जगाच्या आणि देशाच्या समोर असलेले ‘भुकेचे आव्हान’ समर्थपणे पेलण्यासाठी कृषी निविष्ठा योग्य प्रकारे वापरणे हा एक महत्त्वाचा मार्ग आहे, हे आपण पाहिले आहे. हे शक्य होण्यासाठी या निविष्ठा योग्य वेळी, योग्य प्रमाणात उपलब्ध करून देणे आणि शेतकरी व सर्वच ग्राहकांना त्यासंबंधी पुरेसे शास्त्रीय ज्ञान देणे अत्यावश्यक असते. यामधूनच कृषी निविष्ठांची बाजारपेठ आणि विक्रीव्यवस्था उभी राहिली आहे.
कुठल्याही उद्योगाप्रमाणेच कृषी निविष्ठा उद्योगातही काही ध्येये असतात. उद्योगाचे आरोग्य व आर्थिक गणित राखण्यासाठी सतत नवनवे संशोधन करून उत्तम दर्जाची नवीन उत्पादने तयार करणे, बाजारपेठेत आपली भक्कम विक्रीव्यवस्था उभारून अशा उत्पादनांची विक्री करून नफा कमावणे आणि ग्राहकांना उत्तम सेवा पुरवून बाजारपेठेत आपली वेगळी ओळख निर्माण करणे, ही मुख्य ध्येये असतात. कृषी उद्योगांचे वैशिष्टयपूर्ण जग समजून घेताना सुरुवातीला कृषी निविष्ठांची वैशिष्ट्ये समजून घ्यायला हवीत.
साधित मागणी (Derived demand)
कुठल्याही उत्पादनाची ओळख करून घेताना सर्वप्रथम त्याची मागणी कशी, कुठे आणि किती आहे, हे समजून घ्यावे लागते. त्यानुसार त्याची विक्रीव्यवस्था कशी असावी हे ठरते. सर्वसाधारणपणे एखाद्या उत्पादनाची मागणी ही त्याचा थेट वापर कसा होतो, यावर अवलंबून असते. परंतु कृषी निविष्ठांच्या बाबतीत मात्र मागणी ही थेट प्रकारची नसून अनेकविध घटकांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, खत हे उत्पादन शेतीमध्ये वापरण्यासाठी हवामान – पाऊसपाणी, पिकांचा हंगाम (खरीप / रब्बी / उन्हाळी), बाजारपेठेतील परिस्थिती, इत्यादी अनेक घटकांचा एकत्रित प्रभाव लक्षात घेऊन शेतकरी एखादे पीक लावण्याचा निर्णय घेतात आणि मग त्यानुसार कोणते खत कधी आणि किती प्रमाणात वापरायचे हे ठरवतात. म्हणजेच, या विविध घटकांचा खत या उत्पादनाच्या मागणीवर प्रभाव पडत असतो. यालाच साधित मागणी (Derived demand) असे म्हणतात. कृषी निविष्ठांची बाजारातील मागणी ही थेट प्रकारची नसून साधित प्रकारची असल्यामुळे त्यांची निर्मिती, पुरवठा आणि विक्री करताना त्यांच्या मागणीवर प्रभाव टाकणारे असे अनेक घटक एकत्रितपणे लक्षात घ्यावे लागतात.
ग्राहकोपयोगी वस्तू (Consumer goods) आणि औद्योगिक वस्तू (Industrial goods) या दोन्हींशी साधर्म्य
कृषी निविष्ठांचा वापर बहुतांश वैयक्तिक ग्राहक करत असल्यामुळे ग्राहकोपयोगी वस्तूंची (Consumer goods) अनेक वैशिष्ट्ये त्यांना लागू होतात.
उदा. खताची गोणी शेतकरी त्याला हवी तेव्हा विकत घेऊन, हव्या त्या प्रकारे वापरू शकतो. त्याला ज्या कंपनीची किंवा ब्रँडची खते विश्वासार्ह वाटतील ती तो विकत घेऊ शकतो. विशिष्ट कालावधीत ती उत्पादने वापरून संपतात आणि पुढच्या वेळी पुन्हा विकत घ्यावी लागतात. वेगवेगळ्या कंपन्या त्यांची वेगवेगळी उत्पादने बाजारात आणतात आणि त्यांची विक्री करताना एकमेकांशी स्पर्धा करतात. तसेच या वस्तूंसाठी वापरली जाणारी वितरण व विक्री व्यवस्था, आणि त्यांची विक्री करण्यासाठी केल्या जाणाऱ्या जाहिराती व प्रचार-प्रसारासाठी केल्या जाणाऱ्या इतर गोष्टी यासुद्धा ग्राहकोपयोगी वस्तूंप्रमाणे असतात.
परंतु त्याच वेळी या कृषी निविष्ठा उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया, मागणी आणि भौतिक गुणधर्म हे मात्र औद्योगिक वस्तूंसारखे (industrial goods) असतात. कृषी निविष्ठा या साधारणपणे औद्योगिक वस्तूंसारख्या हाताळायला अवजड असतात, त्यामुळे त्यांची वाहतूक करण्याचा खर्च मोठा असतो. अशा वस्तू साठवणूक व वितरणाच्या दरम्यान भरपूर जागा व्यापतात. त्यांची साठवणूक विशिष्ट प्रकारे करावी लागते.
