2020 मध्ये संपूर्ण जगाने एका नवीन आजाराचा अनुभव घेतला. आपण आपल्या आयुष्यातील आणि या शतकातील पहिले पॅनडेमिक अनुभवले. या आधुनिक जगात एखादा आजार एवढ्या मोठ्या प्रमाणावर सर्वदूर पसरू शकतो, ही एक अनपेक्षित घटना होती. जगभरातील 70 करोड लोकांना कोविड झाल्याची अधिकृत नोंद आहे आणि 70 लाख कोविडमृत्यू देखील नोंदवले गेले आहेत. भारतातील 4.5 करोड लोकांना कोविडची लागण झाल्याची नोंद आहे.
70 ते 80 टक्के बाधित रुग्ण लक्षणविहीन
कोविडविषयी माहिती सांगताना किती रुग्णांची “नोंद आहे” असा उल्लेख आधीच्या ओळींमध्ये केला. त्यावरुन लक्षात येते की, कोविडच्या आजारामध्ये 70 ते 80 टक्के बाधित रुग्ण एकही लक्षण न दाखवणारे होते. त्यांना लक्षणविहीन कोविड झाला होता. त्यामुळे त्यांना कधी शंकाही आली नसेल व त्यांनी कोविडसाठी तपासणी देखील केलेली नसेल. त्याचप्रमाणे जेव्हा कोविडची लाट जोरात होती त्या वेळेला बरेच रुग्ण लक्षणे असली तरी घाबरून स्वतः तपासणी करायचे नाहीत किंवा कधी कधी डॉक्टर सांगायचे की “लक्षणांवरून निदान होतंय, आता तपासणी करण्याची गरज नाही”. अशा रुग्णांची नोंद वरील आकड्यांमध्ये नाही. त्यामुळे हे असे कधीही तपासणी न झालेले, मात्र कोविडनी बाधित झालेले असे कितीतरी लोक भारतात असतील. पण त्यांना स्वतःला किंवा त्यांच्या डॉक्टरांना त्यांना कोविड होऊन गेला असण्याविषयी काहीही माहिती नाही. आता कोविड बद्दल चर्चा संपून साधारण वर्षभराचा काळ उलटलाय आणि आता हा विषय का बरं सांगत आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर झालं असं की एका मैत्रिणीने मला विचारले की “सध्या अर्धांग वायू होण्याच्या किंवा मेंदूतील रक्तस्त्रावाने झटका येण्याच्या घटनांचे प्रमाण वाढलेले दिसते. यामागे लसीचा हात तर नसेल ना?”
लस आणि आजाराच्या जंतूमधील फरक
जेव्हा असा प्रश्न मनात येतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची. लस म्हणजे ठराविक संख्येमधील मृत विषाणू किंवा विषाणूंचा अतिशय लहान तुकडा असतात. मात्र एखाद्या व्यक्तीला संसर्ग होतो किंवा आजार होतो त्या वेळेला त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये संपूर्ण जिवंत विषाणू हे लाखो ते करोडोंच्या संख्येमध्ये निर्माण झालेले असतात. आता तुम्हीच सांगा शरीराचे जर नुकसान व्हायचे असेल तर ते अर्धमेल्या किंवा अर्धवट असणाऱ्या काही हजार विषाणूंमुळे होणार की लाखो आणि करोडो सशक्त विषाणूमुळे होणार? कॉमन सेन्स सांगतो की पहिली शंका आपण सशक्त आणि करोडो विषाणू निर्माण करणाऱ्या आजारावर घ्यायला हवी.
कोविड आणि मेंदूचा संबंध!
पण तुम्ही म्हणाल की कोविड हा तर ‘एक श्वसनसंस्थेचा साधा सर्दी सारखा आजार’ होता असे आम्ही बऱ्याच तज्ञांकडून ऐकले. मग या आजारामध्ये मेंदू संबंधी काही त्रास होण्याची शक्यता का असेल?
कोविड खरे तर केवळ श्वसन संस्थेचा आजार नव्हता तर शरीरातील जवळजवळ सर्व संस्थांना बाधित करणारा हा आजार होता. कारण ‘कोविड ACE 2 रिसेप्टर’ असणाऱ्या प्रत्येक पेशीला बाधित करीत होता आणि या पेशी शरीरातील विविध अवयवांमध्ये सापडतात. यातील सर्वात महत्त्वाचे अवयव म्हणजे रक्तवाहिन्या, हृदय, मेंदू, स्वादुपिंड इत्यादी. कोविडचे एक मुख्य लक्षण काय होते सांगा बरं? ‘वास येणे किंवा चव समजणे बंद’ होत होते, बरोबर ना? याचाच अर्थ काही रुग्णांमध्ये कोविड जेव्हा मेंदूपर्यंत पोहोचत होता, त्यावेळी या वास येण्याच्या किंवा चव लागण्याच्या क्षमता कमी होत होत्या . बऱ्याच जणांना हा त्रास कोविड बरा झाल्यानंतर अनेक महिने सहन करावा लागला.
