पर्माकल्चर पद्धतीने शेत डिझाईन करताना, एक महत्वाची कन्सेप्ट म्हणजे Zone Analysis. शेतावर वेगवेगळे घटक डिझाईन करताना त्यांची जागा नेमकी कुठे असावी, हे ठरवण्यासाठी झोन एनालिसिस (विभाग मूल्यांकन) उपयोगी पडतं.
गरज काय आणि किती यावर विभागणी
कोणत्या घटकांचा वापर किती होतो व त्यांना किती वेळा भेट द्यावी लागते, त्यांची निगा राखण्यासाठी किती बारकाईने त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे, त्यावर हे घटक नेमके कुठे असतील हे ठरतं. ज्या गोष्टींवर दिवसातून किमान एकदा किंवा दोनदा लक्ष देणं गरजेचं आहे अशा गोष्टी घरापासून जवळ असलेल्या बऱ्या पडतात तर ज्या गोष्टींकडे शक्यतो फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही, असे घटक घरापासून दूर असले तरी चालतात.
उदा. आपल्या रोजच्या चहासाठी गवती चहा हवा असेल तर तो घरापासून जवळ असेल तर दिवसातून दोनदा लागेल तेवढा खुडून आणणे आणि रोपांची काळजी घेणे सोपे जाते. तशीच गोष्ट तुळशीची. त्याउलट लाकडासाठी साग किंवा बांबू लावायचे असतील तर, त्यांच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, कधीतरी एखादी फेरी मारून त्यांच्याकडे लक्ष दिलं, तेही सुरुवातीच्या वाढीच्या वर्षात तरीही ठीक. मग ज्याठिकाणी अशी लागवड करायची ती घरापासून दूर असेल तरी चालेल.
झोन 3: मोहरान फार्मस्
झोन कसे ठरवायचे?
पर्माकल्चरमधे ‘झोन 0′ ते ‘झोन 5′ असे सहा झोनस् असतात. अगदी ठळक सीमारेषा जवळजवळ कधीच नसतात. एवढंच नाही तर ह्यातले काही झोन आपल्या शेतात नसूही शकतात. ह्यामुळे देखील पर्माकल्चर डिझाईन लवचिक असते. प्रत्येक प्रोजेक्टसाठी युनिक असते. उदाहरणार्थ, आमचं एक शेत गावाच्या दुसऱ्या बाजूला आहे जिथे आम्ही फार जात नाही. तिथे मोहाची आणि इतर जंगली झाडे आहेत, जंगल वाढतंय. वर्षातून एकदा मोहाची फुले, फळे (मोहदोडे) बिया, मोहोट्या वेचण्यासाठी कुणी गेलं तर गेलं. अशाप्रकारच्या शेतात फक्त झोन 5 असतो. दुसरीकडे एखादी फक्त आपल्या घरापुढच्या अंगणात काही भाज्या/फळभाज्या घेत असेल तर अशा ठिकाणी फक्त झोन 0 आणि झोन 1 असेल. आता झोन म्हणजे नेमकं काय ते पाहूया:
सगळ्या कार्यांचं हा केंद्रबिंदू, झोन 0:
शेतावर राहणाऱ्या व्यक्तीचं घर म्हणजे झोन 0. मग काहीवेळा तिथे मालक राहत असेल किंवा शेतावर काम करणारी गडीमाणसं. पूर्ण शेतावर लक्ष ठेवण्यासोबतच, शेतावरच्या सगळ्या कार्यांचं हा केंद्रबिंदू असतो. दिवसभराच्या कामकाजातून निवांतपणा तर घर मिळवून देतंच, पण त्यासोबत ते इतर महत्वाची कामंही करू शकतं. उदा. सोलर पॅनल द्वारे सौर ऊर्जा गोळा करणे. छतावर पडणारं पावसाचं पाणी गोळा करून ते साठवणे. महत्वाच्या अवजारांचे आणि संपत्तीचे रक्षण करणे इत्यादी. ह्या सगळ्यांनी झोन 0 फार महत्वाचा असतो. त्याची जागा आणि रचना ही खूप महत्त्वाची गोष्ट असते.
