अशोक जोशी – पुण्यतिथी साजरी केली जाते असा गँगस्टर

Don Ashok Joshi : 1980च्या दशकात मुंबईत सगळ्यात जास्त गुंड असलेली टोळी म्हणून अशोक जोशीची टोळी ओळखली जायची. त्याच्या टोळीत हजार पेक्षा जास्त गुंड होते. माया डोळस आणि दिलीप बुवा हे त्याच्या टोळीत होते.
[gspeech type=button]

अशोक जोशी, कांजुरचा मराठी डॉन! लोकांच्या अडीअडचणीत धावून जाणारा, त्यांच्या मनात घर करणारा एक गँगस्टर. एक असा गुंड ज्याच्या मृत्यूनंतर कांजुरगावावर शोककळा पसरली. असं म्हणतात की, त्याला श्रद्धांजली म्हणून कांजुर गावात त्याच्या नावाने अशोक नगर नावाचं एक नगर उभं केलं.

अजुनही अशोक नगरमध्ये दरवर्षी 4 डिसेंबरला त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. रॉबीन हूडनंतर कदाचित अशोक जोशीचचं नाव अशाप्रकारे घेतलं जात असेल .

मुंबईतून तडीपार

अशोक जोशी हा मुंबईच्या कर्नाक बंदर परिसरात रहायचा. कर्नाक बंदर, भायखळा, मस्जिद बंदर या भागात तो छोटी टोळी चालवायचा. छोटी मोठी स्मगलिंग, सुपारी घेणं किंवा खंडणी गोळा करणं अशी कामं त्याच्या गँगमार्फेत केली जायची.

वरदराजन गँगचा तो प्रतिस्पर्धी होता. 1970च्या दशकाच्या शेवटी मुंबई पोलिसांनी मुंबईतल्या गुन्हेगारांच्या विरोधात जोरदार मोहीम सुरु केली होती. यात अनेक गुंडांना मुंबईतून तडीपार करण्यात आलं होतं. अशोक जोशीलाही मुंबईतून तडीपार करण्यात आलं. त्याला विक्रोळीच्या पुढे यायला परवानगी नव्हती. त्यामुळे त्यानं कांजुरगावातल्या हनुमान गल्लीतच आपलं कायमस्वरूपी बस्तान बसवलं.

अशोक जोशी ते अशोक भाऊ पर्यंतचा प्रवास

कांजुरमध्ये आल्यानंतर इथल्या स्थानिक गुंडांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. कारण तिथले छोटे मोठे गुंडं हे वरदराजनसाठी काम करत होते. कांजुरमधल्या या गुंडांना स्थानिक नागरीक कंटाळले होते. तिथल्या मुलींची छेड काढणं, वृद्धांना त्रास देणं, कुणालाही शिवीगाळ करणं असे प्रकार तिथं सर्रास चालायचं. तिथल्या सामान्य नागरिकांमध्ये या गुंडामुळे दहशतीचं वातावरण होतं.

अशोक जोशीनं याचाच फायदा घेतला. आणि तिथल्या सर्वसामान्य लोकांसाठी तो या गुंडांच्या विरोधात उभा राहिला. हळूहळू लोकांच्या मनात त्याने जागा निर्माण केली. त्याला लोक अशोक भाऊ म्हणू लागले. हळूहळू कांजूर आणि आजुबाजूच्या परिसरात त्याचा दबदबा वाढला. त्यानं परिसरातल्या छोट्या मोठ्या गुन्हेगारी कारवाया संपुष्टात आणल्या आणि सामान्य नागरीकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करुन दिलं.

सर्वात जास्त गुंड असलेली टोळी

1980च्या दशकात मुंबईत सगळ्यात जास्त गुंड असलेली टोळी म्हणून अशोक जोशीची टोळी ओळखली जायची. त्याच्या टोळीत हजार पेक्षा जास्त गुंड होते. माया डोळस आणि दिलीप बुवा हे त्याच्या टोळीत होते. काही वेळेला मुंबईत अरुण गवळी याला मदत हवी असेल तर तो त्याच्या टोळीतल्या माणसांना पाठवायचा.

राजकीय वरदहस्त

मुलुंड, भांडुप, कांजुर परिसरात तेव्हा दिना बामा पाटील यांचा चांगलाच राजकीय दरारा होता. 1985 मध्ये ते मुलूंडमधून कॉंग्रेसचे आमदार झाले. त्यांचे आणि अशोक जोशीचे चांगले मैत्रिपूर्ण संबंध होते.

जीवघेणा हल्ला

1985 च्या आसपास एका खुनाच्या प्रकरणात अशोक जोशीला पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागत होती. अशोक जोशी त्याच्या मारुती 800 मधून काही साथिदारांसोबत पोलिस स्टेशनला हजेरी लावून परत जात होता. तेवढ्यात कांजूर गावातल्या कॉंग्रेस ऑफिसजवळ चार हल्लेखोरांनी बाईकवरून येत जोशीच्या गाडीवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी जोशी याचा चालक रवी म्हात्रे आणि रमा नगवे या साथिदाराने मोठ्या शिताफीने जोशीचा जीव वाचवला. मात्र, यामध्ये रमा नगवे याचा मृत्यू झाला.

सतिश राजेचा खून

दाऊदला अख्या मुंबईवर राज्य करायचं होतं. त्यासाठी त्याने मुंबईतल्या इतर गुंडांना, गँगस्टर्सना संपवायला सुरुवात केली होती. त्यानं BRA गँगमधल्या बाबू रेशिम आणि रमा नाईक दोघांनाही संपवलं होतं. आता पुढचा नंबर अरुण गवळीचा अशी वाच्यता डी गँग आणि दाऊदचा खास सतीश राजे हा वारंवार करायचा.

