आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे असतात जी इतरांचं भलं व्हावं म्हणून स्वतःच आयुष्य समर्पित करतात. आपल्या गावासाठी झपाटलेल्या अशा दोन व्यक्तींबद्दल या लेखात जाणून घेऊयात.
गावासाठी गाडगेबाबा बनू या!
गावासाठी गाडगेबाबा बनू या! हा आमच्या रोजगार संघाचा एक उपक्रम. त्याअंतर्गत प्रत्येक रविवारी एखादे गाव निवडून स्थानिक तरुणांच्या सहभागातून तिथे ग्रामस्वच्छता अभियान राबविले जाते. अशाच एका रविवारी आमची टीम नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील मोहगाव या गावी ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी झाली. तिथल्या सरपंच दीपाली वराडे, अमोल फिसके, विजय ठाकरे, गोपाल वराडे या स्थानिक कार्यकर्त्यासह सर्वांनी हातात खराटे घेत ग्राम स्वच्छतेला सुरुवात केली. त्या दरम्यान एक महिला सार्वजनिक संडास स्वच्छ करतांना दिसून आली.
घरात शौचालय असूनही सार्वजनिक शौचालयाची स्वतः सफाई
त्या महिलेविषयी उत्सुकता वाढली. तिला भेटून चौकशी केली असता कळलं की ती एक गरीब घरातील महिला होती. या महिलेचे नाव होते रुपाली भोयर. त्यांच्या घरी शौचालय नसल्यामुळे त्या आणि त्यांचे कुटुंब सार्वजनिक संडासचा वापर करत असत. कालांतराने त्यांना शासकीय योजनेतून शौचालय मिळाले. ते कुटुंब घरातील शौचालयाचा वापर करतात. मात्र गावातील सार्वजनिक संडासची दुरावस्था आणि तिथली, घाण रुपाली भोयर यांच्याकडून बघवेना. त्यामुळं गेली कित्येक वर्ष दर रविवारी रुपाली हे काम नेमाने करत आहेत. त्याकरता ब्रश, पाणी, डिटर्जंट रुपाली स्वतः आणतात. यात रुपाली यांचा कुठलाही स्वार्थ नाही की, प्रसिद्धीचा सोस नाही.
हे ही वाचा : ग्रामसभेचे प्रभावी आयोजन – काही प्रयोग
गावकऱ्यांनी ठरवलं वेडं
घरची गरिबी, पतीचं आजारपण आणि लहान मुलं यांच्यातून मार्ग काढत दोन एकर शेतीत कष्ट करून रुपाली आपला संसार चालवतात. आपल्या घरातून सामान आणून स्वेच्छेने गावासाठी हे शौचालय सफाईचे काम करत आहेत. हे काम करावे यासाठी ना कुणाचा आग्रह, ना दबाव, ना कुठला मोबदला. तरीही शब्द न बोलता रुपाली हे काम आपलं मानून प्रामाणिपणे करत आहेत. पण रुपाली त्यांच्या ह्या कामामुळं गावकऱ्यांच्या दृष्टीने वेड्या ठरल्या. गावातील दीपाली अमोल, गोपाल हे कार्यकर्ते रुपाली यांना जमेल तसे सहकार्य करतात. त्यादिवशी स्वच्छता अभियान संपल्यावर आम्ही नागपुरात परतलो. मात्र रुपालीची ती कृती रोजगार संघाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात कायम घर करून बसली.

