अग्निस्तंभाचा आदि-अंत शोधण्याचे कार्य
शिवपुराणातील कथेनुसार एकदा ब्रह्मा आणि विष्णू या दोघांमध्ये श्रेष्ठत्वाविषयी भांडण झाले. ते सोडविण्यासाठी ते दोघे शिवाकडे गेले. शिवाने त्याच्या आत्मबलाने एक अग्निस्तंभ उत्पन्न केला आणि त्या दोघांना सांगितले की, तुमच्यापैकी जो कोणी ह्या स्तंभाचा आदि-अंत सर्वात प्रथम शोधून काढेल तो श्रेष्ठ. ठरल्याप्रमाणे त्या स्तंभाच्या वरील टोकाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मदेव हंस रूपात आकाशात उडाला आणि खालील टोकाचा शोध घेण्यासाठी विष्णू वराहरूपात पाताळात गेला. अथक शोधानंतरही त्या दोघांना यश आले नाही. शेवटी त्या दोघांचे भांडण तर मिटलेच पण त्यांनी एकमताचे शिवाचे श्रेष्ठत्व मान्य केले. शिवपुराणातील या कथेनंतर शिवाने शिवलिंगाच्या पूजनाचे महत्व सांगितले आहे. शिवाने पुढे असेही म्हटले आहे की, “जो कोणी माझी शिवलिंग स्वरूपात पूजा करेल; त्याला माझ्या आत्म्याची पूजा केल्याचे पुण्य मिळेल”.
बारा ज्योतिर्लिंगांची निर्मिती
पुढे कथेच्या शेवटी तो अग्निस्तंभ भंग झाला आणि त्याचे बारा तुकडे झाले. हे बारा तुकडे म्हणजेच भारतातील बारा ज्योतिर्लिंगे. ती पुढील प्रमाणे आहेत. 1. सोमनाथ (गुजरात) 2 श्री शैलम् मल्लिकार्जुन (आंध्र प्रदेश) 3. महाकालेश्वर (मध्य प्रदेश) 4. ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) 5. केदारनाथ (उत्तराखंड) 6. भीमाशंकर (महाराष्ट्र) 7. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश) 8. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र) 9. परळी वैजनाथ (महाराष्ट्र) 10. औंढा नागनाथ (महाराष्ट्र) 11. रामेश्वर (तमिळनाडू) 12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र).
या कथेमुळे मूर्तीशास्त्रात शिवाचे ‘लिंगोद्भव शिव’ हे मूर्तीविधान प्रसिध्द आहे.
लिंगोद्भव शिवमूर्तीची संकल्पना
प्राचीन संस्कृत ग्रंथांनुसार लिंगोद्भव शिवमूर्तीचे वर्णन पुढील प्रमाणे येते. शिवाचे पाय व मुकुट लिंगात लुप्त झालेले असावेत. वरच्या बाजूस हंसरूप ब्रह्मा आणि खालच्या बाजूस वराहरूपी विष्णू दाखवावेत असे आढळते. लिंगोद्भव शिवमूर्ती उत्तरेपेक्षा दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणावर आढळतात. वेरूळच्या दशावतार लेण्यात अप्रतिम लिंगोद्भव शिवाची प्रतिमा आहे. त्यात स्तंभाच्या मध्यभागी शिव प्रकट होताना दिसतो. स्तंभाच्या दोन्ही बाजूंस ज्वाळा दाखविल्या आहेत. अशीच एक लिंगोद्भव शिवाची मूर्ती कर्नाटकातील पट्टदाक्कल येथेही आहे.

स्वयंभू आणि मानवनिर्मित शिवलिंग
शिवलिंगांचे अनेक प्रकार मानले जातात. सर्वात प्रथम वर्गीकरण म्हणजे स्वयंभू आणि मानवनिर्मित. जे लिंग स्वतः प्रकट झाले आहे, म्हणजेच निसर्गनिर्मित आहे त्याला स्वयंभू लिंग म्हणतात. स्वयंभू लिंगे ही अनियमित स्वरूप व आकाराची असतात. भारतात अशी सुमारे 70 स्वयंभू शिवलिंगे आहेत. मानवनिर्मित लिंगे ही दगड, वाळू, धातू, स्फटिक, रत्ने अशा विविध सामग्रींपासून बनविली जातात. त्यांच्या स्वरूप आणि आकारात वैविध्य आढळते.
