गावभान : ग्रामीण विकासाचा आत्मा

Grampanchayat : गावात  विकास हवा असतो मात्र त्यासाठी जीव ओतून जे परिश्रम घ्यायचे असतात ते घेण्याची तयारी कुणाचीच नसते. आपणास आपल्या गावाविषयी खरोखर तळमळ असेल, गावाचा विकास व्हावा असं मनातून वाटत असेल तर सर्वात प्रथम गावभान जपणे अत्यंत गरजेचे आहे.
[gspeech type=button]

गावाचे आत्मभान म्हणजे गावभान  गाव’ हे फक्त वस्तीचे ठिकाण नसून ते एक संस्कृती, एक जीवनशैली आणि सामाजिक साखळीचे मूलभूत केंद्र असते. पण आजच्या धावपळीच्या काळात गावांच्या मूळ ओळखीपासून आपण दूर जात आहोत. याच पार्श्वभूमीवर “गावभान” ही संकल्पना अधिक महत्त्वाची ठरते. गावाचे आत्मभान, म्हणजे गावभान… गावाच्या भौगोलिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक पैलूंविषयी असलेली सजगता हेच शाश्वत ग्रामीण विकासाचे मूळ आहे.

गावभान म्हणजे काय?

गावभान म्हणजे आपल्या गावाच्या अस्तित्वाची, त्याच्या गरजांची आणि त्याच्या क्षमता-शक्यता यांची सखोल जाण असणे, ती करून घेणे.. अशी सखोल जाण असल्याशिवाय आपण गावात कुठलेच कार्यक्रम यशस्वी करू शकत नाही. गावात जे कार्य आपण करत असतो ते केवळ सोहळे साजरे करण्यासाठी असतात, हे धाडसाने सांगू शकतो. ही  सखोल जाण असणे म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नव्हे, तर गावाविषयीची आत्मीयता ओतून त्यात रममाण होणे आहे. गावाच्या नकाशात कुठे ओढा आहे, कुठे पाणी साचते, कुठे देवळं, शाळा, सामाजिक संस्था आहेत ही माहिती प्रत्येकाने जाणून घेतली पाहिजे. त्यालाच आपण गावाचे सूक्ष्म नियोजन करणे म्हणतो.

गावाचे सूक्ष्म नियोजन कसे करावे?

गावभानाचे विविध पैलू गावभान जपताना अगोदर आपणास त्याचे विविध पैलू पाडावे लागतील जे खालील प्रमाणे आहेत

( अ) भौगोलिक गावभान-

गावातील निसर्गसंपत्ती, जलस्रोत, मातीचे प्रकार, पर्यावरणीय घटक यांची माहिती आणि त्यावर आधारित नियोजन.

 (ब) सामाजिक गावभान-

यात गावातील लोकसंख्या,कुटुंब संख्या, जाती-जमाती, वंचित घटक, समांतर समाजव्यवस्था आणि सामाजिक समतेचे प्रयत्न यांची समज इत्यादी बाबींचा समावेश होतो.

 (क) आर्थिक गावभान-

गावातील शेती, पशुपालन, रोजगारसंधी, व्यापार, स्थानिक उद्योगधंदे, बचत गटांची सक्रियता यांचा अभ्यास.

 (ड) सांस्कृतिक गावभान- यात

गावाची लोककला, परंपरा, सण-उत्सव, भजने, नाटक कथा-कविता, लेखन, कला व सादरीकरण, जुनी गाणी, लोकगीते यांचे जतन आणि संवर्धन इत्यादी गोष्टी यात येतात.

 (ई) प्रशासकीय गावभान-

आपल्या ग्रामपंचायतची रचना, तिचे कार्य, अधिकार, योजनांची अंमलबजावणी, गावसभेचे कार्य आणि नागरिकांचा सहभाग त्यांच्या जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टी यात येतात.

 भौगोलिक आर्थिक सामाजिक सांस्कृतिक प्रशासकीय बाबींची माहिती करून घेतल्यानंतर त्या त्या क्षेत्रात कार्यरत घटकांच्या उत्थानाकरीता प्रयत्न होणे गरजेचे असते. या विषयाच्या अनुषंगाने जाणीव करून घेतली नाही तर, गावात  परिणामकारक कार्य उभे राहू शकत नाही. म्हणूनच या बाबी गावभान सदरात अंतर्भूत होतात. आपले गाव भान जागृत नसले तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात हे देखील बघणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा : आरोग्यदायी महिला, आरोग्यदायी गाव

गावभानाचा  अभाव असल्यास त्याचे परिणाम

 1) योजनांचा अपूर्ण किंवा चुकीचा वापर– आपले गावभान जागृत नसल्यास गाव विकासाच्या ज्या योजना असतात, त्याचा वापर आपण पूर्ण क्षमतेने करू शकत नाही. त्यामुळे गाव विकासापासून वंचित  राहू शकते. इतकेच नव्हे तर स्वतःची  प्रगती देखील आपण करू शकत नाही. आत्मभान, गावभान या परस्पर पूरक संकल्पना आहेत.

