमाचा इतिहास आणि सिनेमामुळे समाज मनावर  होणारा परिणाम यावर अभ्यास करत असते. 2021 मध्ये सुरू झालेल्या संस्थेने भारतीय सिनेमाच्या इतिहासात आजवर निर्मिती झालेल्या 12 सिनेमांची यादी नुकतीच प्रकाशित केली आणि त्यांचं प्रदर्शन ‘द अकॅडमी’ मध्ये आयोजित केलं होतं. कोणते आहेत हे 12 भारतीय चित्रपट ? आणि त्यांची काय वैशिष्ट्य आहेत ? जाणून घेऊयात. 

  1. मदर इंडिया: (ओटीटी: प्राईम)

1957 मध्ये प्रदर्शित झालेला, मेहबूब खान यांचं दिगदर्शन असलेला आणि नर्गिस, सुनील दत्त यांच्या सुरेख अभिनयाने नटलेला हा सिनेमा निश्चितच भारताच्या ‘आयकॉनिक’ किंवा अद्वितीय सिनेमांपैकी एक आहे. या सिनेमाची नायिका ही आपल्या नवऱ्याच्या माघारी दोन मुलांचा सांभाळ करते आणि त्या प्रवासात तिला समाजाकडून, सुखी लाला या सावकाराकडून प्रचंड त्रासाचा सामना करावा लागतो. ‘मदर इंडिया’ मधील आई ही मूल्य जपणाऱ्या, कष्ट करण्यासाठी कायम तत्पर असलेल्या भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी आहे. हा सिनेमा त्या वर्षीचा सर्वाधिक निर्मिती खर्च झालेला आणि बॉक्सऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा देखील सिनेमा होता. 

  1. मंथन: (झी 5)

1976 मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा भारताच्या ‘दूध क्रांती’ पासून प्रेरित झालेला आहे. श्याम बेनेगल यांचं दिगदर्शन असलेल्या या सिनेमाची कथा ही ‘अमूल’ कंपनीचे सर्वेसर्वा दस्तरखुद्द ‘वर्गिस कुरियन’ यांनी लिहिली होती आणि पटकथा ही विजय तेंडुलकर यांनी लिहिली होती. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील हा पहिला आणि बहुधा एकमेव असा सिनेमा असावा जो केवळ प्रेक्षकांच्या पैशांवर तयार झाला होता. गुजरातमधील 5 लाख शेतकऱ्यांनी त्या काळात या सिनेमासाठी प्रत्येकी 2 रुपये दिले होते आणि ते सर्वच ‘गुजरात सहकारी दुग्ध वितरण संस्था’च्या रूपाने या सिनेमाचे निर्माते होते. गिरीश कर्नाड, स्मिता पाटील आणि नसिरुद्दीन शाह यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाने त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि पटकथा हे दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. 

 

  1. अमर अकबर अँथनी: (प्राईम)

1977 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमात विनोद खन्ना, ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी अनुक्रमे शीर्षक भूमिका साकारल्या आहेत. मनमोहन देसाई यांचं दिगदर्शन असलेल्या या सिनेमात भारतातील तिन्ही प्रमुख धर्मांचे नायक प्रेक्षकांना बघायला मिळाले आणि मोठ्या प्रमाणावर हा सिनेमा प्रेक्षकांना कनेक्ट झाला. “अनहोनी को होनी करदे, होनी को अनहोनी…” आणि “माय नेम इज् अँथनी गोसाल्वीस” ही दोन्ही गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आणि सिनेमा घराघरात पोहोचला. 

 

  1. इशानोऊ: (युट्युब)

1990 मध्ये दूरदर्शन केंद्र गुवाहाटीने प्रदर्शित केलेल्या मणिपुरी भाषेतील या सिनेमाचे अरीबम श्याम शर्मा हे दिगदर्शक होते. 90 मिनिटांच्या या सिनेमात प्रेम, दुःख, जगण्याचं तत्वज्ञान हे या सिनेमातून प्रेक्षकांना बघायला मिळतं. मणिपूरमध्ये एका साध्या कुटुंबात राहणारी ‘तंफा’ ही अचानक निर्जीव वस्तूंसोबत बोलायला लागते. हा कोणता आजार नसून हे आपल्या आसपास असलेल्या वस्तुंना समान दृष्टीने बघणं आहे हे हा सिनेमा सांगतो. 2023 मध्ये झालेल्या ‘कान्स फेस्टिव्हल’ मध्ये या इशानोऊ ( निवडक)ला ‘वर्ल्ड क्लासिक’ म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 

 

  1. कुमाट्टी: (युट्युब)

कुमाट्टी हा 1979 मध्ये निर्मिती झालेला एक मल्याळम  सिनेमा आहे. जी. अरविंदम यांची कथा आणि दिगदर्शन असलेला हा सिनेमा एका छोट्या गावातील जादूगाराच्या आयुष्यावर भाष्य करतो. या जादूगाराला सिनेमाच्या सुरुवातीला विरोध केला जातो. पण, नंतर तो लहान मुलांचा मित्र होतो आणि त्यांना वेगवेगळे जादूचे प्रयोग करायला शिकवतो. मलबारी लोकांचं साधं जगणं, निसर्गावर प्रेम करणं हे या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे. 