चल आणि अचल शिवलिंग
प्रसिध्द भारतीय पुरातत्त्वज्ञ टी. ए. गोपीनाथ राव (1872–1919) यांनी शिवलिंगांचे आणखी एक वर्गीकरण सांगितले आहे. चल व अचल. ज्या लिंगाची गाभाऱ्यात कायमस्वरूपी ठेवून स्थापना आणि पूजा केली जाते ते अचल लिंग होय. या उलट चल लिंग आकाराने लहान असून भाविक ते आपल्यासोबत घेवून हिंडू शकतात. नर्मेदेच्या काठावर आढळणारी नर्मदेश्वर किंवा बाणलिंग ही चल लिंगाची उदाहरणे आहेत. नर्मदा परिक्रमा करणारे भाविक नर्मदेचे पाणी आणि नर्मदेश्वर लिंग किंवा बाणलिंग सोबत घेवून परिक्रमा करतात. स्थानिक परंपरेनुसार आणि स्थलपुराणानुसार अशी समजूत आहे की, नर्मदेच्या काठावरील प्रत्येक दगडात शिवाचा निवास असतो. म्हणून नर्मदेच्या काठावरील प्रत्येक दगडाची शिवलिंग म्हणून पूजा केली जाते.
सृष्टीच्या सुफलनाचे प्रतीक
सध्या आपण शिवलिंग म्हणून ज्याची पूजा करतो, त्याचे दोन भाग असतात शाळुंका आणि ऊर्ध्व पाषाण. त्यापैकी शाळुंका योनिप्रतीक आणि ऊर्ध्व पाषाण लिंगप्रतीक मानले जाते. अशा प्रकारे हे दोनही सृष्टीच्या सुफलनाचे प्रतीक मानले जाते. शाळुंका किंवा पीठावर अभिषेकाचे व इतर पाणी वाहून नेण्यासाठी खोलगट पन्हळ लिंगाच्या डावीकडे असावी असे विधान आहे.

स्तंभरुपातील शिवलिंगे शिवमुखात स्वरुपात
सुरुवातीच्या काळात शिवलिंगे स्तंभ स्वरूपात होती. कालांतराने त्यात बदल होत गेले. पुढील काळात शिवलिंगावर शिवमुख किंवा शिवाच्या प्रतिमा दिसू लागल्या. त्यानुसार एकमुख, द्विमुख, चतुर्मुख लिंगे प्रचलित झाली. इ. स. पू. पहिल्या शतकापासून मुखलिंगे बनविणे सुरु झाले. भरतपूर संग्रहालयात असलेले अघापूरचे एकमुखी शिवलिंग भारतातील सर्वात प्राचीन लिंग समजले जाते. मध्य प्रदेशातील मंदसोर येथे एक गुप्तकालीन अष्टमुखलिंग मिळाले आहे. त्याला एकूण आठ तोंडे आहेत; मध्यभागी एक रौद्र व तीन सौम्य मुखे, तर त्यांच्या सुमारे दीड फूट खाली इतर चार मुखे आहेत.
लिंगांचे विविध प्रकार
अष्टोत्तरशतलिंगे, सहस्रलिंगे, धारालिंगे हे शिवलिंगांचे काही प्रकार आहेत. अष्टोत्तरशतलिंगात लिंगाच्या पूजाभागावर 108 लहान लहान लिंगे कोरलेली असतात. याचप्रमाणे सहस्रलिंगात 1 हजार लिंगे कोरलेली असतात. महाराष्ट्रातील साताऱ्याजवळ पाटेश्वर येथे एक सहस्रलिंग आहे.
हे ही वाचा : शिवाची संहारक रुपे
लिंगाला जोडून शिवप्रतिमा
शिवलिंगाचा अजून एक प्रकार आहे तो म्हणजे कायलिंग. लिंगावर किंवा लिंगाला जोडून पूर्ण शिवप्रतिमा असल्यास तिला कायलिंग असे म्हणतात. गुडीमल्लमच्या परशुरामेश्वर मंदिरातील कायलिंग प्रसिध्द आहे. तेथे जवळपास पाच फूट उंचीच्या शिवलिंगाच्या तीन चतुर्थांश भागात उभी द्विभुज शिवप्रतिमा आहे.
शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर मतप्रवाहांचा प्रभाव
सर्वतोभद्रलिंग गुप्तोत्तर काळात विकसित झाले. हा कायलिंगाचाच एक प्रकार आहे. शैव, वैष्णव, शाक्त, गाणपत्य, सौर इ. सर्व मतप्रवाहांचे एकीकरण सर्वतोभद्रलिंगात पाहायला मिळते. रामनगर (वाराणसी) येथील संग्रहालयात एक सर्वतोभद्रलिंग जतन केलेले आहे. त्यावर चारही बाजूस सूर्य, गणपती, शिवपार्वती, वराह इत्यादी देव कोरलेले दिसतात.
अभ्यासकांच्या मते जगाच्या अनेक भागांत लिंगपूजा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. भारतही त्यास अपवाद नव्हता. तीच पुढे शिवलिंगपूजा म्हणून प्रस्थापित झाली.