ग्रामदीप पुरस्काराने गौरव
दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी रोजगार संघाचा वर्धापन दिन असतो. गावात काही आगळे वेगळे काम करणाऱ्या व्यक्तींना त्या दिवशी पाच हजार रुपये रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह देऊन ‘ग्रामदीप पुरस्काराने’ गौरविले जाते. रोजगार संघाने त्यावर्षीचा पुरस्कार रूपालीताईंना दिला. गावात इतरांचे आयुष्य उजळत ठेवणारे दीप सतत तेवत राहावे हा त्या पुरस्कारामागील उद्देश . स्वतःचा फाटका संसार सांभाळून इतरांचं भलं व्हावं म्हणून काम करणाऱ्या फार कमी व्यक्ती असतात. रूपालीताई त्यातील एक. गावातील सार्वजनिक शौचालय हे सर्वात दुर्लक्षित असलेलं ठिकाण. गाव हागणदारी मुक्त व्हावं, गावात सर्वत्र स्वच्छता दिसावी म्हणून शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत घरोघरी शौचालय बांधकामाला अनुदान देऊन प्रोत्साहन दिलं जातं. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक गावात सार्वजनिक संडास बांधण्यात आले. त्याची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी मात्र कुणीही पुढाकार घेत नाही हा अनुभव आहे. रुपालीताईंमुळं मोहगाव याला अपवाद ठरले.

ग्रामपंचायत सदस्यपदी निवड
रुपालीताईंना ‘ग्रामदीप’ पुरस्कार मिळाल्यानंतर गावकऱ्यांचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. ज्या रुपाली यांना गावकऱ्यांनी वेडे ठरविले होते, त्याच रुपाली यांना पुढे गावातील लोकांनी ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून दिले.
निवृत्तीनंतर झाडं लावण्याचा छंद

बाबुराव मेंढे-अशीच दुसरी एक व्यक्ती म्हणजे बाबुराव मेंढे. अमरावतीमधील वरुड तालुक्यातील लोणी गावात राहणारे बाबुराव मेंढे हे वनविभागात नोकरीला होते. वनविभागातील निवृत्तीनंतर गावात स्थायिक होऊन जिथे जागा मिळेल तिथे झाडे लावण्याचा आणि त्यांचे संगोपन करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला आहे. सोबत कुणी असो किंवा नसो. ते एकटेच घराबाहेर पडतात. झाडे लावतात. लावलेल्या झाडांना संरक्षक कठडे लावून त्याचे संवर्धन करतात. बाबुराव उन्हाळ्यात स्वतःच्या खांद्यावर भांडे घेऊन झाडांना पाणी टाकत फिरतात. उन्हाची भीती नाही की कुणाच्या सोबतीची अपेक्षा.
हे ही वाचा : महाराष्ट्रातली वेगळी गावे
पेन्शनची रक्कम झाडांच्या संगोपनात
आपलं गाव आणि आजूबाजूचा परिसर हिरवागार करण्याचा जणू बाबुराव यांनी वसा घेतला आहे. त्यांना मिळणाऱ्या पेन्शनची रक्कम ते झाडांसाठी खर्ची घालतात.आजपर्यंत हजारो झाडांचे यशस्वी संगोपन बाबूराव मेंढे यांनी केले आहे आणि अजूनही करीत आहेत. 75 वर्षाचे बाबुराव वयोमानानुसार येणाऱ्या शारीरिक व्याधींची तमा न बाळगता आजही उत्साहाने जिथे जागा मिळेल तिथे झाडे लावून ती जगवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.
दहा हजारांच्या आसपास झाडे
बाबुराव मेंढे हे वृक्षांबद्दल गावकऱ्यांमध्ये प्रेम, जिव्हाळा निर्माण व्हावा म्हणून बाबुराव गावात ग्राम जयंती सप्ताह मोठ्या प्रमाणात साजरा करतात. बालकांमध्येही हा संस्कार रुजवण्यासाठी गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचे आयोजन ते करतात. आजपर्यंत त्यांनी लावलेल्या आणि जगविलेल्या झाडांची संख्या ही दहा हजाराच्या आसपास आहे. बाबुराव मेंढे यांच्याकडून प्रेरणा घेत अनेकांनी हा वसा जपावा म्हणून बाबुराव यांनाही ग्रामदीप पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
रुपालीताई आणि बाबुराव यांच्यासारख्या व्यक्तींमुळं गावं सुरक्षित आहेत आणि यापुढंही राहतील हा आशावाद टिकून राहतो.