 

  1. मिर्च मसाला: (प्राईम, जियो हॉटस्टार)

1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचं केतन मेहता यांनी दिगदर्शन केलं होतं. नसिरुद्दीन शाह आणि स्मिता पाटील यांचा सुरेख अभिनय असलेल्या या सिनेमाचा फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या ‘भारतीय सिनेमाच्या 25 सर्वोत्कृष्ट अभिनय’ असलेल्या सिनेमांमध्ये समावेश आहे. मिरचीद्वारे तिखट तयार करणाऱ्या फॅक्टरी मध्ये काम करणाऱ्या काही महिलांकडून एक स्थानिक सावकार कर वसूल करत असतो आणि त्यांना समाजात अस्पृश्य लोकांप्रमाणे वागवत असतो. स्मिता पाटील यांनी साकारलेलं सोनबाई हे पात्र या अनुचित घटनांविरुद्ध लढा देते आणि महिलांना कर्जमुक्ती आणि समाजात समान दर्जा मिळवून देते. 

 

 

  1. देवदास : (प्राईम)

दिलीप कुमार यांनी अजरामर करून ठेवलेल्या ‘देवदास’ या पात्राला संजय लीला भन्साळी यांनी 2002 मध्ये शाहरुख खानच्या रूपाने पुनर्जन्म द्यायचं ठरवलं आणि या कलाकृतीचा जन्म झाला. भव्य सेट्स, काचेचा महाल आणि तगडी स्टारकास्ट घेऊन दिगदर्शकाने हा सिनेमा प्रेक्षकांसमोर आणण्याचं स्वप्न बघितलं आणि ते प्रत्यक्षात उतरवलं. तीच विरह कथा थोडे फार बदल करून वेगळ्या पद्धतीने कशी सादर केली जाऊ शकते आणि ती पुन्हा एकदा लोकप्रिय होऊ शकते हे 21 व्या शतकातील या सिनेमाने सिद्ध केलं होतं.

 

  1. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे: (प्राईम)

भारतीय सिनेमाच्या इतिहासात सर्वाधिक कालावधीसाठी थिएटरमध्ये चालणारा हा सिनेमा या यादीत असणं हे सहाजिकच होतं. लंडन मध्ये रहाणारा एक भारतीय मुलगा युरोप फिरायला आलेल्या एका मुलीच्या प्रेमात पडतो; तिचं प्रेम मिळवण्यासाठी भारतात येतो, तिच्या घरातील सर्वांची मनं जिंकतो आणि आपल्या प्रेमिकेला आपल्या सोबत घेऊन जातो.  ‘डीडीएलजे’ हा फक्त एक सिनेमा नव्हता, तर ती येत्या काळात येऊ पहाणाऱ्या एका होणाऱ्या ट्रेंडची नांदी होती. या सिनेमाने बॉलीवूडसाठी एनआरआय प्रेक्षकांचं एक मार्केट खुलं करून दिलं. यश चोप्रा यांचे सुपुत्र आदित्य चोप्रा यांचा दिगदर्शक म्हणून हा पहिला सिनेमा होता. शाहरुख खान हे सध्याचं बडं प्रस्थ या सिनेमानंतरच नावारूपास आलं. 

हेही वाचा – ओटीटीच्या गर्दीतही नाटक, रंगभूमीची दमदार वाटचाल

  1. जोधा अकबर: (नेटफ्लिक्स)

अकबर या मुघल साम्राज्यातील राजाची सुद्धा एक हळवी प्रेमकथा असू शकते आणि प्रेक्षकांना ती आवडू शकते हे दिगदर्शक आशुतोष गोवारीकर यांना वाटणं हेच एका बऱ्याच मोठ्या भारतीय प्रेक्षक वर्गासाठी आश्चर्याचं होतं. आजच्या काळात जर हा सिनेमा प्रदर्शित होणार असता तर कदाचित त्याला काही संघटनांनी थिएटरपर्यंत देखील पोहोचू दिलं नसतं. ह्रितिक रोशनने या सिनेमामध्ये अकबरची भूमिका खूप संयतपणे सादर केली, ऐश्वर्या रॉयने ‘जोधा’चं पात्र  साकारतांना सुंदर दिसण्यासोबतच पात्राला आवश्यक तो करारीपणा सुद्धा दाखवला. 

