ग्रामसभेचे प्रभावी आयोजन – काही प्रयोग

Gram Panchayat: गाव विकासात महत्त्वाची भूमिका असते ती ग्रामसभेची. गावात होणारी कामे सर्व संमतीने होण्यासाठी ग्रामसभा आहे. तिचे महत्त्व लक्षात घेऊन ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.
[gspeech type=button]

प्रत्येक ग्रामपंचायतीला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम 7 अनुषंगाने वर्षातून चार ग्रामसभा घेणे अनिवार्य आहे. मात्र जवळपास नव्वद टक्के ग्रामसभा या कोरम अभावी तहकूब होतात. ग्रामपंचायत अधिनियमानुसार किमान शंभर किंवा मतदार यादीच्या पंधरा टक्के उपस्थिती ही ग्रामसभेचा कोरम पूर्ण करण्यासाठीची अट आहे. आदिवासी क्षेत्रातील म्हणजे पेसा अंतर्गत होणाऱ्या ग्रामसभा या वेगळ्या असतात. त्या सभा कोरम अभावी तहकूब करता येत नाही. मात्र सर्वसाधारण ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा कोरम अभावी तहकूब  होण्याचे प्रमाण हे बरेच अधिक असल्याचे आपणास  दिसून येते. ग्रामसभेचे प्रभावी आयोजन करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील वरूर तालुक्यातील सूरळी ग्रामपंचायतीच्या सरपंचताईंनी जे प्रयोग केले ते या ठिकाणी मुद्दाम सांगावे वाटतात. 

ग्रामपंचायत अधिकारी हे सरपंच महोदयांनी सूचित केल्यानुसार ग्रामसभेची नोटीस काढत असतात. ही नोटीस किमान दहा दिवसांपूर्वीच काढली जाते.

सरपंच ताईंचा वेगळा पुढाकार

त्या  सरपंच ताई ग्रामसभेबद्दल इत्यंभूत माहिती ग्रामसेवकाकडून  (ज्यांना आता ग्रामपंचायत अधिकारी संबोधले जाते)  करून घेतात. ग्रामसभेला लोक का उपस्थित राहत नाहीत यावर  त्या मनन चिंतन करतात. सभा प्रभावी व्हावी यासाठी  खालील प्रमाणे तोडगा काढतात. त्या सकाळी घरोघरी भेट देण्यास जातात, “आवो तात्या,काकी!.. आपल्या गावची गराम सभा इतवारी ठिवली आहे बरं का!  आपण जसे चांगले कपडे घालून लग्नात जातो ना तसे गराम सभेत तुम्ही आठोणींन या. शेवंते, तुले शिलाई मशीन पाह्यजे ना? मंग गराम सभेत येजो!” अशाप्रकारे त्या सरपंच ताई घरोघरी जाऊन  गावात होणाऱ्या ग्रामसभेबाबत माहिती  देत देतात. गावकऱ्यांना हे प्रकरण जरा वेगळंच  वाटलं. गावात ग्रामसभा होते आणि त्याचे निमंत्रण अशा प्रकारे दिले जाते हे गावकरी प्रथमच अनुभवित होते..

ग्रामसभेची भूमिका

गाव विकासात महत्त्वाची भूमिका असते ती ग्रामसभेची. गावात होणारी कामे सर्व संमतीने होण्यासाठी ग्रामसभा आहे. तिचे महत्त्व लक्षात घेऊन ग्रामसभेला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. गावातील मतदार यादीत ज्यांची नावे ते सर्व ग्रामसभेचे सदस्य असतात. त्या सर्वांनी ग्रामसभेला यावे आणि आपल्या गावाच्या विकासावर साधक बाधक चर्चा करीत महत्त्वाचे ठराव ग्रामसभेत मंजूर करून घ्यावेत आणि ग्रामपंचायतने त्यावर अंमलबजावणी करावी अशी ही रचना आहे. यासाठीच  वर्षातून चार ग्रामसभा घेण्याचे बंधन सरपंचावर आहे. सरपंच नियमाप्रमाणे सभा बोलवतात, परंतु ग्रामसभेला लोक येतच नाही अशी त्यांची तक्रार असते. ग्रामसभेला अपेक्षित उपस्थिती नसली की मग ती सभा तहकूब करावी लागते आणि तहकूब सभेला कोरम ची गरज नसते. कोरम अभावी तहकूब ग्रामसभेत विषय पत्रिकेनुसार ठराव सरपंच  मग पारित करून घेतात. ग्रामसभेला लोक येत नाहीत हा अनेक ग्रामपंचायतींचा प्रश्न. मात्र ग्रामसभेला लोकांनी का यावं ? त्यांना आपण काय देणार ? याचे उत्तर बऱ्याच ग्राम प्रशासनाजवळ नसते.