 2) बाह्य घटकांवर अवलंबित्व– आपले आत्मभान आणि गावभान जागृत नसेल तर पदोपदी आपणास दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची वेळ येते. सरकार, खासदार, आमदार, जिल्हा परिषद अथवा स्वयंसेवी संस्था याकडे गावकरी गरजा भागविण्यासाठी आशा ठेवून असतात. असे होऊ नये म्हणून महात्मा गांधी नेहमीच गाव स्वावलंबी, स्वयंपूर्ण व्हावे यासाठी आग्रही असत.

 3) गावात दुहेरी समाजव्यवस्था– दुहेरी समाज व्यवस्था म्हणजे गावात एकाच वेळी दोन भिन्न सामाजिक प्रणाली अस्तित्वात असणे. पहिली परंपरागत समाज व्यवस्था. यात जातीय पदानुक्रम, वंशपरंपरा, रूढी परंपरा यात सामूहिकता दिसत असली तरी विषमता देखील अंतर्भूत असते. दुसरी आधुनिक प्रशासकीय व्यवस्था. सरकारी योजना, ग्रामपंचायत, निवडणूक, आरक्षण प्रणाली यात समतेची दिशा असली तरी अनेकदा ती व्यवहारात राबत नाही. या दोन्ही व्यवस्था अनेकदा परस्परविरोधात असतात. त्यामुळे गावातील निर्णयप्रक्रिया गुंतागुंतीची होते. गावभान जागृत करून दोन्ही व्यवस्थेत समन्वय निर्माण करणे गरजेचे ठरते.

 4)गावातील तरुणांचे स्थलांतर – गावभान जागृत नसले की, गाव अभावग्रस्त जाणवायला लागते. अशा गावात शिक्षणाचा, रोजी रोटीचा, रोजगाराचा प्रश्न उपस्थित होतो. अनेकांना शहरे आकर्षित करतात. त्यामुळे गावातून शहराकडे स्थलांतर वाढते.

 5) पर्यावरणीय समतोल बिघडणे– गावभान जागृत नसले की, गावातील पर्यावरणाचा समतोल बिघडायला लागतो. वृक्ष लागवड, जलसंवर्धन याकडे गावकरी फारसे गांभीर्याने बघत नाहीत. गावाचा मुख्य आत्मा  शेती. शेतात कोणती पिकं घ्यावीत, पाण्याचा कोणत्या पिकासाठी कसा वापर करावा याचे ज्ञान नसल्याने गावकरी वारेमाप रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करत असतात. त्याचे परिणाम आरोग्यावर होत आहेत. प्लास्टिक वापराबाबत समज नसल्याने भविष्यातील धोके ओळखू येत नाहीत. या सर्वांचा परिणाम पर्यावरणीय संतुलन बिघडण्यात होतो.

हेही वाचा : सर्वसमावेशक पंचायत व्यवस्था

गावभान निर्माणासाठी उपाय

आपणास गाव भान जागृत ठेवण्यासाठी खालील बाबी करणे अत्यंत गरजेचे आहे.

शाळा व महाविद्यालयात “गावशिक्षण” उपक्रम

ज्यांच्या खांद्यावर उद्याचा गाव उभा असणार आहे त्या तरुणांमध्ये याबाबत सजगता निर्माण करणे गरजेचे आहे. गाव शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांना गावाच्या समग्र ओळखीबाबत जागरूक करणे. यात गावाचा भूगोल, इतिहास, संसाधने, जलसंवर्धन योजना, पर्यावरण बाबींचा समावेश होतो. तसेच गावाचे नकाशे तयार करणे, ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांचे अनुभव कथन संकलित करणे, गावाच्या पाणलोट क्षेत्राची माहिती, गाव सभेत सहभागी होत त्यातून लोकशाही आणि सहभाग यांचा अनुभव घेणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये गाव शिक्षणावर भर द्यावा लागेल. यात शिक्षकांची भूमिका  अत्यंत महत्त्वाची आहे.