उदा. खताची 25 किलोची गोणी हाताळताना तिचे निश्चित असे वजन असते, ती वाहून नेण्यासाठी आणि साठवण्यासाठी लागणारी व्यवस्था, तेवढ्याच वजनाच्या एखाद्या सिमेंटच्या गोणीसाठी जी वाहतूक सुविधांची आणि साठवणूक गोदामाची व्यवस्था आवश्यक असते, तशीच असते. निर्मिती झाल्यापासून अंतिम वापर होईपर्यंत कोरड्या जागी साठवणूक करणे हे जसे सिमेंटच्या बाबतीत आवश्यक असते, तसेच ते खतांच्या बाबतीतसुद्धा आवश्यक असते. तसेच, कृषी निविष्ठांची निर्मिती अन्य औद्योगिक वस्तूंसारखी औद्योगिक प्रक्रियेतून होत असल्यामुळे त्यांची किंमतही त्या प्रमाणात असते.
बी-बियाणे उद्योगाची वैशिष्ट्ये
बी-बियाणे उद्योगांच्या बाबतीत मात्र इतर कृषी निविष्ठा उद्योगांच्या तुलनेत काही अतिशय रोचक अशी वैशिष्ट्ये आढळतात. असे म्हटले जाते की, बी-बियाणे उद्योगांचे काही बाबतीत औषध निर्मिती उद्योगांशी तर काही बाबतीत चक्क फॅशन क्षेत्राशी साम्य आढळते! ते कसे? ते पाहूया.
औषध निर्मिती उद्योगात सातत्याने ‘संशोधन व विकास’ (Research and Development) करण्यावर भर द्यावा लागतो. प्रत्येक नवीन उत्पादन विकसित करण्यासाठी दीर्घ कालावधी लागतो. तसेच या संशोधन व विकास कामाचा प्रचंड खर्च येतो, त्यामुळे तो खर्च भरून काढण्यासाठी नवीन उत्पादनांची किंमतसुद्धा पुरेशी जास्त ठेवावी लागते. असेच बी-बियाणे उद्योगातसुद्धा होते, कारण पिकाची एखादी नवीन सुधारित जात तयार करायला अनेक वर्षे लागतात, भरपूर खर्च येतो आणि त्यामुळे नवीन सुधारित बियाण्याच्या किंमती जास्त असतात.
लक्षणीय गोष्ट अशी आहे की, ज्याप्रमाणे फॅशन क्षेत्रात सतत नवनवे कल (trends) येत असतात, आणि नवे ट्रेंड अगदी कमी काळ प्रचारात राहून (काही वेळा तर एका ऋतुपुरते राहून) नाहीसे होतात त्याचप्रमाणे, बी-बियाणे उद्योगात नव्याने तयार केलेले उत्पादने (पिकांच्या नव्या जाती) विशिष्ट कालावधीनंतर कालबाह्य होत जातात. अनेक कंपन्या एकमेकांशी स्पर्धा करत असल्यामुळे ग्राहकांना एकाच वेळी अनेक पर्याय बाजारात उपलब्ध होत असतात. अशा प्रकारे, दीर्घ काळ संशोधन करून, भरपूर खर्च करून तयार केलेली नवीन उत्पादने बाजारात मात्र अल्पावधीतच कालबाह्य होतात. ही अवस्था बी-बियाणे उद्योगांसमोर असलेले मोठेच आव्हान ठरते.
तांत्रिक ज्ञानावर आधारित विक्री
सुधारित बी बियाणे, खते, कृषी रसायने या सर्वच कृषी निविष्ठा शास्त्रीय पद्धतीने वापरणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे त्यांचा वापर कसा करावा याचे पुरेसे तांत्रिक ज्ञान शेतकऱ्यांना देणे क्रमप्राप्त असते. साहजिकच, कृषी निविष्ठांची विक्री करताना केवळ एखादी वस्तू विकणे असा दृष्टिकोन ठेवता येत नाही. तर शेतकऱ्यांच्या कृषीविषयक समस्या व गरजांचा समग्रपणे अभ्यास करून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपाय सुचवणे असा दृष्टिकोन ठेवावा लागतो. त्यामुळे या वस्तूंची विक्री करताना शेतीचे आधुनिक शास्त्रीय व तांत्रिक ज्ञान देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. कृषी क्षेत्राचे असे तंत्रशुद्ध ज्ञान असलेल्या युवकांना कृषी निविष्ठा उद्योगांमध्ये रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत.
आतापर्यंत आपण कृषी निविष्ठा उद्योगांची प्रमुख वैशिष्ट्ये समजून घेतली. पुढील भागात कृषी निविष्ठा उद्योगांसमोर असलेली प्रमुख आव्हाने आणि त्या आव्हानांना सामोरे जात हे उद्योग आपली वितरण व विक्री व्यवस्था कशी विकसित करत असतात याबद्दल जाणून घेऊ.