मैत्रिणीच्या या प्रश्नाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आणि कोविडनंतर असे मेंदू संबंधित काही आजार होतात का? ही माहिती घेण्यासाठी जेव्हा सर्च केले तेव्हा एक अतिशय उत्तम अभ्यास सापडला. आज या अभ्यासाविषयी व त्यामध्ये जे निष्कर्ष निघाले त्याविषयी माहिती देणार आहे.
हा अभ्यास कसा केला?
2022 मध्ये Nature या जगप्रसिद्ध नियतकालिकामध्ये हा अभ्यास प्रसिद्ध झाला आहे ज्यामध्ये कोविड झाल्यानंतर मेंदू संबंधित काही आजार वाढतात का हे तपासले आहे. ज्यांचा कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे अशा लोकांमध्ये एक वर्ष पार पडल्यानंतर मेंदू संबंधी आजार दिसतात का? याची तुलना कोविड न झालेल्या व्यक्तींसोबत केलेली आहे.
हे असे लाखो लोकांवरील अभ्यास तेव्हाच करता येतात जेव्हा प्रत्येकाच्या आरोग्याची सर्व नोंद एकत्रित ठेवलेली असते आणि ती परिपूर्ण असते. त्यामुळे हा अभ्यास अमेरिकेमध्ये करण्यात आलेला आहे. या अभ्यासामध्ये लाखो लोकांची माहिती देखील समाविष्ट केलेली होती. कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या साधारण दीड लाख व्यक्तींची माहिती यामध्ये घेतली आहे. तुलनेसाठी त्यांनी दोन गट निवडले. एक गट त्याच काळामध्ये ज्यांना कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला असे साधारण साडेपाच लाखाहून अधिक लोक आणि दुसरा गट कोविडच्या काळात पूर्वीच्या साडेपाच लाखाहून अधिक लोकांच्या आरोग्य नोंदी यासाठी वापरल्या गेल्या. म्हणजे तुलनेसाठीचा प्रत्येक गट हा साधारण चौपट अधिक आहे, ज्यामुळे सापडणारे निष्कर्ष हे अधिक खात्रीशीर असतात.
हा अभ्यास काय सांगतो?
ज्यांना कोविडचा संसर्ग झाला होता अशा सर्व व्यक्तींमध्ये त्यानंतर एका वर्षाच्या काळामध्ये मेंदू संबंधित विविध आजार होण्याचे प्रमाण वाढते. हा अभ्यास केवळ एका वर्षापर्यंतचा असल्याने निष्कर्ष एका वर्षापर्यंतचे आहेत. त्याहून अधिक काळासाठी वेगळा अभ्यास करावा लागेल. प्रत्येक प्रकारचा आजार होण्याचा धोका हा वेगवेगळा आहे. पण सर्वसाधारणपणे कोविडनंतर असे आजार होण्याचा धोका साधारण 1.42 पट म्हणजेच जवळजवळ दीडपट अधिक असतो. या आजाराचे प्रमाण दर एक हजार व्यक्तीमागे 70 व्यक्ती एवढे आढळून आले.
महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांना कोविडमध्ये रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नव्हती व सौम्य कोविड आढळून आला होता अशा व्यक्तींमध्ये देखील या आजारांचे प्रमाण वाढलेले आढळले. म्हणजेच कोविडची तीव्रता किती होती यानुसार कमी अधिक प्रमाणात हे मेंदूचे आजार दिसून येतात. तसेच रुग्णांचे वय काय आहे, त्यानुसार आजाराचे प्रकार थोडेफार वेगळे असू शकतात मात्र सर्वच गटांमध्ये हे मेंदू संबंधित आजार लक्षणीयरित्या वाढलेले दिसून आले.
कोविड नंतर मज्जासंथेचे कोणकोणत्या आजारांचे प्रमाण वाढलेले आढळून आले?
मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने तसेच मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने अर्धांगवायूचा झटका येणे.
यामध्ये रक्तवाहिन्या बाधित झाल्याने त्या संबंधित आजार होतात
1. स्मरणशक्ती व आकलन क्षमता यासंबंधीचे आजार
2. प्रसंगोत्पादक आजार जसे मायग्रेन किंवा झटका येणे, ज्यामध्ये वारंवार त्रास होतो.
