श्रावण महिना म्हणजे हिंदू पंचांगातील पावसाचा जोर ओसरण्यानंतरचा काळ. हा महिना अनेक सण, व्रते, परंपरा, आणि धार्मिक उत्सवांनी सजलेला असतो. परंतु यामागे केवळ धार्मिक भावनाच नसून आरोग्यशास्त्रीय आणि ऋतूमानाशी संबंधित विचारसुद्धा दडलेले आहेत.
ऋतूमानाचा परिणाम शरीरावर होणारा परिणाम
पावसाळ्याच्या काळात हवामान दमट आणि बॅक्टेरिया-फंगसच्या वाढीस पोषक असते. त्यामुळे यकृत, पचनसंस्था आणि त्वचेसंबंधी त्रासांची शक्यता वाढते. याच कारणाने आपल्या पूर्वजांनी श्रावणात आहारामध्ये विशिष्ट बदल केले.
श्रावण महिन्यात मांसाहार का टाळावा?
हवामान आणि पचनसंस्था
श्रावण महिना म्हणजे पावसाळ्याचा मध्यभाग. या काळात वातावरण दमट, थंड असते. त्यामुळं पचनशक्ती मंदावते. पचनासाठी जड असलेल्या मांसाहारामुळे अपचन, आम्लपित्त, जुलाब किंवा इतर पोटाचे त्रास होण्याची शक्यता वाढते.
हेल्थ रिस्क – जंतुसंसर्गाचा धोका
या हंगामात पाण्यात व अन्नात जंतू, बॅक्टेरिया सहज वाढतात.
मांस, मासे, अंडी अशा पदार्थांची योग्य स्वच्छता न पाळल्यास अन्न विषबाधा होऊ शकते.
नदीत, तलावात पावसामुळे साचलेले पाणी मासळीला दूषित करतं.
हेही वाचा – अरेच्चा ! डॉक्टरांनी तर मला हे सांगितलंच नाही
शरीरशुद्धी आणि उपास
आयुर्वेदानुसार हा काळ शरीराची शुद्धी व डिटॉक्ससाठी योग्य मानला जातो.
उपवास, फलाहार, हलका आहार — हे सर्व मन आणि शरीर दोन्ही हलकं करतं.
मांसाहार हा ‘तामसिक’ (जड, आळशीपण वाढवणारा) म्हणून गणला जातो. यामुळे श्रावणमधल्या ‘सात्त्विक’ साधनेसाठी तो अयोग्य मानला जातो.
धार्मिक कारणे
श्रावण महिना म्हणजे महादेवाची उपासना, व्रत-वैकल्याचा काळ मानला जातो.
भगवान शिव हे तपस्वी योगी. त्यांचं पूजन करताना साधक सात्त्विक राहणीमान स्वीकारतात.
त्यामुळे मांसाहार, मद्यपान, लसूण-कांदा, आंबट, तळलेले, उकडलेले पदार्थ वर्ज्य केले जातात आणि त्याऐवजी दूध, फळं, फराळाचे पदार्थ, भाजणीचे थालीपीठ, राजगिरा, शिंगाडा अशा हलक्या पण पोषक गोष्टींचा समावेश केला जातो.
व्रत, वैकल्ये आणि आत्मशुद्धी
श्रावणात ‘सोमवार व्रत’, ‘मंगळागौर’, ‘नागपंचमी’, ‘वरलक्ष्मी’, ‘जनमाष्टमी’ अशी अनेक व्रते येतात. या व्रतांचे पालन करताना आहार शुद्ध, नियंत्रित व संयमित ठेवावा लागतो. हा संयमच आपले मन, शरीर आणि आत्मा शुद्ध ठेवतो — हेच या काळाचे महत्व आहे.
