सृष्टीच्या त्रिमूर्तींपैकी शिव संहाराचा देव आहे. शिवाचे रूप एकीकडे शांत आणि वर देणारे दिसते, त्याचवेळी त्याचे उग्र आणि विध्वंसक रूपही दिसून येते. सर्जनासाठी आणि परिवर्तनासाठी विनाश, अहंकाराचा नाश ही शिवाच्या संहारामागील महत्वाची कारणे आहेत. आपल्या भक्तांसाठी आणि अन्यायाचा नाश करण्यासाठी शिवाने धारण केलेल्या रूपांना संहारमूर्ती म्हणतात. यात रुद्र, महाकाल, भैरव, त्रिपुरांतक, कालभैरव, वीरभद्र, गजासुरवध, अंधकासुरवध अशा शिवाच्या विविध रूपांचा समावेश होतो. संस्कृत साहित्यात आणि लोकसाहित्यात या शिवाच्या संहारमूर्तींच्या विविध कथा प्रचलित आहेत. आजच्या लेखात आपण शिवाच्या गजासुरवध आणि अंधकासुरवध या दोन संहारमूर्तींची ओळख करून घेवू.
गजासूराची कातडी शिवाच्या शरीरावर
गजासुरसंहार ही एक प्रसिद्ध पुराणकथा आहे, ज्यात भगवान शिवाने गजासुर नावाच्या बलाढ्य राक्षसाचा वध केला. प्राचीन काळी गजासुर नावाच्या बलाढ्य राक्षसाने कठोर तपस्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि शिवाकडून अमरत्वाचा वर प्राप्त करून घेतला. वरदान मिळाल्यावर गजासुर गर्विष्ठ झाला आणि त्याने सर्वत्र उत्पात माजवायला सुरुवात केली. तो ऋषी-मुनींना त्रास देऊ लागला आणि स्वर्गलोकावर हल्ला करून देवतांना संकटात टाकले. त्याच्या वाढत्या अत्याचारांमुळे सर्व देवता घाबरले आणि त्यांनी भगवान विष्णू व ब्रह्मदेवांसह महादेवांकडे मदतीसाठी प्रार्थना केली. भगवान शिवाने गजासुराविरुध्द युद्ध पुकारले. तेव्हा गजासुराने प्रचंड शक्तीने महादेवांवर आक्रमण केले. दोघांमध्ये भीषण युद्ध झाले. गजासुराने अनेक मायावी शक्ती वापरल्या, परंतु महादेवांनी त्याला सहज पराभूत केले आणि गजासुराचा वध केला. गजासुराने मरण्यापूर्वी आपल्या उद्धारासाठी प्रार्थना केली की मृत्यूनंतर त्याला शिवाच्या दिव्य स्वरूपात समाविष्ट करून घ्यावे.” शिवाने त्याची इच्छा पूर्ण केली आणि गजासुराची कातडी स्वतःच्या शरीरावर वेशीप्रमाणे परिधान केली.
शिवमूर्तीचे शास्त्र
गजासुरवधमूर्तीचे उल्लेख ‘अभिलषितार्थचिंतामणी’, ‘अंशुमद्भेदागम’, ‘शिल्परत्न’ आणि अन्य शैवागम ग्रंथांमध्ये आढळतात. ‘अभिलषितार्थचिंतामणी’ नुसार शिवाच्या दहा भुजा असाव्यात, तर ‘अंशुमद्भेदागम’ त्यांना चार किंवा आठ हात असावेत असे सांगतो. जर चार हात असतील, तर मागील दोन हातांत गजचर्म धारण केलेले असते, तर पुढील उजव्या हातात पाश आणि डाव्या हातात गजदंत असतो. आठ हातांच्या मूर्तीत उजवीकडील तीन हात अनुक्रमे त्रिशूळ, डमरू आणि पाश धारण करतात, तर उरलेला उजवा हात एका डाव्या हातासह मिळून गजचर्म पकडतो. डाव्या बाजूचे उर्वरित तीन हात कपाल, गजदंत आणि विस्मयमुद्रा धारण करतात. शिवाचा डावा पाय ठामपणे हत्तीच्या शिरावर टेकलेला असतो, तर उजवा पाय किंचित वाकलेला असतो. त्यांच्या मागील दोन हातांनी पकडलेले गजचर्म प्रभावळीसारखे भासावे, असे शिल्पवर्णन आहे. शिवप्रतिमा विविध आभूषणांनी अलंकृत, रेशमी वस्त्र व व्याघ्रचर्म धारण केलेली असते. शिवाच्या उजवीकडे स्कंदासह पार्वती उभी असावी, असेही सांगितले जाते.
