जगात उत्पादन केल्या जाणाऱ्या विविध कृषी पिकांना त्यांच्या निरोगी वाढीसाठी कित्येक रोगजंतू, तणे, कीटक आणि कृमी यांच्याशी स्पर्धा करावी लागते. यामध्ये जागतिक पातळीवर साधारणपणे 80 हजार रोगजंतू, 30 हजार तण प्रजाती, 10 हजार कीटक प्रजाती आणि 3 हजार प्रकारचे कृमी यांचा समावेश होतो. या सगळ्या घटकांमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. यापैकी केवळ कीटकांमुळे एका वर्षात अन्नधान्याचे जेवढं नुकसान होते, तेवढं अन्नधान्य सुमारे आफ्रिका खंडातील संपूर्ण लोकसंख्येच्या अर्ध्या लोकसंख्येला पुरेल इतकं असते, असा अंदाज आहे.
साहजिकच, जगातील लोकसंख्येला पुरेल इतके अन्नधान्य उत्पादन करायचे असेल तर, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या या कीटक आणि अन्य जैविक घटकांना नियंत्रित करणं आवश्यक आहे. यासाठी अनेक प्रकारचे उपाय आणि पद्धती उपलब्ध आहेत. त्यापैकी सर्वात मोठ्या प्रमाणावर आणि संघटित प्रकारे केला जाणारा उपाय म्हणजे विविध प्रकारची कृषी रसायने वापरुन पिकांवरील रोग आणि किडी नियंत्रित करणे. यासाठी जे उद्योग कार्यरत असतात ते म्हणजेच कृषी रसायन उद्योग होत.
कीड (Pest) म्हणजे काय?
सर्वसामान्य भाषेत कीटक (Insect) आणि कीड (Pest) यामध्ये फारसा फरक केला जात नसला तरी, शास्त्रीय आणि तांत्रिक परिभाषेत मात्र या दोघांमध्ये फरक आहे. कीड (Pest) म्हणजे मानवांना किंवा मानवी हितांना हानिकारक असा कोणताही प्राणी किंवा वनस्पती. हा शब्द विशेषतः अशा प्राण्यांसाठी वापरला जातो जे पिके, पशुधन आणि वनसंपत्तीचे नुकसान करतात किंवा लोकांना, विशेषतः त्यांच्या शेतात किंवा घरातही त्रासदायक ठरतात.
किडींमुळे होणाऱ्या नुकसानीचं प्रमाण
नियोजन आयोगाच्या (Planning Commission) वनस्पती संरक्षण (Plant Protection) उपसमितीने काही वर्षांपूर्वी केलेल्या एका अभ्यासानुसार, पिकांच्या एकूण नुकसानीपैकी सर्वाधिक प्रमाणात म्हणजे 33 टक्के नुकसान तणांमुळे होते, रोग आणि किडींमुळे प्रत्येकी 26 टक्के (एकूण 52 टक्के), तर उर्वरित 15 टक्के नुकसान उंदीर आणि तत्सम प्राण्यांमुळे होते. या सर्वांमुळे होणारं एकत्रित नुकसान हे पिकांच्या एकूण अपेक्षित उत्पादनाच्या सरासरी 18 टक्के असते. विविध पिकांमध्ये हे प्रमाण वेगवेगळं असू शकते. भारतात या सर्व प्रकारचं होणारं एकूण नुकसान दरवर्षी सुमारे 90 हजार कोटी रुपये इतकं असते, असा अंदाज आहे. यापैकी एक तृतीयांश म्हणजे सुमारे 30 हजार कोटी रुपयांचं नुकसान मुख्य अन्नधान्य पिकांचे, तर दुसरे एक तृतीयांश (30 हजार कोटी रुपये) नुकसान फळे, भाजीपाला, फुलशेती आणि अन्य पिकांचं, आणि उर्वरित एक तृतीयांश (30 हजार कोटी रुपये) नुकसान हे विविध पिकांमध्ये काढणीनंतर साठवणूक करताना होते.
आपण खत उद्योगांविषयी माहिती घेताना हे जाणून घेतलं की, संपूर्ण देशात पुरेसे अन्नधान्य पिकविण्यासाठी शेतकऱ्यांना माफक दरात रासायनिक खते पुरवता यावीत यासाठी सरकार खत उत्पादकांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देत असते. त्या अनुदानाची वार्षिक रक्कम गेल्या अनेक दशकांमध्ये वाढत गेलेली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी खत अनुदानाची अंदाजित रक्कम 1 लाख 84 हजार 704 कोटी रुपये इतकी होती. अर्थ मंत्रालयाने ती कमी करून 1 लाख 71 हजार 082 कोटी रुपये केली आहे. आता या पार्श्वभूमीवर, पिकांचं होणारं नुकसान आणि त्याची अंदाजित रक्कम यांची तुलना केल्यावर लक्षात येईल की, भारतात किडी आणि रोगांमुळे होणारं वार्षिक 90 हजार कोटी रुपये नुकसान हे किती मोठं नुकसान आहे. हे नुकसान टाळायचे किंवा कमी करायचं असेल, तर त्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करणं आवश्यक आहे.