सतत लक्ष हवं असणारा झोन 1:
हा शक्यतो झोन 0 ला अगदी लागून असलेला भाग. दिवसातून कितीतरी वेळा आपण सहज घरातून आतबाहेर करत असतो. तेव्हा ज्या गोष्टींवर बारकाईने आणि सतत लक्ष ठेवण्याची गरज असते अशा गोष्टी झोन 1 मधे येतात. झोन 1 मध्ये येणाऱ्या गोष्टींना जास्त मेंटेनंस गरजेचा असतो. उदाहरणार्थ छोटंसं किचन गार्डन ज्यात नेहमी लागणाऱ्या गवतीचहा, तुळस, आलं इत्यादी वनस्पती असतील. कुत्रा किंवा ससा वगैरेंसारखे पाळीव प्राणी असतील तर त्यांच्या पिंजऱ्यांसाठीची जागा. किचनमधील कचरा कंपोस्ट करण्याची जागा, जळणासाठी लागणारा लाकूडफाटा, रोपं वाढवण्यासाठी कलम वगैरे करण्यासाठी छोटीशी नर्सरी इत्यादी सर्व गोष्टींची सोय झोन 1 मध्ये करण्याची गरज असते. ज्यांच्याकडे फक्त घर आणि परसदार असेल अशा प्रोजेक्टमधील जास्तीतजास्त भाग झोन 1 मध्ये येतो. जागा साधारणपणे कमी असल्याने इथली माती कंपोस्ट, मल्चिंग, सेंद्रिय कर्ब वाढविणे अशा शक्य तेवढ्या उपायांनी जास्तीतजास्त सुपीक बनवली जाते. पाणीही सतत आणि कधीही देता येईल अशी सोय असते.
गोठा, खुराडं आणि भाज्यांचे वाफे – झोन 2:
ज्यां गोष्टींना बऱ्यापैकी मेंटेनंस हवा असतो पण तरीही झोन 1 पेक्षा कमी अशा गोष्टी झोन 2 मध्ये येतात. साधारणपणे दिवसातून दोनदा किंवा किमान एकदा जिथे जावंच लागतं अशा ह्या गोष्टी. उदाहरणार्थ कोंबड्यांचं खुराडं, विक्रीसाठी लावलेल्या भाजीपाल्याचे बेड्स, बहुवर्षायू भाज्या, लिंबासारखी काही फळझाडे, गुरांचा गोठा इत्यादी सर्व गोष्टी ह्यात येतात. बऱ्याचदा झोन 2 मध्ये येणाऱ्या वनस्पतींसाठी फक्त जागेवर, भाज्यांच्या बेडवर मल्चिंग सुचवली जाते. कंपोस्टही थोड्याफार प्रमाणात वापरलं जातं.
ऋतूमानानुसार पिके झोन 3:
शेतजमीन जिथे मुख्यतः ऋतुमानानुसार वेगवेगळी पिके घेतली जातात ती झोन 3 मध्ये येते. म्हणजे कोकणात भात, घाटावर गहू, ज्वारी इत्यादी धान्ये घेतली जातात ती शेतं. हरभरा, उडीद इत्यादी कडधान्ये, करडई, तीळ वगैरे तेलबियांची शेती जिथे केली जाते ती शेतं, पशुपालन असेल तर गुरांसाठी हिरवा चारा जिथे पिकवला जातो ती जागाही झोन 3 मध्ये येते. झोन 3 बऱ्याचदा मोठ्या भागात पसरलेला असतो. त्यामुळे तिथल्या जमिनीचा कस सुधारण्यासाठी हिरवळीची खते, नत्रवर्गीय पिके, आच्छादन पिके इत्यादी उपाय केले जातात. झोन 3 कोरडवाहू किंवा बागायती असू शकतो.
राखीव जंगल किंवा चाऱ्यासाठी झोन 4:
झोन 4 म्हणजे शेताचा जंगलसदृश भाग. असा भाग ज्याच्यावर फार कमी लक्ष ठेवण्याची गरज असल्याने खूपच कमी वेळा जावं लागतं. साग, बांबू वगैरेंची लागवड असेल किंवा जनावरांसाठी, राखीव जंगल असेल तर असा भाग झोन 4 मध्ये येतो. चरायला जाणाऱ्या जनावरांच्या विष्ठेतून किंवा कापा आणि टाका पद्धतीतून जमिनीचा पोत आपोआप सुधारतो. पाणी देण्याची व्यवस्था नसते.
निसर्गाची प्रयोगशाळा झोन 5:
झोन 5 म्हणजे माणसांनी शक्यतो जाऊच नये असा भाग. आपल्याकडे देवराई असते तसा. आपल्या आजूबाजूला निसर्गात जराही ढवळाढवळ केली नाही तर तो कसा विकसित होऊ शकतो प्रयोगशाळा म्हणजे झोन 5. शेतात अगदी दूरच्या खालच्या अंगाला असलेली पाणथळ जागाही झोन 5 मध्ये येऊ शकते. ज्यांच्याकडे खूप मोठं शेत आहे, त्यांच्याकडे बराच मोठा भाग असा असू शकेल. जिथे अगदीच कमी जमीन आहे तिथे असा एखादा कोपराही आपली नियंत्रण करण्याची हाव आवरण्याची संधी देऊ शकतो.
2 Comments
छानच वर्णन केले आहे.
अतिशय उपयुक्त. शेताच्या मास्टर प्लानिंगची गाईडलाईन
Good