3. मानसिक अनारोग्याच्या विविध समस्या
4. मज्जा संस्थेशी संबंधित स्नायूंचे आजार
5. संवेदनेशी संबंधित आजार
6. मेंदू व मेंदूच्या आवरणांना येणारी सूज
7. परिधीय मज्जासंस्थेशी संबंधित आजार
8. Extrapyramidal आजार
9. GB syndrome
या यादीवरून लक्षात येईल की कोविड झाल्यानंतर देखील बराच काळ आपल्या शरीरामध्ये विविध प्रकारचे आजार होण्याचे प्रमाण हे कोविड न झालेल्या लोकांपेक्षा लक्षणीयरित्या अधिक असते. मज्जा संस्थेशी संबंधित जवळजवळ सर्व प्रकारचे आजार हे वाढीव प्रमाणात दिसून येतात. मात्र हे आजार कोविड झाल्यानंतर बऱ्याच काळाने दिसून येत असल्याने हे आजार कोविडशी संबंधित असावेत अशी शंका ना रुग्णाच्या मनात येते, ना डॉक्टरांच्या मनात येते. मात्र जेव्हा अशा पद्धतीने लाखो लोकांमधील अभ्यास केले जातात तेव्हा समजते की, या आजारांचे प्रमाण कोविड झाल्याच्या इतिहासाशी संबंधित आहेत. कोविड झाल्यानंतर केवळ मज्जासंस्थेशी संबंधित आजार वाढतात असे नसून शरीरातील इतर संस्थासंबंधित आजारही वाढीव प्रमाणात दिसून येतात. याविषयी अनेक अभ्यास झालेले आहेत.
याचे काय कारण असू शकते?
हे असे घडण्याचे नक्की कारण काय आहे, याविषयी अद्याप खात्रीशीर निर्णय झालेला नाही. मात्र अनेक संभावित कारणे आहेत ज्यावर अधिक अभ्यास सुरू आहेत. त्यातील एक कारण म्हणजे कोविड संसर्ग हा आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील बाधित करीत होता. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवरील शरीराचे नियंत्रण कमी होऊन आपल्याच शरीरावर हल्ला करण्याचे प्रमाण वाढते. अनेक autoimmune आजार कोविडनंतर वाढलेले आढळले आहेत. काही शास्त्रज्ञांच्या मध्ये मते शरीरातून कोविड विषाणू पूर्णपणे बाहेर न पडता कुठेतरी शिल्लक राहत असावा किंवा त्याचे काही भाग राहत असावेत. त्यामुळे शरीरातील इम्युनिटी ही सतत काम करून त्यांना बाहेर काढायचा प्रयत्न करते. अशावेळी शरीराचे देखील नुकसान होते. काहींच्या मते संसर्गाच्या वेळी कोविड विषाणूने बाधित झालेल्या पेशी मृत झाल्याने अवयवांचे नुकसान झालेले असते व त्याचे परिणाम हळूहळू लक्षात येतात. सर्वात महत्त्वाचे एक कारण म्हणजे कोविड विषाणूने आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांना बाधित करून त्यातील पेशी नष्ट केलेल्या असल्याने रक्तवाहिन्यासंबंधित आजारांमुळे शरीरातील इतर अवयव देखील निकामी होतात किंवा काही गंभीर लक्षणे दिसून येतात.
यातील नक्की कारण कोणते हे विविध अभ्यासाद्वारे समोर येईल. यासंदर्भात एकाहून अधिक कारणे देखील असू शकतात. मात्र होणारे परिणाम हे त्या व्यक्तीसाठी मात्र गंभीरच असतात.
भविष्यात नवा आजार झाल्यास काय काळजी घ्यावी?
या सर्वांमधून एकच धडा लक्षात ठेवायचा. भविष्यात एखादा नूतन नवा आजार पुन्हा निर्माण झाला तर अशावेळी तज्ञांचे चुकीचे सल्ले ऐकून त्या आजाराचे स्वागत करायचे नाही. कारण नूतन आजार हे नेहमी दीर्घकालीन परिणाम करणारे असतात. त्यामुळे संसर्ग नियंत्रणासाठी व संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रयत्न करायचे आणि स्वतःला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवायचे.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको कोविडनंतर होऊ शकणाऱ्या मज्जा संस्था संबंधित आजारांचे प्रमाण हे प्रती हजारी 70 असे कमी असल्याने प्रत्येकासाठी याचा धोका नाही. मात्र यासंबंधी कोणतीही लक्षणे तुम्हाला आढळून येत असतील तर तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका. कारण योग्यवेळी उपचार घेतल्यास होणारे नुकसान हे नियंत्रणात ठेवता येते.
विविध आजारांविषयी व उपचारांविषयी योग्य शास्त्रीय माहिती असल्याने आपण आपले आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे जपू शकतो. जगभरातील शास्त्रज्ञ आजारांबद्दल हे असे विविध अभ्यास करतात. त्यामुळे आपण आरोग्यसंबंधी योग्य निर्णय घेऊ शकतो.
कोविड शरीरातील विविध संस्थात्मक आजार अनेक महिन्यांपर्यंत निर्माण करू शकतो हे लक्षात ठेवूया!
अभ्यासाची लिंक – https://www.nature.com/articles/s41591-022-02001-z
1 Comment
Thank you so much for this information!