हेही वाचा: खतांची जाहिरात व विक्री
एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM – Integrated Pest Management)
एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे उपलब्ध असलेल्या विविध कीड नियंत्रण तंत्रांचा काळजीपूर्वक विचार करून त्यामधील योग्य उपाययोजनांचे एकत्रीकरण करणं, जेणेकरून कीटकांची संख्या प्रतिबंधित करता येईल, तसच त्यासाठी वापरली जाणारी कीटकनाशके आणि इतर साधने वापरण्याचा खर्च आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या पातळीवर ठेवता येईल, आणि मानवी आरोग्य व पर्यावरणाला होणारे धोके कमीतकमी पातळीवर ठेवता येतील. म्हणजेच, एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्र नैसर्गिक कृषी-परिसंस्थांना (Agro-ecosystems) होणारी हानी कमीत कमी ठेवून पिकांच्या निरोगी वाढीवर भर देते आणि नैसर्गिक कीड नियंत्रण यंत्रणेला प्रोत्साहन देते. यामध्ये उल्लेख केलेल्या कीड नियंत्रण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पद्धती आणि त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या विविध तंत्र किंवा उपाययोजनांची काही ठळक उदाहरणं पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्येक पद्धतीचे फायदे आणि मर्यादा वेगवेगळ्या आहेत.
भौतिक पद्धत (Physical method): कीड पिकांपर्यंत पोहोचू नये यासाठी प्रतिबंधक जाळी (insect net) वापरायची. पिकाच्या सभोवतालचे तापमान नियंत्रित करायचं.
पीक मशागत पद्धत (Cultural method): पीक काढणी झाल्यावर शेतात उरलेले पिकांचे अवशेष काढून नष्ट करायचं, पिकांची लागवड करण्यासाठी योग्य हंगामची निवड करायची.
यांत्रिक पद्धत (Mechanical method): कीड पकडण्यासाठी सापळे वापरायचे.
जैविक पद्धत (Biological method): परभक्षक कीटक किंवा कीटकांमध्ये रोग निर्माण करणारे विषाणू किंवा बुरशी यांचा वापर करायचा.
रासायनिक पद्धत (Chemical method): पिकांच्या वाढीची अवस्था आणि किडींच्या संख्येला अनुसरून योग्य प्रकारची कीटकनाशके वापरायचे.
कायदेशीर पद्धत (Legal method): रोग आणि किडीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणापासून पिकांचे बियाणे किंवा जिवंत वनस्पती यांची ने-आण करण्यास कायदेशीर प्रतिबंध करणं, प्रादुर्भाव झालेल्या जिवंत वनस्पतींचे विलगन करणे (quarantine), त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिबंध करण्याची व्यवस्था उभारण्याची पद्धत अंमलात आणणं हे कृषी विभाग व संबंधित सरकारी विभाग यांच्यामार्फतच शक्य असते.
यावरून असे लक्षात येईल की, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना उपलब्ध असेलली संसाधने, पिकांच्या वाढीची अवस्था, किडीचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे ती किडीच्या संख्येची पातळी, ती पातळी आर्थिक नुकसानीच्या पातळीवर (ETL – Economic Threshold Level) पोहोचली आहे की नाही, कोणता हंगाम चालू आहे, कीड नियंत्रणाचा खर्च किती होणार आहे, तो खर्च केल्यास पिकांचे जेवढे नुकसान टाळता येणार आहे त्याची अंदाजित किंमत किती असेल, अशा विविध गोष्टींचा एकात्मिक पद्धतीने विचार केला, तरच कीड नियंत्रण एकात्मिक पद्धतीने करता येते.
वर उल्लेख केलेल्या विविध पद्धतींपैकी रासायनिक पद्धत ही दिसायला सरळ सोपी वाटते कारण त्यात तयार उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांचा थेट वापर करायचा असतो. तुलनेने इतर पद्धतींमध्ये मात्र कृषी-परिसंस्थांमधील अनेक घटकांचा सखोल अभ्यास करणं, त्यासाठी सतत निरीक्षणे करणं आवश्यक असतं. पण हे पूर्णपणे खरं नाही. कारण कीटकनाशके वापरण्याअगोदरही त्यांचे शेतातील कृषी-परिसंस्थांवर होणारे संभाव्य परिणाम विचारात घेणं अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे रासायनिक कीटकनाशके वापरताना शास्त्रीय दृष्टिकोन ठेवून आणि पर्यावरणाचा विचार करूनच योग्य प्रकारे त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. हे भान एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमुळे मिळते. रासायनिक कीटकनाशके शास्त्रीय व सुरक्षित प्रकारे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळणं सुद्धा आवश्यक आहे.
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीमधील अन्य पद्धतींच्या तुलनेत रासायनिक कीटकनाशके हा घटक गेल्या अनेक दशकांत एका मोठ्या व्यावसायिक उद्योगाच्या स्वरूपात विकसित झाला आहे. त्यामध्ये काम करण्यासाठी विविध प्रकारचे तांत्रिक ज्ञान आणि कौशल्ये आवश्यक असतात. या उद्योगात व्यावसायिक करियरच्या अनेक संधी युवकांना उपलब्ध आहेत. पुढील लेखांमध्ये आपण या उद्योगाची अधिक माहिती घेणार आहोत.