ग्रामसभेची सक्रीय भूमिका

गावभान जागृत होण्यासाठी ग्रामसभेची भूमिका देखील अत्यंत महत्त्वाची आहे. खरे पाहता आपल्या गावातील ग्रामसभा ही परिणामकारक होणे गरजेचे असते. ग्रामसभेला गावातील सर्व मतदारांनी हजर राहणे, गावातील समस्यांविषयी त्यात चर्चा करणे, त्यावर मार्ग काढणे, शासनाच्या योजना सर्व घटकापर्यंत पोहोचविणे, लोकसहभाग वाढविणे या बाबी महत्वपूर्ण आहेत. त्यासाठी ग्रामसभा सक्रिय असावी लागते.

गावाचा इतिहास, भूगोल, परंपरा यांचे लेखन

गावाचा इतिहास भूगोल आणि परंपरांची माहिती झाल्यास यातून आत्मसन्मानाची ओळख होते गावाची जुने पुरावे शौर्य कथा संत समास सुधारक यांचा इतिहास समजल्यास गावकऱ्यांना त्याचा अभिमान वाटतो. नव्या पिढीशी संपर्क साधण्यास आणि मूळ संस्कृतीशी त्यांची नाळ जुळण्यास त्यामुळे मदत होते. आपल्या गावाचा भूगोल माहिती झाल्यास जलसंवर्धन पर्यावरण संवर्धन शेती सुधारणा यासाठी योग्य दिशा मिळते. परंपरांची शास्त्रीय नोंद झाल्याने पारंपरिक उपचार पद्धती वगैरे माहिती हा गावाचा डिजिटल वारसा पुढील पिढ्यांसाठी शाश्वत ठेवता येतो 

अनुभवकथन, कृषी सत्संग, वडीलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन

गावात, चावडीवर आपले अनुभव कथन, गावी कृषी सत्संग वर्गाचे आयोजन केल्याने अनेक गोष्टींची माहिती होते. ज्येष्ठ लोकांचा सल्ला आपणास अनेक बाबी शिकवून जातात. त्यामुळे या सर्व गोष्टींना गावी प्राधान्य देणे गरजेचे आहे.

डिजिटल माध्यमातून गावाचा दस्तऐवज तयार करणे

आजचे जग तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे गावातील बऱ्या वाईट घडामोडी पुढील पिढीपर्यंत पोहोचाव्यात ज्यातून त्यांना योग्य दिशा मिळेल. डिजिटल दस्ताऐवजीकरण म्हणजे गावाशी संबंधित माहितीचे संगणकीकरण करून ती माहिती संग्रहित, सुरक्षित व सहज वापरता येण्याजोगी बनवणे. यात गावाचा इतिहास, भूगोल, लोकसंख्या, पाणी व शेती स्त्रोत, योजनांची माहिती व त्यांची अंमलबजावणी, गावातील लोक कलाकार, शिल्प परंपरा, ग्रामपंचायत निर्णय, ग्रामसभेचे इतिवृत्त, फोटो, व्हिडिओ, दस्तऐवज, नकाशे इत्यादीमुळे माहिती कायमस्वरूपी संग्रहित करता येते व ती नव्या पिढीला सहज उपलब्ध होऊ शकते. यासाठी सर्व महत्त्वाची कागदपत्र डिजिटल स्वरूपात ठेवून ती प्रसारित करणे गावभान जागृतीसाठी महत्त्वाचे ठरते.

गावभान ही केवळ एक संकल्पना नाही, ती गावाच्या आत्म्याची ओळख आहे. हे भान जर गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले, तर कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते. गाव स्वतःची दिशा ठरवू शकते आणि त्यामुळे बदलाचा खरा प्रवाह गावातून सुरू होतो. म्हणूनच, ‘गाव जाणतोय…!हे फक्त घोषवाक्य न राहता, प्रत्येकाच्या कृतीतून ते दिसले पाहिजे.  यालाच गावभान जपणे म्हणतात.. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

विष्णूचा घोड्याचे मुख असलेला अवतार म्हणजेच हयग्रीव. त्याला ज्ञान आणि प्रज्ञेचा देव मानले जाते. भागवत पुराणाच्या दशम स्कंधातील चाळीसाव्या अध्यायात
श्रावण महिन्यात काही विशिष्ट वनौषधी आणि पवित्र वनस्पती आपल्याला नैसर्गिकरित्या रानात किंवा अंगणात आढळतात. या वनस्पतींना धार्मिक आणि आयुर्वेदिक दोन्ही
हिंदू धर्मामधील शीतला देवता भारतीय उपखंडात गेल्या शतकात विशेष प्रसिद्ध झाली आहे. तिच्या शीतला नावाची व्युत्पत्ती संस्कृतमधील शीतल या शब्दावरून

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