ग्रामसभा तहकूब होण्यामागे सरपंच-  सचिव हेच जबाबदार

ग्रामसभा तहकूब का होतात? ग्रामसभेला लोक उपस्थित का राहत नाही? याचे उत्तर शोधले तर सरपंच सचिवांची अनास्था हे एक कारण सांगितले जाते. बरेचदा असेही बोलले जाते की, मुळात सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव यांनाच ग्रामसभेला लोकांनी यावं असं वाटत नाही. कारण लोकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना “आ बैल मुझे मार “! अशी स्वतःची अवस्था का करून घ्यावी? असे खाजगीत बोलताना सरपंच सचिव सांगतात. केवळ नोटीस काढली, सार्वजनिक ठिकाणी दवंडी दिली म्हणजे ग्रामसभेला लोक येतील असे अलीकडे होत नाही. बहुतेक ग्रामसभेतील भांडणे,गोंधळ,वादावादी याला ग्रामस्थ कंटाळलेले असतात. म्हणून ते तिकडे जायचे टाळतात.  

मेंढा(लेखा)गावचा आदर्श

ग्रामसभेचे महत्व ओळखून त्याप्रमाणे कारभार करणारे गाव  म्हणजे  लेखा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा.. मेंढा ग्रामसभेने  ‘ग्रामस्वराज्य हा शब्द खऱ्या अर्थाने कृतीत उतरविला. ग्रामसभेचे महत्त्व जाणून त्यांनी गावातील जल, जमीन, जंगल यावर हक्क प्रस्थापित केला. मेंढा गावच्या ग्रामसभेपुढे केंद्र सरकारला देखील नमावे लागले. म्हणूनच “हमारे गाव मे हमारा राज,”असं ते पुरुषार्थाने सांगू शकतात. मेंढा गावांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील बांबूचा लिलाव फॉरेस्ट अधिकारी केवळ पन्नास ते साठ लाख रुपयांना करत होते. ते जंगल क्षेत्र ग्राम सभेने आपल्या ताब्यात घेऊन तेथील बांबू  दीड कोटी रुपयांना  ग्रामसभेच्या माध्यमातून लिलावात विकला. मेंढा गावची ग्रामसभा अशी आर्थिक दृष्ट्या दरवर्षी संपन्न होत गेली. त्या गावातील सर्व व्यवहार हे ग्रामसभेअंतर्गत चालतात.   

गावागावातील ग्रामसभा सक्षम कशा होतील यासाठी अनेक ठिकाणी काही प्रयोग सुरू असतात. ते करून बघायला हरकत नसावी. जसा त्या सरपंच ताईने एक प्रयोग केला. महिलांसाठी राखीव असलेल्या अनुसूचित जमातीच्या पदावर त्या  सरपंच म्हणून निवडून आल्या. राजकारण, ग्रामपंचायत या बाबी त्यांच्यासाठी  पूर्णतः नव्या  होत्या.  