सोळा हात असणारी शिवाची संहारमूर्ती
शिवाच्या संहारमूर्तींपैकी गजासुरवधमूर्ती किंवा गजहामूर्ती ही सर्वांत प्राचीन संहारप्रतिमा समजली जाते. सर्वात प्रसिध्द गजासुराची मूर्ती कर्नाटकातील हळेबीडू आणि बेलूर येथील होयसळ राजांनी बांधलेल्या मंदिरात आढळते. या मूर्त्यांमध्ये शिवाला सोळा हात दाखविले आहेत. सध्या त्यांपैकी अनेक भग्न झाले आहेत. सर्वात मागच्या दोन हातांत शिवाने गजचर्म प्रभावळीप्रमाणे धरले आहे. या गजचर्मरूपी प्रभावळीच्या भोवती अष्टदिक्पालांच्या मूर्ती कोरल्या आहेत. शिवाच्या पायांखाली गजासुराचे मस्तक आहे. शिवाने जटामुकुट, रुंडमाळा व इतर आभूषणे धारण केली आहेत. त्याच्या उजवीकडे ब्रह्मा व डावीकडे विष्णू आहेत.
अंधकासुराच्या संहाराची कथा
अंधकासुरसंहारची कथा ही पुराणांतील दुसरी प्रसिध्द कथा आहे. शिवाच्या घामातून उत्पन्न एक जन्मतः अंध बालक उत्पन्न झाले. पुढे हिरण्याक्ष राक्षसाने त्याला दत्तक घेतले. अंधकाला लहानपणापासूनच दुर्बळ आणि निरुपयोगी समजले गेले. मात्र पुढे, अंधकाने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अमरत्वाचा वर मागितला. ब्रह्माने हा वर देण्याचे नाकारल्यावर अंधकाने पुन्हा वेगळा वर मागितला, की जर मी माझ्या मातृसमान व्यक्तीवर वाईट नजरेने पाहिले तर माझा मृत्यू व्हावा. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले. ब्रह्मदेवाने वरदान दिल्यानंतर, अहंकारी अंधकासुराने स्वतःला अमर समजून सर्व लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. पुढे एकदा पार्वतीला पाहिल्यावर अंधकासुराने तिच्यावर मोहित होवून तिचे हरण करण्याचा प्रयत्न केला. या कृत्यामुळे भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी तांडव रूप धारण करून अंधकासुराशी युद्ध केले. अंधकासुराला अजून एक वरदान मिळाले होते की जेथे जेथे त्याचा रक्ताचा थेंब पडेल, तिथे तिथे नवीन अंधक उत्पन्न होतील.” त्यामुळे युद्ध अत्यंत भीषण झाले. जेव्हा शिव आपल्या त्रिशूळाने अंधकासुरावर वार करत, तेव्हा त्याच्या रक्तातून हजारो अंधक निर्माण होत होते. त्यांना रोखण्यासाठी शिवाने चामुंडा व सप्तमातृका निर्माण केल्या. ह्या देवींनी ते रक्त प्राशन केले, जेणेकरून नवीन अंधक जन्माला येणार नाहीत. अखेर, भगवान शिवांनी त्रिशूळाने अंधकासुराला भोसकले आणि त्याचा वध केला. अशा प्रकारे ब्रह्मदेवाच्या वरानुसार अंधकासुराचा नाश झाला.
अंधकासुराच्या वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रतिमा
भारतातील विविध मंदिरात अंधकासुरवधाच्या प्रतिमा दिसतात. मात्र विशेष म्हणजे, अंधकासुरवधमूर्तीची लोकप्रियता असूनही तिच्या प्रतिमा कशा बनवाव्या याची कोणत्याही ग्रंथात नोंद आढळत नाही.
अंधकासुरसंहारमूर्तीमध्ये शिव आलीढासनात उभा असतो. दोन्ही बाजूच्या एकेका हातांनी मिळून एक लांब त्रिशूळ पेलला आहे व त्याच्या टोकावर अंधकासुर दर्शविलेला असतो. चेहऱ्यावरील कृद्ध भाव दाखविलेले असतात. मुंबईतील घारापुरी लेण्यात अंधकासुरमर्दनाचे एक अतिशय उत्कृष्ट शिल्प आहे. त्याच प्रमाणे कर्नाटकातील हळेबीडू आणि बेलूर येथील होयसळ राजांनी बांधलेल्या मंदिरातही अंधकासुरवधप्रतिमा आढळतात.
दोन कथांचे मिश्रण असणाऱ्या प्रतिमा
कधी कधी गजासुरवध आणि अंधकासुरवध या दोन्ही कथा एकमेकांमध्ये मिसळलेल्या आढळतात. ‘वराहपुराण’ सांगते की असुरराज अंधक पार्वतीवर आसक्त झाला. त्याचवेळी, त्याचा सहायक नीलासुर हत्तीच्या रूपात प्रकट झाला आणि त्याने शिवाचा वध करण्याचा प्रयत्न केला. नंदीला या कटाची माहिती मिळताच त्याने ती वीरभद्राला सांगितली. वीरभद्राने तत्काळ नीलासुराला पराजित करून त्याचा वध केला आणि त्याचे कातडे काढून भगवान शिवाला अर्पण केले. शिवाने ते कातडे उत्तरीय म्हणून परिधान केले. त्यानंतर, शिवाने अंधकासुरालाही युध्दात पराभूत करून त्याचा संहार केला.