अरुण गवळीला हे समजल्यावर तो घाबरुन दगडी चाळीतून कांजुरमार्गाला अशोक जोशीकडे जाऊन लपला. दाऊदनं आपल्याला संपवण्याआधी आपणच त्याला एक धक्का दिला पाहिजे. असा विचार करुन अशोक जोशी आणि अरुण गवळी यांनी मिळून 21 नोव्हेंबर 1988 ला सतिश राजेचा खून केला.

याचं सगळं प्लानिंग अशोक जोशीनं केलं होतं. सतिश राजे हा डी गँग आणि दाऊदसाठी अत्यंत महत्वाचा होता. तो डी गँगचा आर्थिक व्यवहार सांभाळायचा.

एकाच ड्रायव्हरनं दोन गुंडांचा केला घात

सतिश राजेला मारणं तसं सोपं नव्हतं, यासाठी अशोक जोशीनं त्याचा ड्रायव्हर शामसुंदर नायरला त्याच्या बाजुनं वळवलं. शामसुंदर नायर हा मुंबईत अशा पद्धतीनं गाडी चालवायचा की, त्याच्या गाडीला एकाही सिग्नलवर थांबावं लागायचं नाही. पण अशोक जोशीच्या सांगण्यावरुन त्यानं एकदा पाखमोडीया स्ट्रीटवर जाताना भायखळा नागपाडा सिग्नलवर गाडी थांबवली. आणि त्याच संधीचा फायदा घेत अशोक जोशीच्या माणसांनी त्याला मारलं. त्यानंतर शामसुंदर नायर हा अशोक जोशीच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. आणि त्यानंतर नायरनेच अशोक जोशीचा घात केला.

अशोक जोशीची हत्या

अशोक जोशीला मारायचं तर होतं, पण त्याच्या घरात किंवा कांजुरमध्ये त्याला मारणं एवढं सोपं नाही हे छोटा राजनला चांगलंच माहीत होतं. कारण त्याच्या सोबत असलेले त्याचे साथिदार स्वत:चा जीव धोक्यात घालून अशोक जोशीला वाचवतात हा इतिहास सगळ्यांनाच माहीत होता. त्यामुळे अशोक जोशी कांजूरमधून बाहेर पडण्याची वाट पाहणं किंवा त्याला बाहेर आणणं, हाच एक मार्ग छोटा राजनला दिसत होता. त्यातही त्याला मारण्यासाठी किंवा त्याची माहिती देण्यासाठी त्याच्या जवळचा माणूस हवा होता. पण अशोक जोशीच्या आजुबाजूला सगळेच त्याच्याशी प्रामाणिक होते.

पण सतीश राजेंच्या खुनाच्या घटनेनंतर 13 दिवसातच अशोक जोशीची हत्या करण्यात यश आलं. यासाठी त्याने त्याच शामसुंदर नायर या ड्रायव्हरची मदत घेतली.

4 डिसेंबर 1988 साली अशोक जोशी पहाटेच आपल्या मारुती 800 मधून पुण्याच्या दिशेनं निघाला होता. पुण्याला जायची दोन कारणं सांगितली जातात.

तो पुण्यात अरुण गवळीला भेटायला निघाला होता हे एक कारण सांगितलं जातं. तर दुसरं त्याच्यापर्यंत अशी टीप पोहोचवलेली की, मुंबई पोलिस त्याचं एनकाऊंटर करणार आहेत. ही टीप मिळाल्यावर अशोक जोशीने क्राईम ब्रांचचे प्रमुख अरविंद इनामदार याला मला व माझ्या लोकांना शरण यायचं आहे असा उलट निरोप पाठवला. तेव्हा इनामदार यांनी जोशीला पुण्यात भेटायला बोलावलं. त्यामुळे तो 4 डिसेंबरला पहाटे पुण्याकडे निघाला होता. पण अरविंद इनामदार यांनी त्याला बोलावल्याचा कोणताच पुरावा नाहीये.

हत्येचा थरार

अशोक जोशीच्या पुणे दौऱ्याची माहिती आधीच छोटा राजनच्या माणसांना होती. त्यानुसार ते पनवेलजवळ त्याची वाट बघत उभे होते. आणि एक गाडी त्यांचा पाठलाग करत होती. जशी अशोक जोशीची मारुती 800 पनवेलजवळ आली. समोर उभ्या असलेल्या गाड्या बघून शामसुंदरनं गाडी थांबवली. आणि मारुती 800 वर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. गाडी थांबवल्या थांबवल्या शामसुंदर गाडीचं दार उघडून पळून जाऊ लागला. तोपर्यंत शामसुंदरनं दगा फटका केल्याचं अशोक जोशीच्या लक्षात आलं होतं. त्याने गाडीतून पळून जाणाऱ्या शामसुंदरवर गोळ्या झाडल्या आणि त्याला संपवलं. पण स्वत:ला मात्र तो वाचवू शकला नाही. त्याला सगळया बाजूंनी घेरलं होतं. याचवेळी एके 47 मधून होणाऱ्या गोळ्यांच्या वर्षावात त्याचा मृत्यू झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Thalassemia : थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार आहे, जो रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीवर परिणाम करतो आणि रक्ताल्पता (ॲनिमिया / anemia) निर्माण
Seedwomen Rahi Popere : “ज्यात चमक असते, त्यात धमक नसते. जुनं तेच सोनं असतं” याची प्रचिती येऊन पुढच्या पिढीला उत्तम
Fishery : मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजीच्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाच्या निर्णयाची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