सरपंच ताईची कल्पकता

ग्रामसभेचे महत्त्व समजून सांगितल्यावर त्यासाठी त्या सरपंच ताईने  स्वतः पुढाकार घेतला. त्या घरोघरी गेल्या. ग्रामसभेची माहिती प्रत्येक कुटुंबाला दिली आणि ग्रामसभेला येण्याचे आग्रहाने निमंत्रण दिले. ग्रामसभा म्हणजे गावाचा उत्सव. लग्नात जसे नवीन कपडे घालून जातो ना अगदी तसं ग्रामसभेला या असं सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत. त्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्या कडून ग्रामसभेची माहिती देणारे मोठे फ्लेक्स गावातल्या मुख्य चौकात लावून घेतले. साहजिकच गावकऱ्यांना सभेची तारीख वेळोवेळी समोर दिसायची. त्या सरपंच ताई गावातील शिक्षकांना भेटल्या. सभा सुरू होण्याच्या अर्धा तास आधी त्यांनी शिक्षकांना सभास्थळी “ग्रामगीता” वाचन करायला लावले. त्यासाठी खास स्पीकर  लावून घेतला. ग्रामगीतेतील गाव हिताच्या सुंदर ओवी गावकऱ्यांच्या कानावर पडत गेल्या आणि लोक हळूहळू सभेला जमू लागले. सभेच्या ठरलेल्या वेळी गावकरी जमल्यावर कोरम पूर्ण झाला याची खात्री करून घेतली गेली आणि वेळेवर सभेला सुरुवात झाली. प्रथम शिपायाने उपस्थित सर्वांना कोऱ्या चिठ्या दिल्या.त्यावर स्वतःचे नाव लिहायला सांगून एका डब्यात त्या सर्व चिठ्या जमा केल्या. ग्रामसभेला जे उपस्थित राहिले त्यांनाच शासकीय योजनांचा लाभ मिळेल असे त्यांनी आधी जाहीर केले. विविध शासकीय योजनांची माहिती देण्यास त्यांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्याला सांगितले. विषय पत्रिकेनुसार सभेचे कामकाज आटोपल्यावर त्यांनी एका लहान मुलीला बोलावले आणि तिच्या हाताने तीन चिठ्ठ्या काढल्या. उपस्थितांपैकी ज्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या निघाल्या त्यांना “ग्रामसभा उपस्थिती गौरव पुरस्कारम्हणून काही वस्तू भेट स्वरूपात वाटप केल्या.  यापूर्वी हे असे कधी घडले नव्हते. गावातील प्रत्येकाला आश्चर्य वाटले. यापुढे प्रत्येक ग्रामसभेत उपस्थित राहणाऱ्याला अशाच चिठ्ठ्या काढून तीन पुरस्कार देण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले. सरपंच बाईच्या सभा घेण्याच्या  अशा पद्धतीची गावात सर्वत्र चर्चा व्हायला लागली. पुढच्या सर्व सभा हाऊसफुल्ल. आमच्या गावच्या ग्रामसभेत लोकं येतच नाहीत अशी निव्वळ ओरड करणाऱ्यांसाठी हे एक उत्तम उदाहरण ठरावे. असे काही प्रयोग प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आपल्या गावात करून पहायला काय हरकत आहे.

ग्रामसभा सक्षम झाल्या की गावातील विकास कामात लोकांचा सहभाग आपोआप वाढायला लागतो. केवळ कायद्यात नमूद आहे म्हणून ग्रामसभा घेणे वेगळे आणि तिचे परिणामकारक आयोजन करणे वेगळे. ग्रामसभेला लोक आले तरच त्यांची विकास कामातील रुची वाढू शकते. त्यासाठी प्रथम सरपंच महोदयांनी सकारात्मक राहणे आवश्यक आहे. सभाध्यक्षांची खंबीरता, कल्पकता हीच ग्रामसभांना योग्य दिशा मिळवून देऊन गाव विकासाला चालना देईल एवढे मात्र निश्चित.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Fishery : मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचा निर्णय 22 एप्रिल रोजीच्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वाच्या निर्णयाची
Mirzapur: महात्मा गांधी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवत वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या नेरी मिर्जापुर या गावाने शाश्वत विकासाचे वेगवेगळे
Summer health care : उन्हाळ्याच्या दिवसांत त्वचेशी निगडित विकारांमध्ये फंगल इन्फेक्शनचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे, आहारात

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