 

  1. कांचनजंगा: (युट्युब)

1962 मध्ये या प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे सत्यजित रे हे दिगदर्शक होते. या सिनेमामध्ये कोलकत्ता मध्ये राहणारं एक कुटुंब दार्जिलिंगला फिरायला येतं आणि नायिका हिमालयाचा दुसरा उंच भाग असलेल्या ‘कांचनजंगा’ येथे जाण्याची इच्छा व्यक्त करते. व्यवसायिक असलेल्या नायिकेच्या वडिलांना (इंद्रनाथ) तिथे जाण्याची इच्छा नसते. स्वतःच्या अति प्रेमात असलेले इंद्रनाथ हे कांचनजंगाचं कौतुक करायचं देखील विसरतात ही विसंगती दिगदर्शकाने योग्यपणे दाखवली आहे. 

 

  1. माया दर्पण: (युट्युब)

1972 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचे कुमार सहानी हे दिगदर्शक होते. आसाम मध्ये स्थित असलेली या सिनेमाची कथा एका तरुणीची आहे जिला प्रेम आणि वडिलांची समाजातील प्रतिमा यापैकी एकाची निवड करावी लागते. प्रेक्षकांनी सुरुवातीला नाकारलेला हा सिनेमा ‘समांतर’ सिनेमा प्रकाराची लाट आल्यानंतर पुन्हा चर्चेत आला आणि नावाजला गेला. 

हेही पाहा – कोरियन सिरीज, सिनेमा इतके लोकप्रिय का होत आहेत ?

  1. इरुवर: (प्राईम)

1997 मध्ये तामिळ भाषेत प्रदर्शित झालेला हा सिनेमा   मनिरत्नम यांनी दिगदर्शित केला होता. 1994 ची मिस वर्ल्ड ऐश्वर्या रॉयचा हा पहिला सिनेमा होता ज्यामध्ये तिचा डबल रोल होता. राजकीय विषयावर बेतलेला हा सिनेमा तामिळ नेते एम.करुणानिधी आणि जयललिता यांच्यातील संघर्षावर भाष्य करतो. मोहनलाल, प्रकाशराज, रेवती, तब्बू यांच्या देखील महत्वाच्या भूमिका असलेल्या या सिनेमाने दोन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि ब्रिटिश चित्रपट संस्था यांनी देखील इरुवरचं कौतुक केलं होतं. दिगदर्शक मनीरत्नम हे स्वतः देखील इरुवर ही आपली सर्वात चांगली कलाकृती असल्याचं मान्य करतात. 

 

‘फिल्म हेरिटेज फौंडेशन’चे संचालक आणि ‘मुंबई अकॅडमी ऑफ मुविंग इमेज’चे सदस्य शिवेंद्र सिंग डुंगरपूर यांनी या सिनेमांची निवड करण्यासाठी ‘द अकॅडमी’ला सहकार्य केलं होतं. आयोजकांच्या मते, हे 12 चित्रपट हे विविध प्रकारे सादर करण्यात आले असून त्याद्वारे भारतीय मनाच्या कालानुरूप व्यक्त झालेल्या प्रादेशिक, भाषानुरूप भावना या व्यवस्थितपणे व्यक्त झाल्या आहेत. येत्या काळात अजून भारतीय सिनेमा या ‘द अकॅडमी’ मध्ये प्रदर्शित व्हाव्यात अशी या निमित्ताने इच्छा व्यक्त करूयात. या यादीत आणखी कोणते सिनेमे असावेत असं तुम्हांला वाटतं हे मला ईमेलवर नक्की कळवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

sports nutrition : पूर्वीच्या काळी सर्वांच्या घरी महागडं कोचिंग, ब्रँडेड बूट्स, बॅट्स किंवा जिमसारखी उपकरणं उपलब्ध नव्हती पण तरीही मेहनत
वि का राजवाड्यांच्या मते तत्पूर्वी इसवी सन 1659 मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळेसच कठिण प्रसंग टाळण्यासाठी मूर्ती माढे येते हलविली होती.
Andropause : एंड्रोपॉज हा शब्द पुरुषांमधील वयानुसार येणाऱ्या हार्मोनल बदलांसाठी वापरला जातो. वयोमानानुसार किंवा काही आजारांमध्ये टेस्टोस्टेरॉन (Testosterone) या पुरुष

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