आपलं श्रीमंत साहित्य हे आजच्या सिनेमांसाठी ‘रॉ मटेरियल’चं काम करत आहे. मनोरंजन क्षेत्रातली नायक, नायिका यांची मक्तेदारी संपली आणि आता लेखकांसाठी सुवर्णकाळ आला आहे असं आपण म्हणू शकतो.
बॉलीवूडच्या काही नवोदित, प्रस्थापित कलाकारांना आपलं करिअर बहरण्यासाठी काही पुस्तकांची मदत झाली आहे. काही वेळेस हे प्रयत्न यशस्वी झाले आहेत, तर काही वेळेस हे प्रयत्न फसले देखील आहेत. ‘बुक टू रील’ या प्रयत्नावर आधारित 10 प्रमुख सिनेमे कोणते होते ? जाणून घेऊयात.
- इमर्जन्सी: (नेटफ्लिक्स)
कंगना रनौतचा नुकताच ओटीटीवर प्रदर्शित झालेला हा सिनेमा किंवा या सिनेमातील काही अंश हा कुमी कपूर यांच्या ‘द एमर्जन्सी’ या पुस्तकावर आधारित आहे. सिनेमाची निर्माती कंगना रनौत आणि कुमी कपूर यांच्यामध्ये पुस्तकातील माहिती सिनेमा मध्ये घेण्याची परवानगी घेतांना असा करार झाला होता की, कुमी कपूर किंवा त्यांच्या पुस्तकाचा सिनेमाच्या ‘क्रेडिट्स’ मध्ये कुठेही उल्लेख असू नये. पण, वाद होणार नाही तर तो कंगना रनौतचा सिनेमा कसा असेल ? नाही का ?
‘इमर्जन्सी’ सिनेमा संपतांना तो कुमी कपूर यांच्या पुस्तकावर ‘बेस्ड ऑन’असल्याचा उल्लेख आला आणि तिथून लेखिकेचा पारा चढला. त्यांनी दिल्ली हायकोर्टात या प्रकरणा विरुद्ध रीतसर तक्रार दाखल केली आणि सिनेमाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. लोकसभा खासदार कंगना रनौत यांना सिनेमा न चालल्याने नुकसान तर झालंच; शिवाय, या तक्रारीने मनःस्ताप देखील होत आहे. समीक्षकांच्या मते, सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या अतिरंजितपणामुळे तो प्रेक्षकांना आणि लेखिकेला खटकला असावा.
२. 3 इडियट्स: (नेटफ्लिक्स)
लेखक ‘चेतन भगत’ हे नाव आता भारताला सुपरिचित आहे. त्यांनी लिहिलेल्या ‘फाईव्ह पॉईंट समवन’ या पुस्तकावर हा सुपरहिट सिनेमा बेतलेला होता हे पुस्तक वाचलेला प्रत्येक जण नक्की मान्य करतो. पण, निर्माता विधु विनोद चोप्रा आणि दिगदर्शक राजकुमार हिराणी यांनी मात्र ही बाब का मान्य केली नव्हती ? हा एक प्रश्नच आहे. सिनेमाची कथा ही अभिषेक कपूर यांनी लिहिली असल्याची सिनेमाची टीम सगळीकडे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर सांगत होती. या सिनेमात आर. माधवन यांनी साकारलेलं ‘वाईल्ड लाईफ फोटोग्राफर’ हे पात्र पुस्तकाचे लेखक चेतन भगत यांच्या स्वभावाशी साधर्म्य असलेलं होतं, केवळ त्याची आवड ही लिखाणाच्या ऐवजी फोटोग्राफी ही ठेवण्यात आली होती.
हेही वाचा – ‘इन्फोटेन्मेंट’च्या जीवावर तरलेलं बॉलीवूड
3 हॅलो: (झी 5)
सलमान खान, सोहेल खान आणि कंपनीचा हा सिनेमा सुद्धा चेतन भगत यांच्या ‘वन नाईट ऍट कॉल सेंटर’ या पुस्तकावर आधारित होता. ज्या प्रेक्षकांनी हे पुस्तक वाचलं आहे त्यांना हे जाणवलं की, ज्या प्रकारे लेखकाला पुस्तकात प्रत्येक पात्राची एक विशेष ओळख निर्माण करण्यात यश आलं होतं, ते पटकथा लिहितांना जमलं नव्हतं. 250 पानांचं पुस्तक हे अडीच तासांच्या सिनेमात दाखवता येणं यामध्ये कोणत्याही दिगदर्शकासाठी तसं कठीणच आहे. ज्या दिगदर्शकांना हे जमतं त्यांचा सिनेमा हा पुस्तकापेक्षा अधिक लोकप्रिय होतो. पात्र, कथा पुस्तकाप्रमाणे फुलवता न आल्याने या सिनेमाला मात्र अपयशाचा सामना करावा लागला होता.