दूध, साजूक तूप आणि फळांचा योग्य समावेश
यकृत आणि पचनसंस्था अशक्त झालेली असते म्हणून दूध चांगले उकळून प्यावे. स्थानिक आणि मौसमी फळांवर भर द्यावा उदा. चिकू, पेरू, डाळिंब, आलूबुखार, पीच
आयुर्वेदिय दृष्टिकोन
आयुर्वेदानुसार पावसाळ्यात वातदोष वाढतो. त्यामुळे अन्न पचायला कठीण होते. आहार हलका, गरम, ताजा आणि वायू कमी करणारा असावा. अंकुरित धान्य, हिंग, नवीन आलं, वेगवेगळ्या रानभाज्या उदाहरणार्थ टाकळा, शेवगा, अळू यांचा आहारात समावेश असावा.
श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही प्रकारचे महत्त्व आहे. या काळात वापरल्या जाणाऱ्या खाली काही वनौषधींची माहिती देत आहे.
- तुळस (Holy Basil / Ocimum sanctum)
विष्णूप्रिय तुळस ही लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते. तुळशीशिवाय पूजा अपूर्ण आहे.
एकादशीला विठ्ठलाला तुळशीचा हार करून घालण्याची प्रथा आहे. तीच तुळशीची पानं चावून प्रसाद म्हणून खाल्ल्याने खालील औषधी उपयोग होतात.
औषधी उपयोग:
सर्दी, खोकला, ताप यावर तुळशीचा काढा उपयुक्त आहे.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कारण त्यात अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुणधर्म आहेत.
- आघाडा (Achyranthes aspera)
श्रावण आणि भाद्रपदात पिंडदान, गणेश पूजेत आघाड्याचा वापर होताना दिसतो. श्राद्धकर्मात वाईट शक्ती टाळण्यासाठी आघाडा ठेवतात. रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या पूजेतही वापर होतो
औषधी उपयोग:
सर्दी, खोकला, तापावर आघाड्याची पाने गुणकारी व झाडाचे मूळ आणि पानांचा रस कफनाशक आहे
कीटकनाशक आणि घरशुद्धी करणाऱ्या धूपात वापर होतो.
3.पटवड / पटवडाचं पान (Portulaca quadrifida)
श्रावणात शिवपूजेसाठी वापरले जाणारे विशेष पान व गणपती पूजेत २१ पत्रींत समावेश आहे.
औषधी उपयोग:
पाचक, मूत्रवर्धक, थोडासा थंडावा देणारी व अन्न पचवण्यास मदत करणारी रसयुक्त वनस्पती म्हणून ओळखली जाते.
4. मदार / मंदार (Calotropis gigantea)
शिवपूजेत मदाराची फुले अर्पण करतात. ही फुले उष्ण गुणधर्माची मानली जातात.
औषधी उपयोग:
व्रण, त्वचारोग व सांधेदुखीवर याची पाने औषध म्हणून वापरतात.
5. बेलपत्र (Aegle marmelos)
शिवाला अत्यंत प्रिय असलेलं हे पान. श्रावणात दर सोमवारी याचा उपयोग होतो.
औषधी उपयोग:
याचे पान व फळ दोन्ही पाचनासाठी उत्तम; जंतनाशक व वातहर ठरतात.
6. दुर्वा (Cynodon dactylon)
गणपती पूजेत 21 दुर्वा अर्पण केल्या जातात.
औषधी उपयोग:
रक्तस्त्राव, त्वचारोगांवर उपयुक्त अशी ही गवतासारखी दिसणारी पण अत्यंत औषधी वनस्पती आहे.
श्रावणातील धार्मिक नियम आणि आहारपद्धती म्हणजे केवळ परंपरा नव्हे, तर आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा एक शास्त्रीय मार्ग आहे. यामधून संयम, साधना, स्वच्छता आणि सात्त्विक आहार शिकवला जातो – जो आजही आधुनिक जगात उपयुक्त ठरतो.
पुढील भागात व्रतवैकल्य आणि त्याच्या अनुषंगाने वापरले जाणाऱ्या आहार पद्धती
5 Comments
खूप उपयोगी. बेला च्या पानांचे सेवन कशा प्रकारे करावं
Very useful information.
Very precious information.
खुप छान माहिती आहे.
दुर्वा जशा औषधी आहेत तशाच त्या मातीची धूप थांबवतात पर्यावरण संरक्षण ही होते..
👍👌👌