- हैदर: (झी 5)
विशाल भारद्वाज यांचं दिगदर्शन असलेला हा सिनेमा विलियम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’ या कादंबरीवर आधारित आहे. ‘हॅम्लेट’ हे नाटक स्वरूपात देखील कित्येक कलाकारांनी रंगमंचावर सादर केलं आहे. शेक्सपिअर यांचं सर्वात मोठं नाटक म्हणून देखील हे प्रसिद्ध आहे. दिगदर्शक विशाल भारद्वाज यांच्यावर शेक्सपिअर यांच्या कलाकृतींचा प्रभाव असल्याचं नेहमीच दिसून येतं. त्यांनी दिगदर्शित केलेला ‘ओंकारा’ हा सिनेमा देखील शेक्सपिअर यांच्या ‘ओथेल्लो’ या नाटकावर आधारित होता.
- 7 खून माफ: (नेटफ्लिक्स)
प्रियांका चोप्रा अभिनित आणि विशाल भारद्वाज यांचं दिगदर्शन असलेला हा सिनेमा रस्किन बॉण्ड यांच्या ‘सुसना’ज् सेवन हसबंड्स’ या शॉर्ट स्टोरी वर आधारित आहे. विशाल भारद्वाज यांच्या विनंतीवरून रस्किन बॉण्ड यांनी ही 4 पानांच्या लघुकथेचं 80 पानांच्या पुस्तकात रूपांतर केलं. मॅथ्यू रॉबिन्स यांच्यासह विशाल भारद्वाज यांनी या पुस्तकाला स्क्रिप्टचं स्वरूप दिलं.
- द ब्लू अम्ब्रेला: (प्राईम)
रस्किन बॉण्ड या भारतीय लेखकाने 1980 मध्ये लिहिलेल्या ‘द ब्ल्यू अम्ब्रेला’ या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे. पंकज कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचं विशाल भारद्वाज यांनी दिगदर्शन केलं होतं. 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला ‘सर्वोत्तम बाल चित्रपट’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
- तेरे मेरे सपने: (युट्युब)
1971 मध्ये प्रदर्शित झालेला देव आनंद, विजय आनंद, मुमताज आणि हेमा मालिनी यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा ए. जे.क्रोनिन यांच्या ‘द सीटाडेल’ या पुस्तकावर आधारित आहे.
1996 मध्ये याच नावाने प्रदर्शित झालेल्या सिनेमाला ‘द प्रिन्स अँड द पाऊपर’ या अमेरिकन लेखक मार्क ट्वेन यांच्या पुस्तकावर आधारित आहे. दोन मित्रांना आपलं आयुष्य हे एकमेकांसोबत काही काळासाठी कसं बदलता येऊ शकतं ? हे या दोन्ही कलाकृतीतून मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आलं आहे.
- द नेमसेक: (प्राईम)
मीरा नायर यांचं दिगदर्शन असलेला हा सिनेमा जुम्पा लहेरी यांच्या ‘द नेमसेक’ या पुस्तकावर आधारित आहे. इरफान खानची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा कोलकताच्या गांगुली परिवाराची कथा सांगतो जे की कामानिमित्त अमेरिकेत स्थलांतरित झाले आहेत.
- 2 स्टेट्स्: (जियो हॉटस्टार)
पंजाबचा मुलगा आणि चेन्नईची मुलगी यांच्यामधील ही प्रेमकथा दिगदर्शकाने अगदी जशी चेतन भगत यांनी आपल्या ‘2 स्टेट्स’ या पुस्तकात लिहिली आहे तशीच मोठ्या पडद्यावर दाखवली आहे. अर्जुन कपूरने या सिनेमात चेतन भगत यांनी एकेकाळी जगलेली भूमिका साकारली आहे.
- देवदास: (प्राईम)
मोठ्या पडद्यावर एकदा बंगाली मधून आणि 2 वेळेस हिंदीतून झलकलेला हा सिनेमा सरतचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘देवदास’ या कादंबरीवर आधारित आहे. प्रेमात आकंठ बुडालेल्या देवदास आणि पार्वती यांना देवदासच्या विक्षिप्त वागण्याने आणि त्यामुळे आलेल्या सामाजिक बंधनांमुळे आपली प्रेमकथा पूर्ण करता येत नाही अशी ही कथा आहे. संजय लीला भन्साळी यांनी या कथेला न्याय देत पटकथेत काही बदल केले आणि एका भव्य स्वरूपात ही कथा प्रेक्षकांसमोर ठेवली.
पुस्तकांवरून प्रेरित असलेल्या मराठी सिनेमांपैकी ‘दुनियादारी’ हा प्रयत्न सर्वोत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. सुहास शिरवळकर यांनी याच नावाने लिहिलेल्या या पुस्तकातील पात्र, प्रसंग जिवंत करण्यात दिगदर्शक संजय जाधव यांना यश आलं होतं.
23 एप्रिल रोजी झालेल्या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने सिनेमामध्ये असणारा पुस्तकांचा सहभाग आपल्याला कसा वाटला ? आणि यापैकी आपला आवडता सिनेमा कोणता ? हे मला इमेलवर जरुर कळवा.